Categories
प्रवास

अंदमान पर्यटन साठी महत्वाची माहिती

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी अंदमान सहल आणि तिथे मी अनुभवलेले Underwater sea walk ह्या संबंधित एक पोस्ट लिहिली होती. त्या नंतर मला काही वाचकांनी प्रश्न विचारले, की तिथे कसे जावे? कधी जावे? इत्यादी. मग विचार केला, आम्ही आखलेली सहल आणि काही टिप्स असा एक वेगळाच पोस्ट लिहावा म्हणजे ह्या पुढे सुद्धा जर कोणाला असे प्रश्न असतील तर त्याची उत्तरे त्यांना सहज मिळू शकतील. 

तर थोडी माहिती अंदमान निकोबार विषयी : 

अंदमान निकोबार हा जवळ जवळ ६०० द्वीपांचा समूह आहे.  पण गंम्मत अशी की त्यातील फक्त 36 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. बाकी सगळे निर्जन पण निसर्गाने नटलेले असे आहे.

अंदमान निकोबारमधली सर्व ३६ बेटं ही प्रवाश्यांसाठी खुली नाहीत. इथे काही अश्या जमाती राहतात ज्यांना बाहेरच्या जगाशी संबंध ठेवायला आवडत नाही. काही अगदी लुप्त होऊ आलेल्या जमाती हि आहेत. त्या मुळे इथे सहसा परमिट शिवाय कोणालाच प्रवेश नाही. त्यात सुद्धा research संबंधित लोकांनाच परमिट्स मिळतात.

cellular_jail_andaman
cellular jail – Andaman

अंदमान पर्यटना संबंधी महत्वाची माहिती

अंदमानला जाण्यासाठी चेन्नई हुन थेट विमान आहे. आम्ही मुंबई – चेन्नई आणि मग चेन्नई- पोर्टब्लेअर असा 1  स्टॉप प्रवास केला होता. सगळ्या मोठ्या शहरातून चेन्नई ला काँनेकटिंग विमाने आहेत, म्हणून डायरेक्ट बुकिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही.

हे द्वीप समूह बे ऑफ बंगाल मध्ये असल्या कारणाने इथे लौकर सकाळ होते, तसेच सूर्यास्त हि लौकर होतो. सायंकाळी पाच च्या पुढे अंधार व्हायला सुरुवात होते.

इथे बंगाली भाषा जास्त प्रचलित आहे. त्याच बरोबर इंग्लिश, हिंदी या भाषादेखील इथे लोकांना समजतात म्हणून भाषेची विशेष अडचण येत नाही.

आमच्या सहलीत आम्ही – पोर्ट ब्लेअर, रॉस आयलँड, नील आयलँड, हॅवलॉक अशी ठिकाणे केली. हे सोडून चिडिया टापू, भारतांग आणि रंगत बेट प्रवाश्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

पोर्ट ब्लेअरवर आवर्जून जाण्याचे ठिकाण म्हणजे Cellular Jail . इथे नेहमीच गर्दी असते, म्हणून आधी तिकीट काढून ठेवा. Cellular Jail संध्याकाळी बघायला जा कारण तिथला sound and light शो! ते आणि अमर ज्योती, स्मारक हे पाहण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य!

रॉस आयलंड वर कोण्या काळी ब्रिटिशांचे वास्तव्य असलेली कॉलनी चे अवशेष आहेत. ते सध्या navy च्या देखरेखीत आहे. इथे बरेच वन्य जीव आहेत जसे की ससा, हरीण, मोर. त्यांचा मुक्त वावर तिथे बघायला मिळतो.

सगळ्या बेटांवर जाण्यासाठी लहान मोठ्या प्रकारची फेरी घ्यावी लागतात. त्यामुळे जर कोणाला समुद्र प्रवास किंवा बोटीचा त्रास होत असेल तर आवश्यक ती औषधे जवळ ठेवावी.

इथे सगळ्या बेटांवर चांगले रिसॉर्ट आहेत, पण सगळं लिमिटेड असतं, म्हणून आधी पासून बुकिंग करून जाणे उत्तम.

जर एखादे ठिकाण बघून लगेच परत येण्याचा विचार असेल तर फेरी चे तिकीट काढताना शेवटची फेरी ची वेळ आणि हवामानाचा अंदाज घ्यायला विसरू नका.

20 rupees च्या नोटांवर दिसणारा lighthouse!

सहसा ऑक्टोबर नंतर अंदमान ला जाणे योग्य. जानेवारी – मे हे अंदमान ला जाण्यासाठी अगदी चांगले महिने. ऑक्टोबर – डिसेम्बर च्या दरम्यान वादळ येण्याची शक्यता जास्त असते. मे अखेर पावसाळा सुरु होतो, मग water – sports बंद असण्याची शक्यता वाढते.

