Categories
कथा-लघु कथा

म्हाद्या! भाग २

65

म्हाद्या या कथा मालिकेमध्ये …मागच्या म्हाद्या भाग १ मध्ये आपण माली आणि म्हाद्याची प्रेम कहाणी कशी सुरू झाली आणि ती त्यांच्या लग्नापर्यंत सुफळ संपूर्ण झाली ते वाचले ..आज त्याचा पुढचा भाग वाचूया..

म्हाद्या - a short story in marathi
चित्रकार – उमा लवंदे

आता लग्न झालं म्हणून दिवसाकाठी काही पैसे शिल्लक असावेत या हेतूने म्हाद्याने गावातल्या सरपंचाच्या घरात घरगडी म्हणून काम बघायचं ठरवलं, तेवढीच कामाची कायमची सोय होईल अशा विचाराने सरपंचाचे घर गाठलं. सरपंच पांढरा स्वच्छ कुर्ता-पायजमा, डोक्यावर घट्ट फेटा बांधून बसलेले, म्हाद्याने बाहेरुनच विचारलं,” धनाजी साईब, येऊ का घरला? घरात हाईसा का”? 

सरपंच:” आर कोन हाय रं, सक्काळ सक्काळ? 

घरातल्याच एका गड्याकडे  हात दाखवून… ” ए, जा.. शिरप्या ..कोन हाय.. ते बघून ये”.

घरगडी बघून येतो,” साईब ते …तो म्हाद्या हाय”.

सरपंच: “आर कोन म्हाद्या? त्याचं काय काम माज्याकडं”? वैतागून सरपांचान त्याला आत पाठवायला सांगितलं.

शिरप्या: “म्हाद्या सरपंचांनी बोलीवल हाय” असा निरोप देत.. शिरप्या म्हाद्या ला घेऊन येतो… “साईब हा म्हाद्या”. 

मळकट कपडे घातलेला म्हाद्या खूर मांडी घालून हात जोडून सरपंचाच्या समोर जमिनीवर येऊन बसला…”काय रं, तुझं काय काम हाय माज्याकड”? मोठे डोळे करत आणि कपाळाला आठ्या पाडत सरपंचाने त्याला विचारलं. “साईब त्ये, थोड, बोलाईचं व्हत, म्हनजी.. म्या लगीन केलया “आता…

म्हाद्याचं बोलणं पूर्ण होतं तोवरच ” अरे वा, लगीन तुला कोनी मुलगी दिली रं, का पळवून आणलीस कोनाची?” जरा दरडावून सरपंचन विचारलं, “न्हाई न्हाई, तसं काय नाय बघा साईब.. ते लगीन झालं नाय का, म.. आता जरा जास्ती पैक लागत्याल ना म्हणान.. तुमच्या वाड्यात काही काम असशील ना तर मला ठेवशीला का कामावर? असं ईचारायचं व्हत” पैक तुम्ही द्याल तेवढं चालत्याल”. सरपंच विचार करत “बरं तुला काम हवय? काय काम करशीला, बागेत काम कराया जमाल का? बागेची साफसफाई झाड कापायची जमाल का? चोरी करायचा इचार पण मनात आणू नको जमणार असलं.. तर उद्यापसन ये कामाला?”

“व्हय, व्हय साईब करेन की  म्या.. येतो उद्यापासून”. असे म्हणत म्हाद्या सरपंचाच्या घरातून निघतो… तडक तो त्याच्या झोपडीवजा घरात पोहचतो,” ये माली.. म्या उद्यापासन सरपंचाच्या वाड्यावर जानार हाय कामासाठी जरा जास्तीच पैक मिळतील …”आर म्हाद्या पैक मिळत्याल पन किती मिळणार हाईत”? मालीन खूश होऊन त्याला विचारलं.

“तसं काय सरपंचन सांगितलं न्हाय, येक मईना येके ठिकाणी  काम तर मिळल… रोज कुठं नवीन काम शोधाया जाईच नव ..शिवाय सरपंचाचा वाडा म्हणजी.. उरलंसुरलं अन्न अस्सल… तर ते पन मिळाल न्हव आपल्याला”.. असा विचार करून दोघेही झोपले.

म्हाद्याचा कामावरचा पहिला दिवस….

दुसऱ्या दिवशी म्हाद्या भल्या पहाटे उठून धनाजीराव सरपंचाच्या वाड्यामध्ये कामासाठी म्हणून गेला..”साईब म्या आलो… सांगा काय काम करू”?
“आर जा ती बाग झाड सगळी… झाडाच्या फांद्या काप..सगळं काय आता म्याच सांगायचं  का? परत  ईचारायचं नाय ध्यानात आसू द्या” सरपंचाचा तोरा बघून म्हाद्या लागलीच बागेत पळाला.

“पर साईब..ते सामान लागल …बाग साफ कराया”.. असं विचारल्यावर सरपंच अजून चिडला “कुठून तरी घ्या.. आर..यांना प्रश्नच जास्त पडत्यात, आत जा इचार कुणालातरी, देतात सामान तुला कोनि तरी”.
सरपंच रागावून बोलला आणि बाहेर निघून गेला तसा म्हाद्या जरा  हिरमुसून  आत गेला आणि सामान घेऊन बाहेर आला आधी सगळी बाग स्वच्छ करून घेतली मग झाडाच्या फांद्या तोडल्या दुपारी थोडफार काहीतरी खाऊन, मग पुन्हा थोडं काम करून दमून तिथे बागेत एका झाडाखाली निजून गेला… थोड्यावेळाने तिथे सरपंच आला. त्याच्या कमरेत लाथ घालून ओरडला “काय रे झोपाया आला का तू हीथ? उठ कामाला लाग” तसा म्हाद्या खडबडून जागा झाला हात जोडून कळवळून म्हणाला ,”चुकलं साईब येक डाव माफी करा ..परत आस व्हायचं न्हाय”.असं म्हणून सरपंचसमोर उभा राहिला ..तसं सरपंचन त्याला घरी जायला सांगितलं. “साईब कामावरून काढू नका “? अशी विनवणी करत म्हाद्या तिथंच उभा राहिला.

आता यापुढे काय होईल? सरपंच त्याला कामावरून काढेल की नाही ?

ते तुम्हाला कळेल पुढच्या भागात! अर्थात म्हाद्या भाग ३ मध्ये .. तोपर्यंत वाचत रहा .. आणि गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा!

अमृता गाडगीळ-गोखले

By अमृता गाडगीळ-गोखले

नमस्कार, मी अमृता गाडगीळ-गोखले. मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मी ब्लॉग्सही लिहिते. मला लिखाणाची आवड आहे. मी कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करते. निसर्गामध्ये रमणं मला आवडतं, लहान मुलांच्या मनातले भाव जाणून घ्यायला मला आवडतं.