Categories
माझा कट्टा

वंदे मातरम्

हा पोस्ट आधी http://shwetanup.blogspot.com संकेतस्थळावर प्रकाशित झाला होता आणि त्या लेखिकेच्या परवानगी ने हा लेख इथे पुन्हा प्रकाशित केला गेला आहे .

” वंदे मातरम् “

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमच्या सोसायटीच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात बऱ्याच वर्षांनी “वंदे मातरम्” म्हणण्याचा योग आला. योग आला म्हणजे मीच तो आणवला 😀. आधी मैत्रिणींना विचारले की सगळ्याजणी मिळून देशभक्तीचं एखादं गाणं म्हणू. पण नेमका कुणालाच ह्यावेळेस सरावाला वेळ नव्हता. मग मी ठरवलं निदान ‘ वंदे मातरम् ‘ म्हणून तरी आपला झेंडा रोवू. तसा माझा आणि गायनाचा दूर दूर पर्यंत सुद्धा काहीही संबंध नाही हां. पण हौस दांडगी की काहीतरी म्हणायचेच , आवाज कसा का असेना 😀.

     २६ जानेवारीला सकाळी लवकर नेहमीच्या वेळेआधीच अर्धा तास आमच्या सोसायटीचा  सेक्युरिटी स्टाफ आणि हाऊसकीपिंग च्या मदतनीस बायका आल्या. त्यांनी अगदी उत्साहाने सोसायटीची साफसफाई केली आणि मस्त मोठी रांगोळी काढली. त्यांचा सुट्टीचा दिवस असूनही त्यांनी हजेरी लावली म्हणून त्यांचं विशेष कौतुक वाटले. माझ्याही घरातल्या मदतनीस आम्माने आदल्यादिवशीच मला सांगितले होते, ‘आम्मा, नाळे रजे बेकु’. तिला तिच्या मुलांच्या शाळेत झेंडावंदन आणि मुलांच्या वक्तृत्वाच्या स्पर्धा पहायला जायचे होते म्हणाली. तिचा उत्साह बघुन मला खूप कुतूहल वाटले आणि आनंदही झाला. बिनधास्त घे म्हणाले मी सुट्टी. प्रत्येकाने हा दिवस आपापल्या परीने साजरा करायलाच हवा, नाही का ?

     प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. भाषणं झाली. लहान मुलांची गाणी , नाच असं सगळं सादरीकरण पार पडलं. मग काय मीही घेतला माईक हातात. मनातल्या मनात म्हंटले, “Howz the Josh?”….”High Sir “… मग केली सुरवात  ‘ वंदे मातरम्’ म्हणायला. तेंव्हा मला माझ्या शालेय जीवनातल्या प्रजासत्ताक दिनाची आठवण झाली.

