Categories
संस्कार

आताचा सार्वजनिक गणेशोत्सव !

येत्या काही दिवसातच गणपती बाप्पाचे सगळीकडे आगमन होईल . खूप उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असेल. घरोघरी बाप्पा विराजमान होतील. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल.

घरोघरी अगदी धामधूम असते यावेळेस. पूजेची तयारी, नैवेद्याची तयारी, मग गौरींचे आगमन.  घरोघरी केले जाणारे तळणीचे पदार्थ आणि सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे मोदक. गणपती बाप्पाचं आणि मोदकाचं खास समीकरण आहे. मोदक या शब्दामध्येच तेवढा मोद आहे कि तो खाल्ल्यावर कुणाला आनंद होणार नाही? 

असंच एक वेगळं समीकरण आहे ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळकांचं !

लोकमान्य टिळकांचे हे शताब्दी पुण्यस्मरण  वर्ष. टिळकांनी स्वराज्य आणि स्वदेशी या दोन गोष्टींवर खूप कार्य केले.  सगळ्यांनाच माहित आहे कि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्टीय स्तरावर एक वेगळी ओळख करून दिली. लोकांमध्ये जागृती निर्माण  व्हावी आणि सर्व समाजातील लोकांनी एकत्र यावे यासाठी त्यांनी गणेशोत्सवातून वेगळे प्रयत्न सुरु केले. 

बंगालच्या फाळणी नंतर स्वदेशीचा प्रचार करण्यात आला. विदेशी वस्तूंचा  बहिष्कार करण्याचे आवाहन सर्व जनतेला करण्यात आले. गणेशोत्सवातून खूप वेग वेगळ्या आणि चांगल्या विषयांवर व्याख्यानमाला त्यावेळी आयोजित केल्या जात असत. 

हे सगळं १२५ वर्षांपूर्वी … आज आपण काय करतो आहोत ? स्वदेशी वस्तूंचा आग्रह हा त्यावेळी देखील धरण्यात आला  होता. आज आपण कितीजण स्वदेशी वस्तूंचा विचार करतो. गणपती आले कि त्याची सजावट करणं हे आलंच… मग त्यासाठी आपण लाइट कुठले वापरतो ? मग मागे आरास किंवा मखर करण्यासाठी जे शोभेचे  सामान लागतं ते कुठलं असतं याचादेखील विचार करावा सगळ्यांनीच. मुख्यतः मोठ्या मंडळांनी आणि अगदी आपण सगळेच जण जे घरी छोटे छोटे सण समारंभ साजरा करतो त्यांना हि विनंती कि कृपया  भारतामध्ये तयार झालेल्या गोष्टींचा वापर करावा. सस्तेवाला माल सस्ते में मिलेगा लेकिन बहुत दिन नहीं चलेगा। हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावं. गणेशोत्सवातचं कशाला…. भारतामध्ये जे काही सण..  उत्सव वर्षभर साजरा होतात त्यासाठी स्वदेशी गोष्टींचाच वापर करण्यात यावा. अगदी बारा महिने. आपला एक एक रुपया आपण कुठे खर्च करतो याचा विचार करणं हे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी खूप गरजेचं  आहे, नाही का? सध्याच्या घडामोडी मध्ये या गोष्टीबद्दल सर्वाना या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. त वरून ताकभात हे जो मनुष्य ओळखतो त्याला जास्त खोलामध्ये गोष्टी माहिती असतात असं माझं प्रामाणिक मत आहे. 

