Categories
कथा-लघु कथा

रक्तगटाच्या शोध मोहिमेची गोष्ट

आपल्या या जगात कितीतरी प्रश्न असे आहेत ज्याची उत्तरे आत्ता खूप सहज सोपी वाटतात. आता हेच बघा ना पहिल्या महायुद्धात किती लोकांचे जीव गेले. रक्ताचे पाट वाहिले, पण विचार करा कि ज्या वैद्यकीय सुविधा आज आहेत. तशा तेव्हा असल्या असत्या तर किती लोकांचे प्राण वाचले असते? पण त्याकाळी एक शोध असा लागला होता की ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले होते. त्या शोधाचा उपयोग आजच्या काळात आपण सर्रास करतो. साध हेच बघा ना गरज पडली तर आपण एकाच रक्त सहज दुसऱ्याला देतो म्हणजेच रक्तदान (Blood donation). पण काय हो!रक्त, त्याचे गट, रक्तदान याच्या बद्दल आपल्याला प्रश्न पडतच नाहीत. कारण सगळ्यांनाच याची माहिती आहे. ही तर काय सगळी सोपी उत्तरे, पण या प्रश्नांचा प्रवास कसा सुरू झाला? एवढे सोपे वाटणारे उत्तर पहिल्यांदा कोणी शोधून काढलं असेल? तेव्हा ते सोपे असेल का? बापरे किती हे प्रश्न? पण उत्तरे कुठे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ह्या गोष्टीतून. 

गोष्ट सुरू होते मानवी रक्ताभिसरण संस्थे (Blood circulation) पासून. आपल्या शरीरात रक्त असते आणि ते शरीरभर फिरत असते. हा शोध तर आधीच लागला होता. पण तेव्हाही काही समस्या अशा होत्या की रक्त कमी पडून माणसे मृत्युमुखी पडत होती. त्यामुळे त्या बाबतीत प्रयोग करणं सुरू झालं. जसे पहिल्यांदा माणसाचं रक्त कुत्र्याला दिलं पण तो प्रयोग फसला. मग गंमत अशी झाली की दुसऱ्या प्रयोगात प्राण्याचे रक्त माणसाला दिले. ई…. ऐकायला कसेतरीच वाटते हो ना! हाही प्रयोग फसला. आता हे सगळं झाल्यानंतर तब्बल २०० वर्ष काहीच झालं नाही. मग त्याच्या नंतर पहिल्यांदाच माणसाचं रक्त माणसाला दिलं गेलं आणि काही अंशी हे प्रयोग यशस्वी झाले. पण काही मात्र अगदीच फसले. त्याचं असं झालं की काही माणसांचे रक्त दुसर्यांच्या अंगात अगदी स्वतः चेच रक्त मिसळावे तसे मिसळले पण काही माणसांच्या बाबतीत तर असे झाले की ती माणसे  दणकट होती पण त्यांना थोडसं रक्त बाहेरून दिल्यावर ती तडकाफडकी मेली. आता काय करायचं? परत सगळे घाबरले आणि अजून ५० वर्ष या प्रयोगांमध्ये काहीच प्रगती झाली नाही.

याच काळात एक अतिशय मेहनती व संशोधनाची प्रचंड आवड असणारा तरुण व्हिएन्ना विद्यापीठातून वैद्यकशास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडला. त्या तरुणाने शिकत असतानाच आहार व रक्त या विषयावर उत्कृष्ट संशोधन केले होते. तसेच रक्तावर संशोधन करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. अशा या कष्टाळू तरुणाचे नाव कार्ल लँडस्टायनर होते. पुढे डॉक्टर झाल्यावर पाच वर्ष ते रसायनशास्त्र शिकले. या रसायनशास्त्राची मदत घेऊन व पाठीमागच्या रक्तदानाच्या प्रयोगातील इतिहास जाणून घेता घेता. त्यांना एक विलक्षण प्रश्न पडला आणि हाच प्रश्न त्यांना पुढच्या अद्वितीय शोधाच्या कामी आला. प्रश्न असा होता की दोन माणसांचा रक्त मिसळल्यावर कधी कधी त्यात गुठळ्या का होतात? आता मात्र झालीच प्रयोगाला सुरुवात. त्यांनी रक्ताचे अनेक नमुने एकमेकांत मिसळून त्यांची सूक्ष्म निरीक्षण केली. त्याच्या शास्त्रशुद्ध नोंदी ठेवल्या आणि १९०१ साली अथक प्रयत्नानंतर मिळालं ना! उत्तर. हेच की सर्व माणसांचं रक्त सारखं नसतं. त्यामुळे भिन्न प्रकारचे रक्त एकत्र आलं की त्याच्या गुठळ्या बनतात.

डॉ. कार्ल लँडस्टायनर

त्याकाळी गंमत अशी होती की सगळ्या शास्त्रज्ञांचा असा ठाम समज होता की सगळ्या माणसाचं रक्त सारखंच असतं. त्यामुळे डॉ. कार्ल यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, पण डॉ. कार्ल थांबले नाहीत. त्यांनी पुढचा शोध चालूच ठेवला. ह्या नंतर त्यांनी रक्तातील वेगवेगळी रसायने (chemicals) शोधून काढली. त्यातूनच जन्म झाला ऐ, बी, ऐबी आणि ओ रक्त गटांचा.

या रक्तगटाच्या शोधा नंतरच सर्व शास्त्रज्ञांचं आणि लोकांचं या संशोधनाकडे लक्ष गेलं. हाच तो शोध होता. ज्याच्यामुळे पहिल्या महायुद्धात हजारो सैनिकांचे प्राण रक्तदानामुळे वाचले होते. रक्त गटांच्या या क्रांतिकारी शोधामुळे मानवजातीला जो फायदा झाला. त्याबद्दल 1930 सालचं नोबेल पारितोषिक देऊन डॉ. लँडस्टायनर यांना गौरवण्यात आलं.

एवढे मोठे पारितोषिक मिळवून सुद्धा डॉक्टर साहेब काही थांबले नाहीत. चिकाटीने आणि जिद्दीने त्यांनी पुढे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन उपगट शोधून काढले.

 प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे  या म्हणीला साजेसं काम डॉक्टर कार्ल यांनी करून दाखवलं. हीच ती आपली रक्तगटाच्या शोध मोहिमेची गोष्ट.