Categories
खाऊगिरी पाककृती

श्रीखंड टार्ट

69
श्रीखंड टार्ट

नुकताच गुढी पाडवा संपन्न झाला. नवीन वर्षाचा सण लॉक डाउनमध्ये सुद्धा लोकांनी उत्साहात साजरा केला. आम्ही पण गुढी पाडवा साजरा केला. पण ह्या वेळेचा गुढी पाडवा जसा आगळा वेगळा होता तसेच आमचे पाडव्याचे गोड़ धोड सुद्धा!

माझ्या मुलीला घरात कसं रमवायच हा विचार  मी गुढी पाडवाच्या सुमारास करत होते. आता लहान मुलांना किती आणि कसं समजावणार ना ‘lockdown ‘ च महत्व!

आता तिला माझ्यासारखी स्वयंपाक, नवीन पदार्थ, आणि मुख्य म्हणजे नवं नवीन पदार्थ खायला आवडतात म्हणून म्हंटलं आपलं नेहमीच श्रीखंड पुरी एका नवीन रूपात करून बघूया तिच्या मदतीने! 

नेहमीच गुढी पाडवा म्हटलं की श्रीखंड पुरी हा बेत ठरलेला. ह्यावेळेस तोच बेत जरा मॉडर्न प्रकराने प्रेसेंट करायचा ठरवलं. एक ” one byte dessert” तयार केलं. माझ्या मुलीला जेव्हा हे सांगितले तेव्हा ती खूपच आनंदली. आज मी त्याचीच रेसिपी लिहीत आहे – श्रीखंड टार्ट !

एकतर श्रीखंड पुरी तिच्या आवडीचा पदार्थ .त्यात परत आपल्याला मदत करायला मिळणार म्हणजे दुधात साखरच! 

ह्या रेसिपी मध्ये कुठेही, मैदा, बेकिंग पावडर किंवा सोडा वापरला नाही आहे हे ह्याचे वैशिष्ट्य.

श्रीखंड टार्ट रेसिपि

साहित्य

कणिक – १ कप

बटर – १/४ कप

पिठी साखर – १ टी. स्पून.

मीठ चवी नुसार.

केशर श्रीखंड – 1 कप

कृती

प्रथम एक बाऊल मध्ये कणिक व बटर घ्यावे. ते हाताने चांगले चोळून घ्यावे.मग त्यात पिठी साखर व मीठ घालावे. लागेल तसं पाणी घेऊन छान घट्ट मळावे. कणकेचा हा गोळा झाकून १५-२० मिनिटे झाकून ठेवावा. मग टार्ट चे मोल्ड मिळतात ते घ्यावे. कणकेची छोटी पुरी लाटून त्या मोल्ड मध्ये ठेवावी. हाताने चांगल्या प्रकारे दाबून त्याला त्या मोल्ड चा वातीसारळ आकार येऊ द्यावा. असे सर्व मोल्डस तयार करावे. हे टार्ट प्रीहिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअस वर 10 मिनिटे बेक करावे. छान गोल्डन ब्राउन रंग यायला हवा.

टार्ट थंड झाल्यावर लगेच मोल्ड मधून बाहेर काढावेत.

आता सर्व्ह करताना, एक पायपिंग बॅग मध्ये श्रीखंड भरून घ्या. आणि टार्ट मध्ये छान भरा. केशर आणि बदाम पिस्त्यांच्या कापाने सजवा.

अश्या प्रकारे आमचं श्रीखंड टार्ट तयार झालं.. मुलीने ते लगेच गुढी समोर नैवेद्य दाखवून .. तिच्या छोटा भीम आणि चुटकी ला सुद्धा खाऊ घातलं.. मग म्हणाली टेस्टी भी और यम्मी भी ! एक दिवस सत्कारणी लागला. तिला देखील शिकायला मिळालं.

आहे कि नाही अगदी सोप्पं? तुम्ही पण करून बघा हा पदार्थ आणि खाली कंमेंट्स मध्ये मला नक्की कळवा कस झाल ते!