आज सार्वजनिक गणेशोत्सव म्हणलं कि , डोळ्यासमोर उभे राहतात ते भव्य दिव्य देखावे , ते बघण्यासाठी लोकांची झालेली गर्दी आणि कुठलेही मंडळ असू द्या, आमचे मंडळ किती भारी किंवा आमचं मंडळ एक नंबर हे दाखवण्याचा चालू असलेला सगळ्यांचाच अट्टहास  … आणि कुठल्याही अर्थार्थी संबंध नसणाऱ्या गाण्यावर बेधुंद पणे हात पाय हलवणारी किंवा डोलणारी तरुणाई … एक मेकांशी स्पर्धा करावी पण ती चांगल्या गोष्टीसाठी करावी ,पण हे सगळं करत असताना सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तो … सर्व लोकांनी एकत्र येऊन समाज प्रबोधन घडावे , लोकांमधील गैर समज दूर व्हावे आणि समाजास बळकटी मिळावी यासाठी सुरु झाला होता हे आपण सगळेचजण किती पटकन विसरतो. 

या सगळ्याला अपवाद म्हणजे काही मंडळ हि समाज उन्नतीसाठी कार्य करतात हे देखील मान्य करायलायाच हवे. महाराष्ट्राची शान म्हणजे ढोल पथक .. पांढरा स्वच्छ झब्बा.पायजमा .. .त्यावर एक फेटा असा मुलांचा पेहराव आणि नऊवारी साडी ,नाकात नथ आणि डोक्यावर फेटा असा मुलींचा पेहराव आणि हातात ढोल ताशा वाजवून जी काही पथकं दिवसभर मन मुग्ध होऊन सादरीकरण करतात त्याला खरंच तोड नाही. 

गणपती हि बुद्धीची आणि कलेची देवता .. सांस्कृतिक कार्यक्रम करताना त्याचे योग्य तसे पालन झाले म्हणजे संस्कृती टिकवून ठेवण्यास मदत होते. भारत देशाची विविधता हि त्याच्या संस्कृतीमुळेच टिकून आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन १२५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. काळानूरुप त्यामध्ये थोडे फार बदल झाले. गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या. मंडळांच्या संख्येमध्ये सुद्धा कैक पटीने वाढ झाली.

भक्तांची  बाप्पांवरची श्रद्धा मात्र अगदी अजून तशीच आहे आणि ती तशीच राहील यात तिळमात्र शंका नाही. शेवटी एवढचं  म्हणेन ज्या गोष्टी आपण काळाच्या ओघात विसरतो त्या आठवून पुन्हा एकदा त्याचा श्रीगणेशा करावां. स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार हि गोष्ट शक्य तेवढी अवलंबली जावी अशी इच्छा आहे. आता ज्या गोष्टीला अजून तरी काही पर्याय बाजारात उपलब्ध नाहीत त्यावर विचार करायची जास्त गरज आहे.

त्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला सद बुद्धी देईलच हि खात्री आहे. 

गणपती बाप्पा मोरया ! 

Categories
Uncategorized कलादालन

मातीचा गणपती

“गणपती” अर्थात गणांचा अधिपति. या आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना आपण बरेच जण रोज करतो. स्तोत्राची सुरुवात होते ती श्री गणेशाय नम: म्हणूनच, मग ते अथर्वस्तोत्र असो किंवा रामरक्षा स्तोत्र.

maticha ganapati- clay ganesh idol

सप्टेंबर महिना आला की लगबग चालू होते ती गणेश चतुर्थीच्या तयारीची. अनेकांनी ट्रेन-बसची तिकिटे आगाऊ करून ठेवलेली असतात. त्यात सर्वात जास्त गर्दी असते ती आपल्या कोकणात. प्रत्येकाला गावाकडे जाण्याची ओढ लागली असते. सर्व एकदम फुल्ल असते, मग ती कोकणकन्या असो वा जनशताब्दी किंवा अगदी आपला लाल डब्बाही.

