Categories
Uncategorized माझा कट्टा

गुढीपाडव्यातील विविधता!

गुढिपाडव्याची ,गुढी. Illustration by – सौरभ गाडगीळ.

गुढीपाडवा आहे म्हणल्यावर आपण सगळेच कसे एकदम उत्साहाने खरेदी करतो. नवीन कपडे, नवीन दागिने. प्रत्येक सणाच्या आधी घराची स्वच्छता करणं हे मगं आपोआप आलंच. पाडवा असो, दिवाळी असो किंवा अगदी श्रावण महिना असो वातावरणात कसं चैतन्य पसरते. लहान असताना मला असं वाटायचं की  सगळे सण फक्त महाराष्ट्रातचं साजरा होतात, किंबहुना त्यावेळी महाराष्ट्राच्या बाहेरील लोकं कुठले सण साजरा करतात? हा प्रश्नचं कधी माझ्या मनात आला नाही. जसं महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात झाली तसं काही तेलगू, कर्नाटक या प्रांतातील मैत्रिणींच्या सहवासात आल्याने त्यांच्याकडील त्या सणांचे महत्व कळलं. तर आज माहिती करून घेऊया त्यांच्या नवीन वर्षाबद्दल म्हणजे जसं आपण चैत्रातील शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतो, तसंच इतर काही दुसऱ्या राज्या मध्ये नवीनवर्ष कसे साजरा करतात. चैत्र नवरात्र हे देखील याच दिवसापासून सुरु होते. रामनवमीच्या दिवशी या नवरात्रीचा शेवटचा म्हणजे नववा दिवस असतो.

गोवा

गोव्याची आणि महाराष्ट्राची गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत बरीचशी सारखी आहे. गोव्यातही गुढी उभी केली जाते. गुढीपाडवा  गोव्यामध्ये पाडवो” असं म्हणलं जातं. येथेही दारावर तोरणं, रांगोळी आणि गुढी उभी करणे याला महत्व आहे. कडुलिंब आणि गुळ एकत्र करून त्यादिवशी सेवन करणे याला महत्व आहे. देवळामध्ये जाऊन देवदर्शन घेणे. तिथे खास सांन्ना असा इडली सारखा पदार्थ तयार केला जातो. खवलेल्या नारळाच्या गोड रसाबरोबर खाल्ला जातो. काही जण हिट रोस हा गोड इडलीचाही बेत करतात. पंचांगाची पूजा करून त्यातील संवत्सर फल वाचले जाते.

कर्नाटक

कर्नाटकातही गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. “उगादी\युगादी” या नावाने संबोधला जातो. नवीन युगाचा आरंभ असा त्याचा अर्थ. या सणासाठी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. कर्नाटकातसुद्धा  आंब्याच्या डहाळ्यांचे तोरण प्रवेशद्वारावर लावण्यात येते. पुरण पोळी याला इथे होळिगे किंवा ओबट्टू असं म्हणतात. कैरी घालून केलेले चित्रान्न असे काही खास पदार्थ केले जातात. इथेही कडुलिंब आणि गुळ एकत्र करून खाण्याची प्रथा आहे. पंचांगाची पूजा करून त्यातील संवत्सर फल वाचले जाते. देवळामध्ये जाऊन देवदर्शन घेणे.

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश येथे गुढी पाडव्याला “उगादी” असे म्हणतात. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा दिवस साजरा केला जातो. येथेही पहाटे अभ्यंगस्नान केले जाते. रांगोळी आणि दारावर आंब्याच्या पानांचे तोरण याला महत्त्व असतं. पचडी नावाचा खास पदार्थ बनविण्यात येतो.

तर माझ्या असं लक्षात आलं की, राज्य कुठलेही असो, नवीन वर्षाचं सगळेच जण अगदी उत्साहात स्वागत  करतात. बोली भाषा वेगळी असते. साजरा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या असतात. एकाच सणाला नावंही वेग-वेगळी असतात. गुढीपाडवा, युगादी, उगादि अशी. सगळ्यांच्या मनातील श्रद्धा आणि भाव एकच असतो. ती म्हणजे कृतज्ञता ब्रह्म देवासाठी, सृष्टी निर्माण केली म्हणून.

मग या सृष्टीचे संरक्षण करता यावं यासाठी आपण काय करू शकतो? याचाही विचार करायला हवा. नवीन वर्षाची सुरुवात करताना आपले सगळेच सण आणि उत्सव हे पर्यावरणपुरक कसे साजरा करता येतील? याचा विचार करूया! चला तर नवीन संकल्प करू “पर्यावरणपुरक सण साजरा करू!”

अमृता गाडगीळ-गोखले

By अमृता गाडगीळ-गोखले

नमस्कार, मी अमृता गाडगीळ-गोखले. मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मी ब्लॉग्सही लिहिते. मला लिखाणाची आवड आहे. मी कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करते. निसर्गामध्ये रमणं मला आवडतं, लहान मुलांच्या मनातले भाव जाणून घ्यायला मला आवडतं.