     आम्ही शाळेत असताना आमचा गणतंत्र दिवस अगदी थाटात साजरा व्हायचा. सोनेरी दिवसांमधले ते सोनेरी क्षण. नवचैतन्य घेऊन येणारी ती प्रसन्न सकाळ. आम्ही भावंडं पहाटे लवकर उठून लगबगीने आवरायला लागायचो. आई माझ्या केसांना भरपूर तेल लावून घट्ट दोन वेण्या घालून देऊन त्या काळ्या रिबिनीने गच्च बांधायची. काय बिशाद त्या दोन वेण्यांची की दिवसभरात विस्कटतील. 😀… स्वच्छ धुवून इस्त्री केलेला गणवेश घालून वर्गाचे किंवा शाळेचे सेक्रेटरी पद मिळाले असेल तर तसा मानाचा पिवळा/केशरी बिल्ला सेफ्टी पिन ने गणवेशावर लावून दिवसभर रुबाबात मिरवायचो. सगळं आवरून सव्वा सहा साडे सहाच्या दरम्यान घरातून निघून, जाता जाता वाटेत मैत्रिणींना हाका मारत एकत्र मिळून शाळेत पोहचायचो. कुठल्याही परिस्थितीत पावणे सात पर्यंत शाळा गाठायचो. वेळेच्या बाबतीत आमची आई आणि शाळा दोघीही एकदम कडक शिस्तीच्या बरका. कुठल्याही परिस्थितीत वेळ ही पाळलीच पाहिजे असा दंडक होता. आमची अगदी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था असायची.😀 शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना कसा महादरवाजा आणि त्यात एकच माणूस वाकून जाऊ शकेल असा एक छोटा दरवाजा असायचा अगदी तसंच पण दोन लोखंडी दरवाजे आणि त्यातच असलेला एक छोटा दरवाजा आमच्या शाळेलाही होता. वेळ म्हणजे वेळ. उशीर झाल्यामुळे रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर हिरकणीला कडा उतरून घरी तिच्या बाळा जवळ पोहचावे लागले होते. तसंच आम्हाला शाळेला जायला पाच मिनिट जरी उशीर झाला तरी छोट्या दरवाजातून आत प्रवेश तर मिळायचा पण मैदानाला चांगल्या पाच फेऱ्या पळत मारल्यावरच आपापल्या वर्गात जायची परवानगी मिळायची. त्यामुळे शक्यतो वेळेआधीच पंधरा मिनिटं शाळेत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असायचा. त्यावेळी जाचक वाटणारे हे शिस्तीचे नियम आता मात्र पदोपदी ते उपयोगी पडतात. वेळेचं महत्त्व जाणवून देतात.

     शाळेत पोहचल्यावर वर्गात जाऊन आपापल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसायचो. वर्गशिक्षिका बाईंनी हजेरी घेऊन झाली की उंचीप्रमाणे रांगा करून शाळेच्या मैदानावर ओळीत जाऊन ध्वजारोहणाच्या स्तंभाच्या दिशेने तोंड करून उभे राहायचो. पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व वर्ग आणि प्रत्येक वर्गाच्या वर्गशिक्षिका एकदम शिस्तीत तिथे उभे ठाकायचे. ध्वजारोहणाची जागा सडा रांगोळी ने सुुुशोभित केलेेली असायची.

     ठरलेल्या वेळेत मुख्याध्यापक आणि आमंत्रित प्रमुख पाहुणे ध्वजारोहणासाठी उपस्थित व्हायचे. सर्वांना ‘सावधान’ अशी आज्ञा दिली जायची. एकदम शांततेत आणि सावधान स्थितीत आम्ही पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होणारा ध्वजारोहणाचा सोहळा डोळे भरून पाहायचो. ढोल ताशांच्या गजरात ध्वजारोहण व्हायचे. आम्ही  सारेजण एकसूरात मोठ्या आवाजात राष्ट्रगीत आणि त्या पाठोपाठ प्रतिज्ञा ही म्हणायचो. “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ……”. प्रार्थना म्हणत असताना देशप्रेमाने ऊर अगदी भरून यायचा. उपस्थित सर्व जण फक्त आणि फक्त भारतीयच असायचे. गरीब श्रीमंत, जात पात, कुठलेही भेदभाव मनालाही शिवायचे नाहीत. राष्ट्रधर्म हाच श्रेष्ठ धर्म ही जाणीव व्हायची. स्फूर्तिदायक असं ते वातावरण असे. आमच्या इतिहासाच्या शहाणे बाईंनी अगदी रंगवून सांगितलेल्या क्रांतिकारकांच्या, शहीदांच्या शौर्य कथा आठवायच्या. आपसूकच सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावायच्या. झेंडावंदनाने त्या दिवसाची सुरुवात अशी एकदम प्रेरणादाई होई.

