Categories
पाककृती

सरप्राइझ हार्ट केक

56

आज वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, अर्थात काही जणांचं मत आहे की प्रेम करायला काय अमुक एक दिवस असतो का? हे सगळं नुसत फॅड आहे. मी म्हणते असुदे ना तेव्हडीच एक दिवस गम्मत,डेली रुटीन मधून थोडा चेंज.
तर आज तुम्हाला तुमच्या वॅलेंटाईन साठी एक मस्त नाविन्यपूर्ण आणि सोप्या सरप्राइझ हार्ट केक ची रेसिपी घेऊन आली आहे.

सरप्राइझ हार्ट केक

साहित्यः
बटर – १२० ग्रॅम
बारीक साखर – ३/४ कप
अंडी – २
मैदा / कणिक – १ कप
बेकिंग पावडर – १ टीस्पून
व्हॅनिला इसेन्स – १ टीस्पून
दूध – ५ टेबलस्पून
खाण्याचा लाल रंग – तुम्हाला हवा तसा

कृती :
सर्व प्रथम, आपला ओव्हन १८० डिग्री ला प्रिहिट करून घ्या. आता एक मोठे बाउल घ्यावे, त्यात बटर आणि साखर घेऊन २ मिनिट फेटावे. त्यानंतर एकावेळी एकच असे दोन्ही अंडी त्यात घालून फेटून घ्यावी. ते छान फुलून येईल. ह्यासाठी तुम्ही हॅन्ड मिक्सर किंवा बिटर वापरू शकता. आणि मग त्यात व्हॅनिला इसेन्स आणि दूध मिसळावे. एका वेगळ्या कोरड्या भांड्यात मैदा/कणिक आणि बेकिंग पावडर चाळावे. आता मिश्रणात हे सर्व कोरडे जिन्नस मिसळावे. गुठळ्या होऊ न देता नीट कालवावे. आपले केक चे बॅटर तयार आहे.
रेड हार्ट शेप साठी साधारण १,१/२ कप बॅटर एका लहान बाउल मध्ये घेऊन त्यात २-३ थेंब लाल रंग मिसळावा. तुम्हाला जितका रंग गडद हवा त्याप्रमाणे तुम्ही रंग कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण एक ग्रीस्ड पॅन मध्ये ओतून १५-२० मिनिट्स बेक करावे. केक थंड झाल्यावर हार्ट शेप च्या छोट्या कुकी-कटर ने छोटे हार्ट कट करावे. कुकी-कटर नसल्यास तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण हार्ट शेप कट करू शकता.
आता बेकिंग ट्रे मध्ये पेपर कप ठेवा. त्यावर एक खूण करून ठेवा. म्हणजे बेकिंग नंतर आपल्या सरप्राईज हार्ट कसा ठेवलाय ते कळते.
सर्व कप मध्ये 2 टेबलस्पून बॅटर ओतावे. आता त्यात आपले रेड हार्ट बसवावे. ते असे बसवावे की हार्टची समोरील बाजू आपण कप वर केलेल्या खुणेच्या समोर यावी (वरील फोटो मध्ये हार्ट शेप जसा उभा दिसतो आहे त्याप्रमाणे तो बॅटर मध्ये ठेवावा). आता परत 1 टेबलस्पून बॅटर प्रत्येक कप मध्ये ओतावे. आणि सर्व कपकेक २०-२५ मिनिटांसाठी बेक करावे. थंड झाल्यावर छान आईसिंग ने सजवून सर्व्ह करावे. आणि कट करताना आपण केलेल्या खुणेवरून कट करावे बघा तुमचा व्हॅलेन्टाईन एकदम खुश होऊन जाईल ह्या सरप्राईज ने.
बघा नक्की करून आणि कळवा आम्हाला, कसं वाटलं ते.