Categories
माझा कट्टा

Misson कंटाळा – ह्या आयांने शोधला आहे उपाय

माझी आई सध्या माझ्याकडे आली आहे. आपल्या मुलांकडे आलेल्या प्रत्येक पालकांसारखीच तिचीही व्यथा आहे. स्वतःच routine इथे बसत नाही. माझ्या routine मध्ये तिची लुडबुड होते, असं वाटतं पण काही केलं नाही तरी कंटाळा येतो! मग काय करावे?

 मला तिची व्यथा कळत होती, पण प्रत्येक मुलासारखे तिने माझ्याकडे राहावं, मला तिचा सहवास मिळवा असंही वाटत होत. दर वर्षी ती आल्यानंतर सुरवातीचे काही दिवस मजेत जातात, पण मग कंटाळा हळूच डोकवायला लागतोच.

आमच्या society मध्ये चालायला तशी बरीच मोकळी जागा आहे. छोटीशी बाग आहे. जिथे निवांत बसायला बाक आहेत. तिला रोज संध्याकाळी चक्कर मारायची सवय आहे. संध्याकाळचा तो एक तास तिचा असतो. तिचा तो एक तास सहसा अश्या निसर्ग रम्य आणि शांत परिसरात जात असत. 

ह्या वर्षी ती आली तेव्हा तिने स्वतःच एक टाइमटेबल करून आणले होते. सकाळी मी अमुक अमुक कामे घरात करीन असं तिने जाहीर केलं. हा दर वर्षीचा प्रश्न असल्यामुळे तिने ह्या वेळी त्या वर तोडगा काढायचा असं ठरवूनच आली होती. 

मला मदतीला ती आहे म्हंटलयावर माझी कामे पटापट आवरत. मग मला तिच्या बरोबर गप्पा मारायला जास्त वेळ मिळतो .

संध्याकाळचे ५वाजले की मात्र ती आवरायला जायची. मग ती चक्कर मारायला जायची. मी मुलांना खेळायला घेऊन जायची त्यामुळे खाली तिची माझी भेट होत नसे.

काल ती घरी आली तेव्हा म्हणाली, उद्या मी आणि माझ्या मैत्रिणी डोसा खायला शेजारच्या हॉटेल मध्ये जाणार आहोत. म्हणून संध्याकाळी यायला उशीर होईल आणि जेवणाचं पण फार काही खरं नाही.

तिचे हे वाक्य ऐकून मी चपापलेच! आईला आमच्या सोसायटीमध्ये मैत्रीणी होत्या. हे मला माहीतच नव्हतं ! “अगं तू हवं तर त्यांना घरी बोलावू शकतेस! आणि कोण आहेत ह्या मैत्रीणी? मला ही भेटायला आवडेल त्यांना!” आई हसली आणि म्हणाली, आम्हाला मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत आणि एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे. तोही celebrate करायचा आहे. 

तिने फोन सुरू केला आणि मला काही फोटो दाखवले. ५ बायका, ज्या समवयस्क होत्या. ह्यांचे विषय ही सारखे होते आणि येणारा कंटाळा ही सारखाच होता. कोणी आपल्या मुलाकडे आले होते. तर कोणी आपल्या मुलीकडे. २ जणी नुकत्याच कायमच्या मुलाकडे राहायला आल्या होत्या. 

women above 50 finding their way

” आम्ही रोज भेटतो. काही सुख दुखाच्या गोष्टी शेअर करतो. नवीन काही कळलं तर सांगतो आणि आपला दिवस कसा आनंदात जाईल हे बघतो. मी खूप काही शिकले सुद्धा ह्यांच्याकडून” आई म्हणाली.

एक काकू,  वय वर्ष ७० असून घर बसल्या ट्रान्सलेशनच काम करतात . त्यांचं मराठी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे फावल्या वेळ त्या अश्या प्रकारे सत्कारणी लावत होत्या. तर दुसऱ्या काकू ज्या गुजरातहून आल्या होत्या. त्या नवीन नवीन हस्तकलेच्या गोष्टी शिकून, आपल्या नातवंडांना आणि इतरांना देत होत्या. 

केरळ मधून आलेल्या काकूंनी तर कमालच केली होती. त्यांनी insurance चा अभ्यास करून परीक्षा देऊन, आता इन्शुरन्स एजंटच काम त्यांनी सुरू केले होते.

लखनौ मधून आलेल्या काकूंना स्वयंपाकाची भारी हौस. त्यांनी परप्रांतातून आलेल्या आणि सध्या एकटेच राहत असलेल्या बऱ्याचश्या society मधील मुला मुलींना घरचा डबा द्यायचा उद्योग सुरु केला होता. 

ह्या बायका रोज भेटायच्या, मनमुराद गप्पा मारायच्या, कोणी नवीन पदार्थ करून आणायच, तर कोणी वाचायला किंवा ऐकायला काही चांगलं असेल, तर ते सुचवायचे. कधी जुने किस्से निघत तर कधी जुन्या आठवणी.

ह्या सगळ्या बायकांच्या जिद्दी कडे पाहून आश्चर्य वाटले आणि खूप कौतुक सुद्धा! ह्यांना एक दुसऱ्याची भाषा काही येत नव्हती, पण संवाद साधता आला होता. परप्रांतात, आपल्या आप्तेष्ट आणि शेजार पाजारहुन लांब असूनही ह्यांनी नवीन मैत्रिणी जोडायच धाडस केल होतं ! ‘मी काय करू’ पासून ते ‘मी अजून सुद्धा मनात आणलं तर काही करू शकते’ पर्यंतचा प्रवास फार सहज रित्या पार पडला होता. आता मला आईच्या कंटाळ्याची काळजी नव्हती.