 वंदे मातरम्

      आलेल्या पाहुण्यांचे आणि मुख्याध्यापकांचे भाषण असायचे. त्या पाठोपाठ आमच्या निरनिराळ्या स्पर्धा असायच्या. वक्तृत्व, खो-खो, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक , थाळी फेक , स्काऊट / गाईड मध्ये असू तर खरी कमाईचा सुधा दिवस असे. सगळं पार पडलं की परत आम्ही आपापल्या वर्गात जमत असू. शाळेचे शिपाई काका मोठा बॉक्स घेऊन येत असत. त्यात तळलेल्या पोह्यांचा खमंग, झणझणीत चिवडा आणि दोन बुंदीचे लाडू अशी भरलेली पाकीटं असत. प्रत्येकीला एक एक पाकीट बाई देत असत. सोहळ्याची सांगता ‘ वंदे मातरम् ‘ गीतानेच होत असे.

     एरवीही त्यावेळी आमच्या शाळांचा रोजचा दिनक्रम राष्ट्रगीत , प्रतिज्ञा आणि प्रार्थनेने सुरू होत असे आणि ‘ वंदे मातरम् ‘ गीत म्हणूनच संपत असे. प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थिनींना आळीपाळीने राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् म्हणण्याची संधी दिली जाई. त्यासाठी गायन विषय घेतला असावा अशी काही अट नव्हती. मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये जाऊन माईक समोर ग्रुपने उभे राहून आम्ही ते म्हणत असू. ती संधी मिळाली की वर्गापुढे आमची कॉलर एकदम ताठ होत असे. राष्ट्रगीत म्हणतानाचा आपला आवाज आपली आख्खी शाळा ऐकणार ह्यात एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत असे. आता असं वाटतं  ते दिवस परत एकदा अनुभवायला मिळावेत.

     हल्ली मात्र शाळांमध्ये राष्ट्रगीत कधीतरीच किंवा विशेष प्रसंगीच म्हटले जाते. तो पूर्वीसारखाच शालेय दिनक्रमाचाच एक भाग व्हावा. सिनेमा थिएटर मध्ये मात्र आता सिनेमाच्या आधी सुरवातीला राष्ट्रगीत लावतात हा सकारात्मक बदल मला फार आवडला. 

आता आपण मोठेपणी आपल्या दैनंदिन जीवनात जरी रोज ‘जन गण मन’, ‘वंदे मातरम्’, म्हणत नसलो तरी आपणच आपल्या आचरणातून देशाचा सन्मान करून देशप्रेम जोपासायला हवे. आपण ही जबाबदारीने आपला देश स्वच्छ सुंदर बनवायला हातभार लावायला हवा. पर्यावरणाचा आदर राखायला हवा. विहिरी, नद्या, ओढे, समुद्रा मध्ये निर्माल्य विसर्जित करणं, कचरा टाकणं, दूषित पाणी सोडणं, रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, कचरा फेकणं थांबवले पाहिजे. निदान आपल्या आजूबाजूचा परिसर श्रमदान करून स्वछ ठेवणं, वाहतुकीचे सर्व नियम पाळणं, कुठलेही सरकारी काम लाच न देता किंवा घेता केले पाहिजे. अशा देशहिताच्या कामांची सुरुवात एक जबाबदार नागरीक म्हणून आपण स्वतःपासूनच करूयात. हेच खरं भारतमातेला वंदन असेल आणि हाच आपल्या भारतवर्षाच्या ध्वजाचा खरा सन्मान असेल.
आपल्या भारतमातेला आणि ज्यांच्यामुळे आपण आपले स्वातंत्र्यदिन , गणतंत्र दिन आनंदाने साजरे करू शकतो त्या सैनिक बांधवांना त्रिवार वंदन.🙏🙏🙏

वंदे मातरम् । वंदे मातरम् ।
सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्
सस्य श्यामलाम् मातरम्।
वंदे मातरम्। वंदे मातरम्।
शुभ्र ज्योत्स्नाम् पुलकित यामिनीम्
फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ।
वंदे मातरम्। वंदे मातरम्। वंदे मातरम्।

भारत माता की जय!🇮🇳🙏

©सौ.श्वेता अनुप साठये