Categories
काही आठवणीतले

खाद्य भ्रमंती – गोष्ट जळगावच्या केळीच्या वेफर्सची !

यंदा दिवाळीत आम्ही सगळे माहेरच्या कुलदेवीला यावलला गेलो. भुसावळच्या पुढे यावल हे छोटेसे गाव आहे…. नाशिक धुळे रस्ता तर मस्तच, पुढे मात्र खूपच खड्डे… जळगावच्या पुढे भुसावळ आणि मग यावल चा रस्ता…. जळगाव तर केळींसाठी प्रसिद्धच!!! रस्त्याच्या दुतर्फा केळीच्या बागा डोळ्यांना सुखावत होत्या…
रस्त्यावर एक छोटीशी टपरी दिसली…. केळ्याच्या वेफर्सची…. आम्ही सगळे कुतूहल म्हणून खाली उतरून बघू लागलो…. त्या टपरीत एक जोडपे होते. तिथे शेड मध्ये… त्या ताई… मागच्या बाजूला ताजे वेफर्स करत होत्या आणि दादा बाहेर रस्त्यावर त्या गरम वेफर्सना तिखट मीठ लावून वजन करून विकत होता…ताज्या वेफर्सच्या वासाने जीभेला अगदी पाणी सुटले होते…

फोटो क्रेडिट- सुज्ञा.


सहाजिकच तायडे ताईशी गप्पा सुरु झाल्या.. रोज केळीच्या बागेतून कमीत कमी अर्धा क्विंटल किलो केळी आणून ते वेफर्स तयार करतात आणि फक्त जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना ते विकतात…. season मध्ये अजूनही आणतात… पण कोणत्याही दुकानात हॉटेल मध्ये नाही तर लागेल तसे रस्त्यावरच ते समोर तळून देतात… चुलीवरच्या कढईत! रोज त्यांना 10 ते 15 लिटर तेल लागते. चुलीची धग दिवसभर चालूच…. केळीची साले धारदार सोलण्याने पटापट काढून, ती तुरटीच्या पाण्यात टाकायची आणि मग किसणीने सपासप किसून कढईत डायरेक्ट सोयाबीन तेलात किसायची….बापरे!!!! इतक्या धारदार होत्या दोन्ही गोष्टी. मला भीतीच वाटली ..जेव्हा मी प्रयत्न केला वेफर्स करण्याचा तेव्हा!!!!😢 खरंच कमाल त्या बाईची, एकटी दिवसभर ते जोखमीचे काम करत होती…. हाताची बोटे पूर्ण काळी झालेली….संध्याकाळीच घरी जाऊन लिंबाने धुवायची…. सगळे काम दोघेच करणार… मदतनीस ठेवणे पण परवडत नाही… जवळच्या गावातून ते येतात… त्या ताई मला सहज जीवनाचा सार सांगून गेल्या… ” कष्टाविना पैसे नाही!!!! हाताला लागते बऱ्याचदा पण काय करणार… करावे लागते “… लागलेल्या बोटाना लिंबू लावताना किती वेदना होत असतील, या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला….
पण वाफर्सची चव मात्र कमालच होती….थोडी थोडके नाही तर तब्बल 6 किलो वेफर्स आम्ही घेतले….त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहून मला खूपच छान वाटले.
दुकानामध्ये पुण्यात पण ताजी तळून मिळतातच पण तरीही मला ते सगळे live बघून निसर्गाच्या सानिध्यात विकत घेताना खूपच समाधान वाटले.

सहज जाता जाता!

सुज्ञा