Categories
काही आठवणीतले

आजी आणि मी

माझा जन्म मुंबईत झाला. साल १९६०, तेव्हाची मुंबई खूप वेगळी होती. गावोगावाहून लोक चौपाटी व राणीचा बाग बघायला यायची. चौपाटीची भेळ व गंडेरी प्रसिद्ध. राणीच्या बागेत पाय भाजेपर्यंत पिंजऱ्यासमोरून लोक हलायची नाहीत.

माझी आजी मैनाताई दाबके. सामाजिक कार्यात पुढे. उत्कृष्ठ स्वयंपाक करणारी. मला आठवते तिची पांढरी साडी व मधले बुट्टे. सोनेरी काड्यांचा गोल चष्मा. केसांचा अंबाडा. तिने भरवलेला वरणभात.

भात खाऊन झाल्यावर झोपायच्या आधी, आम्ही दोघी पत्ते खेळत असू. मी आजीला आग्रह करून रोज चार डाव तरी खेळायला लावायचे. सात आठ हा माझा आवडता डाव. एक दिवस पत्ते खेळताना मी अडचणीत आले. आजीच्या चेहऱ्याकडे बघू लागले. हिच्या हातात कुठले पत्ते असतील बरे?

मी आजीच्या चष्म्याकडे पाहिले व मला तिचे पत्ते दिसले चष्म्यात! त्यादिवशीची सगळे डाव मी आजीच्या चष्म्यात बघून खेळले. मग मलाच वाईट वाटले. आजीचा चष्म्याच्या काचेचे दोन भाग होते. खालच्या भागात एका कोनामध्ये पत्ते दिसत. अनेकवर्षांनी आजीचा फोटो पाहिला आणि जुन्या आठवणी उफाळुन आल्या.