Categories
काही आठवणीतले

मोखाड्याचा बोहाडा

मोखाड्याचा बोहाडा
प्रत्येक सणाची, उत्सवाची आपल्याकडे विशेष अशी संस्कृती आहे. अजूनही काही खेड्यांमध्ये वंशपरंपरागत चालत आलेल्या काही मजेशीर पण ज्ञानप्रबोधन करणाऱ्या आणि आपल्या सांस्कृतिक प्रथा जतन केलेल्या रूढी पाळल्या जातात. एवढ्यातच होळी सण झाला. होळी संबंधित तर खूप वेगवेगळ्या रूढी, प्रथा दिसून येतात. एका माझ्या नाशिकच्या मित्राने अशाच एका बोहाडा या उत्सवाचे फोटो आणि व्हिडीओ share केले. इतके वर्षे नाशिक मध्ये राहूनही नाशिकबद्दलच्या या गोष्टीची मला अजिबातच कल्पना नव्हती. अर्थात उत्सुकता शिगेला पोहोचली. थोडी त्याच्याकडून,थोडी गूगल साहेबांकडून मी माहिती मिळवली. खरंच किती विविधता आहे आपल्या संस्कृतीमध्ये!!! आदिवासी लोकांनाच नाही तर आपल्यालासुद्धा या परंपरांचा सार्थ अभिमान वाटायला हवा. तर या उत्सवाबद्दल मला मिळालेली माहिती☺️

नाशिक पासून 60 km वर मोखाडा गाव आहे, ते आता पालघर जिल्हयात आहे. त्रिंबकेश्वरच्या पुढे. तेथे होळी पासून 7 दिवस किंवा रंगपंचमी पासून 4 दिवस रामायण महाभारत या महाकाव्यांमधील पात्रे घेऊन गावाची वेस ते गावदेवीचे मंदिर अशी मिरवणूक नाचत नाचत आणतात.

मोखाड्याचा बोहाडा
संकलित छायाचित्रं.


गावाच्या परंपरेनुसार प्रत्येक घराला ठरवून दिलेले पात्राचे सोंग घ्यायचा मान असतो. ती लोक अभिमानाने तशी सोंग वर्षानुवर्षे घेत असतात.


गावकरी, पाड्यातील आदिवासी आणि बघ्यांची प्रचंड गर्दी ,चैतन्य आणि उत्साहपूर्ण वातावरण, आनंद, सणासारखी किंबहुना त्याहुनही जास्त धामधूम ह्या चार दिवसांमध्ये असते. शेवटच्या दिवशी मंदिरातील पुजारी देवीचा मुखवटा धारण करून गावात मानाच्या घरी दर्शन द्यायला जातात आणि परत मंदिरात येऊन उत्सव समाप्त होतो.


ठाणे जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासी पट्ट्यातील गावात नुकताच ‘बोहाडा’ उत्सव पार पडला. सुमारे २०० वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा जगंदबा यात्रा उत्सव ‘बोहाडा’ म्हणून ओळखला जातो. हा उत्सव होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांपासून सुरू होऊन सात दिवस चालतो.
मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे ‘बोहाडा’ हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेषभूशा परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात. कागदाचा लगदा व जंगली झाडपाला वापरून देव-दानवांचे मुखवटे तयार केलेले असतात. सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगं काढली जातात. गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणुकीने यात्रेची सांगता होते.


काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे


गावात मंदिराच्या पुढे गावातील लोक कुठलाही मोबदला न घेता ह्या पात्रांना रंगवत (make up) असतात, तेही बघायला मजा येते. मंदिराच्या बाहेर नाच्या रात्रभर नाचत असतो, तो filler चे काम करत असतो, दोन सोंगांच्या मधल्या वेळात हा नाच्या पायाचा किस पडेपर्यंत ( ती ही एकच स्टेप) नाचत असतो. आदिवासी लोक विशिष्ठ पारंपरिक गाणी तार सप्तकात म्हणत असतात, रात्र जसजशी चढते तसतशी गाणी आणि नाच्याचा चाळांचा आवाज चढत जातो. हल्ली filler म्हणून लायटिंगचा विंचू, भुतं इत्यादी अनेक “item” लोकांना आकर्षित करत आहेत.
वेगवेगळ्या पाड्यावरचे आदिवासी आबालवृद्ध तरुण तरुणी एक कांबळे घेऊन दुपार पासून गावातल्या मिरवणुकीच्या रस्त्यावर खास जागा बघून ठाण मांडतात. अंतरा अंतराने येणाऱ्या सोंगांना झोपेने जड पडलेल्या डोळ्यात साचवून घेत असतात. आता घराघरात tv आला तरी बोहाड्याच्या सोंगांचे आकर्षण आजही तितकेच आहे. टेंभ्याच्या(चाफ्याची(च) फांदी घेऊन कापड कच्च्या तेलात भिजवून ठेवलेले मशालीसारखे टेम्भे) प्रकाशात कलाकार बघताना झोपने तारवटलेले डोळे विस्मयाने तेजोमय होतात. अवर्णनीय अनुभूती पूर्ण रात्रभर मिळते.


बोहाडामध्ये भाग घेतलेल्या सोंगांना छान नटवले जाते. बोहाडा सादर होण्याआधी देव-देवतांची सोंग कलाकार करतात. राम लक्ष्मण त्राटिका सादर केली जाते. सातव्या दिवशी विशेष मोठा बोहाडा असतो. त्याची सुरुवात गणपतीच्या सोंगाने होते. कृष्णाने धारण केलेला मच्छ अवतार आदिवासींना विशेष भावतो. बोहाडासाठी आदिवासींची तुफान गर्दी हे दरवर्षीचेच चित्र आहे. हनुमानाचे सोंग गदा फिरवत येते तेव्हा त्याला आपसूकच वाट मोकळी करून दिली जाते.
आजकालच्या कृत्रिमतेच्या दुनियेत जिथे सगळे चित्रात बघण्याची मुलांना सवय झाली आहे, तिथे ही सोंगं घेतलेली जिवंत माणसे बघताना खरंच खूप छान अनुभूती मिळते यात काही शंकाच नाही…धकधकीच्या जीवनातूून थोडा बदल….आपणही एकदा तरी अनुभवायलाच हवे ना!!!
सुज्ञा
Heritage of India….