इथे बीच वर खाण्यासाठी  तुरळक गोष्टी मिळतात जसा की – नारळ पाणी, शाहाळ, किंवा चिरलेली फळे आणि चहा. 

बऱ्याच बीच  वर लोकांनी त्यांच्या घरात कपडे बदलण्याची सोय केली आहे किव्हा public changing रूम्स देखील आहेत, त्या मुळे swimsuits घालणे किंवा कपडे बदलणे या बेसिक सोयी तिथे आहेत. . 

अंदमान मध्ये मासेमारी वर बंदी आहे. इथे बऱ्याच गोष्टी दुसऱ्या राज्यातून फेरी ने येतात – अगदी मासे सुद्धा! ह्याच कारणामुळे काही गोष्टी जस की भाज्या, दूध लिमिटेड प्रमाणात असतं. त्यामुळे जर मासे खाण्यासाठी तुम्ही जाणार असाल तर परत विचार करा! अर्थात पोर्ट ब्लेअर वर हि कमी जाणवणार नाही, पण तुम्ही पोर्ट ब्लेअर सोडून दुसऱ्या कुठल्या बेटावर असाल तर हा तुटवडा तुम्हाला जाणवू शकेल. या कारणामुळे तुम्ही तुमच्याबरोबर काही खाण्याचे पदार्थ घेऊन गेलात तर ते जास्त सोयीचे होऊ शकते.

आशा आहे की ह्या छोट्या पण महत्वाच्या अश्या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्हाला अंदमान प्रवास करताना मदत होईल. हे बेट म्हणजे आपल्या देशातील निसर्गाचा खजिना आहे आणि त्याला तुम्ही जरूर भेट द्या.  

Categories
प्रवास

समुद्राखालील आगळे वेगळे जग – अंदमान भटकंती

अंदमान – नुसतं नाव काढले तरी डोळ्यासमोर उभे राहते ते पांढर्‍या वाळूचा आणि निळ्या-हिरव्या महासागराचे नयन मनोहर दृश्य. अंदमानचे नैसर्गिक सौंदर्य विपुल आहे. निळे समुद्र आणि अंदमान निकोबारची ती बेटं, निळ्या रेशीमवर विखुरलेल्या पाचूसारखी दिसतात.

 त्या ठिकाणाचा  विचार मला स्वप्नांच्या रम्य नगरीत घेऊन जातो. खरं तर जेव्हा आम्ही अंदमानला जाण्याचे ठरविले त्यावेळी माझी मुलगी लहान असल्याने मला थोडीफार काळजी वाटतं होती. परंतु मी  खूप चुकीचा विचार करत होते हे मला लवकरचं जाणवले.  

Andaman trip memories

आम्ही आजवर केलेल्या भटकंतीमध्ये, सर्वात आल्हाददायक ट्रिप हीच होती. ह्या प्रवासात आम्ही सुंदर समुद्र किनारे, तऱ्हेतऱ्हेचे वॉटर स्पोर्ट्स अनुभवलेच पण त्याच बरोबर सेल्ल्युलर जेल मध्ये भारताचा स्वतंत्रतेचा लढा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नक्की काय? हे ही समजून घेतले. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वेळी आम्ही समुद्राची एक सुंदर बाजू पाहिली, ती म्हणजे त्या पाण्याखाली असलेले पाण्यातील असंख्य जलचर प्राणी, वेली आणि इतर जीवजंतू. त्यांची एक अजब दुनियाचं त्या पाण्याखाली वसलेली आहे आणि ती मला अनुभवायला मिळाली underwater sea walk मुळे.

अंदमानच्या किनारपट्टीवरचे पाणी खरोखरच स्वच्छ आणि निर्मळ आहे. आम्ही हैवलॉक मध्ये असताना वॉटर स्पोर्ट्स साठी एलिफंट बीचवर गेलो. मला तेथे हत्ती दिसले नाहीत आणि अंदमान मध्ये हत्ती असतील ह्याची शंका सुद्धा आली पण मग ह्याला elephant beach का म्हणत असतील? हे मला माहित नाही. असो पण तो मुद्दा नाही!

आम्ही elephant island ला पोहोचल्या नंतर आम्हाला जाणवले कि एकत्र करण्यासारख्या फार ऍक्टिव्हिटीएस नाहीत .मुलगी लहान असल्यामुळे तिला फार खेळता येत नव्हते. मग ग्लास बॉटम होडीत बसून समुद्राची फेरी मारायचे असे आम्ही ठरवले. तिथे मी अजून एक पाटी पहिली ती म्हणजे underwater sea walk ची. कुतूहलाने आम्ही त्याबाबत चौकशी केली आणि लगेचच एक वेगळा अनुभव घेऊया असा विचार करून त्याचे तिकीट घेतले.