सौंदर्यसृष्टीने भरलेलं कोकण वर्षातून एकदा नुसतं पाहायला मिळाले तरी डोळ्याचे पारणे फिटते, आणि गणपतीत कोकणवारी म्हणजे तर त्याची मज्जा वेगळीच! कोकणातील विशेषता आहे ती म्हणजे “मातीच्या गणपती”ची, इथे बरेचदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीही शाडूमातीचे बघायला मिळतात, आणि बहुतांशी घरगुती गणपती देखील हे शाडूमातीचे असतात. आपल्या शहरांमध्ये गणपती विसर्जन झाल्यावर अनेक पोस्ट मीडियावर येतात, त्या विसर्जन झाल्यावर समुद्रांच्या किनारपट्टीची झालेली अवस्था किंवा गणपती विसर्जनानी नदीतील मेलेले मासे इत्यादी-इत्यादी, पण खरंच विचार केलाय कधी की आपण घरच्या घरी खरच इको फ्रेंडली गणपती बनवू शकतो का ते?

गणपती बाप्पा हा नेहमीच इको फ्रेंडली होता, फक्त आपण तो बनवू शकत नाहीये, इको फ्रेंडली म्हणून अनेको प्रकारचे गणपती आपल्याला प्रदर्शनात, दुकानात किंवा प्रसिद्धीमाध्यमांवर, बातम्यांमध्ये बघायला मिळतात. कागदाच्या लगद्याचा, अर्धी व्हायटिंग पावडर आणि कागदाचा लगदा यातून गणपती बनवतात याउपर तर गाईच्या गौऱ्यांपासूनही गणपती बनवलेलाही पहिला आहे.पण त्यासाठी वापरलेलं साहित्य, दिलेले रंग, कागद तयार करताना वापरलेली रसायनं खरच इको फ्रेंडली असतात का? यावर सर्वांनीच विचार करायला हवा.

अशाच एका गणेश चतुर्थीला खणखणीत आणि स्पष्ट हाक ऐकू आली, अर्थात गोखले आजोबांची, गोखले आजोबांनी हाक मारून “दर्शनास घरी येऊन जा”, असे आमंत्रण दिले आणि मी ठरल्याप्रमाणे अगदी वेळेवर गेलो, गणपतीसमोर हात जोडून उभा राहिलो आणि आश्चर्यचकित झालो, गणपतीची सुबक मूर्ती, गणपती समोर हात जोडून उभा राहिलेला छोटासा उंदीरही खूप छान दिसत होता आणि सजावटीसाठी खऱ्या फुलांचे हार होते, मनात आले, “खरा इको फ्रेंडली गणपती सापडला!” सोन्याचा गणपती पाहून होणार नाही तितका आनंद मला हा “मातीचा गणपती” पाहून झाला, ही सुंदर कोरीवकाम केलेली मूर्ती होती शुद्ध शाडू मातीची, रंग न दिलेला गणपती होता, अगदी गंधासाठीदेखील गोखले आजोबांच्या नातवाने तांदुळाचे पीठ वापरले होते, तेव्हा लक्षात आलं की “खरं देवपण हे मूर्तीच्या रंगावर अवलंबून नसून ते भक्ताच्या मनातल्या देवाच्या भक्तीवर असतं.”

शाडूमाती किंवा अगदी नदीकाठच्या लाल मातीचे देखील छान गणपती तयार होतात, त्यात फक्त मूर्तीचा आकार, मातीत किती पाणी वापरायचे अशा प्रमाणांवर लक्ष ठेवावे लागते, मूर्ती कोरायची साधनेही दुकानात उपलब्ध असतात. आपण सर्वांनी एकदा तरी प्रयत्न करून बघावाच.

मग एखाद्याबरोबर गणपती तयार करता-करता “करायला गेलो गणपती आणि झाला मारुती” ही म्हण खरी झाली तरी, काय सांगावे दोन-चार प्रयत्नांमध्ये सुखकर्ता विघ्नेश्वर कृपेने यात यश येईलही. नाहीतर हनुमान जयंती आहेच!

तेव्हा या गणेशचतुर्थीच्या आधी तुम्हाला आवडेल आणि मनाला पटेल असा “मातीच्या गणपती”ची सुबक मूर्ती आपल्या हातांनी तयार करायचा प्रयत्न नक्की करून पहा.