Categories
काही आठवणीतले

सय- बुचाच्या फुलांची!!!

पांढरा रंग तर खूपच सुंदर आणि त्यातून पांढरी सुवासिक फुले तर निसर्गाची देणगीच आपल्याला!!! सुवासिक जाई, जुई, मोगरा, चमेली, कुंद, निशिगंध, प्राजक्त…आणि किती तरी! वास न येणारी चांदणी, तगर, बटमोगरा, काटेकोरांटी….असंख्य नावे आहेत…. पण या सगळ्यात एक वेगळे आणि सहज उपलब्ध असूनही तसे दुर्लक्षिले गेलेले एक फुल म्हणजे बुचाचे!! रस्त्यावर पावसाळ्यात पडलेला खच कायमच आपले लक्ष वेधून घेतो. लहानपणी शाळेत जात येताना वाटेवर बुचाची झाडे होती. मस्त सुगंधित वाटायचे. आम्ही मैत्रिणी गोळा करायचो फुले आणि एका मैत्रिणीला वेणी करता यायची त्याची…रोज एक एक वेणी करून बाईंना द्यायचो डोक्यात माळायला… देताना आमचे हात आणि घेताना बाईंचे मन, त्या सुंदर परीमळाने आनंदित, सुगंधित व्हायचे…अजूनही शाळेजवळ ते झाड आहेच….आणि मनात आठवणी !!!

फोटो क्रेडिट- सुज्ञा.


बुचाचे झाड तसे सर्वत्र आढळते..सरळ सरळ उंच २५-३० फूट उंचीची झाडे असतात. सहा महिने तरी बहर असतोच…माझ्या घराजवळ असलेल्या बस स्टॉप पाशी एक मोठे जुने झाड आहे. तिथून जात येताना मन प्रफुल्लित होते. खाली पडलेल्या फुलातून एक तरी उचलल्याशिवाय पाय निघतचं नाही तिथून!
बुचाची फुले पांढरीच, पण क्वचित गुलाबी, पिवळी छटा पण दिसते. फुलांचा देठ हा बारीक नळीसारखा आणि साधारण दोन ते अडीच इंच लांब असतो. फुलाला पाच पाकळ्या असल्या तरी त्यापैकी दोन पाकळ्यांची.. एकच पाकळी वाटावी अश्या एकमेकांना जोडलेल्या असतात. झाडावर फुलांचे घोस लटकलेले असतात, पण झाडावर न राहता ती खालीच पडतात. पूर्ण बहरात झाडाखाली फुलांचा गालिचा सुंदर दिसतो. सुगंध आजूबाजूच्या परिसरात दरवळतो… खूपच मस्त वाटते.
आज मात्र पु. ल.देशपांडे उद्यानात त्याचा खच पडलेला पाहून थोडे वाईट वाटले…एकतर खूप पाऊस त्यामुळे फुलांचा अगदी चिखल झाला होता….चालणारी लोक त्यांना पायदळी तुडवून जात होती….साहजिक आहे म्हणा.. इतकी फुले ताजी -शिळी फुलं एकत्र. कोण किती काळजी घेणार ना!!! पण तरी वाकून मी ताजी नुकतीच पडलेली फुले उचलली आणि एक गुच्छ केला आणि घरी घेऊन आले…माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या….
जी गोष्ट मुबलक प्रमाणात असते त्या गोष्टीचे आपल्याला महत्त्व नसते हेच खरे.. नवरात्रात गजरे महाग मिळाले तरी आपण घेतो पण निसर्गाचीच देणगी असलेली ही फुले मात्र दुर्लक्षित करतो….कदाचित गाडी वरून जा ये होत असल्याने पायी जाताना दिसणारी हि फुले आपल्या नजरेत येतचं नसावीत. ३-४ तास झाले तरी ती फुले ताजीच आहेत…का त्याची वेणी करून आपण देवाला किंवा डोक्यात घालत नाही?असा प्रश्न मला पडला.

ते काहीही असो आज या फुलांच्या स्पर्शाने आणि सुवासाने मन भूतकाळात गेले आणि प्रसन्न झाले…

निसर्गाची किमया आणि बालपण!!!!

सुज्ञा