आम्ही पैसे दिल्यानंतर किनाऱ्यापासून काही अंतरावर anchor घातलेल्या एका लहान बोटीवर आम्हाला नेण्यात आले. आम्ही बोटीवर चढताच गोताखोरांनी आम्हाला त्यामध्ये बदलण्यासाठी डायव्हिंग पोशाख दिला. आम्हाला खरोखर काहीच कल्पना नव्हती की पुढे काय होणार पण तो अनुभव रोमांचक होता.

डाइव्हचा खराखुरा अनुभव

बोटीच्या अगदी शेवटी, दोन डायव्हर्स आमची वाट पहात होते. त्यांनी विचारले की आम्हाला हृदयविकार, क्लॉस्ट्रोफोबिया इत्यादी त्रास आहेत का? आम्ही एकदा नकारात उत्तर दिल्यावर त्यांनी आम्हाला दोन मोठे हेल्मेट घालण्यास दिले. हेल्मेटला मोठा पाईप जोडला होता, त्या पाइपमुळेच आम्हाला पाण्याखाली ऑक्सिजनचा पुरवठा होणार होता. हेल्मेट आणि त्या मोठ्या ऑक्सिजन पाइपमुळे मला क्षणभर अंतराळवीरांची आठवण आली!

त्यांनी आम्हाला काही सांकेतिक चिन्हे सांगितली जी ‘फाईन’, ‘फाइन नाही’ ‘पाण्यावर परत जाण्याची गरज’ इ. दर्शवितात. हेल्मेट तळापासून उघडे होते.त्यामुळे पाणी हेल्मेटच्या आत जाईल कि काय? अशी शंका मनात आल्याने डायव्हरला तसे विचारले असता तो म्हणाला,”हवेच्या दाबामुळे हेल्मेटमध्ये पाणी शिरु शकत नाही”.

हे वैज्ञानिकदृष्ट्या सर्व परिपूर्ण असले तरी मी त्वरीत प्रार्थना केली कारण मला खात्री होती की, जर पाणी शिरण्यास सुरूवात झाली तर घाबरुन आयत्या वेळी कोणतीही चिन्हे मला आठवणार नाहीत आणि कदाचित मला बघून त्या डायव्हरला स्वत: लाच भीती वाटेल 😛

Andaman trip memories- underwater sea walk

अंदमानमधील अंडरवॉटर वॉक अनुभव

आम्ही पाण्यात खाली उतरताच हेल्मेटमध्ये पाणी शिरले परंतु हनुवटीच्या पातळीच्या जवळच राहिले. आम्हाला ह्या अनुभवाचा पुरेपूर आनंद मिळावा म्हणून, गोताखोरांनी आम्हाला समुद्राच्या आत फिरायला नेले. आम्ही जिथे उतरलो तिथे समुद्राची पातळी जवळ जवळ १२ फूट खोल होती. 

हॉलिवूड मध्ये समुद्री जीवांवर भितीदायक चित्रपट नियमितपणे काढतात ते चित्रपट बघून मलाही असं वाटलं की आता समुद्रात गेल्यावर कोणी भयावह प्राणी आपल्यावर आक्रमण तर करणार नाही ना? चित्रपटांचा परिणाम कधी कधी मोठ्यांवरही होतो पण आम्ही ज्या भागात समुद्राखाली चालणार होतो ते ठिकाण बंदिस्त करण्यासाठी त्या जागेभोवती जाळी लावली होती, जी मला दिलासा देणारी होती!

असो! त्या निळ्या स्वच्छ पाण्यात, पायाखाली मऊ मऊ रेती आणि चहू बाजूने लगबगीने जाणारे रंगीबेरंगी मासे. एखादी मायानगरीच जणू! ते सोडून तिथे रंगीत कोरल होते, आजूबाजूला आलेल्या पाण्यातील वेली आणि छोटी झाडे देखील होती. एका दगडावर एक विशाल क्लाम पण होता.

या जलमय जीवनाचा इतक्या जवळून अनुभव घेणे म्हणजे स्वर्गीय आनंदच जणू . काचेच्या भिंती नाहीत, गर्दी नाही की कुठले अडथळे नाहीत. आम्ही त्यांना स्पर्श देखील करू शकत होतो! समुद्राखाली घालवलेले ते 45 मिनिटे अविस्मणीय होते.

समुद्राच्या अंतरंगातील हा प्रवास म्हणजे त्या जलचर प्राण्यांच्या राज्यातील माझ्यासाठी उघडलेली एक खिडकी होती आणि मी पुन्हा एकदा या प्रवासाच्या प्रेमात पडले.