Categories
Uncategorized माझा कट्टा

करोनाचे उद्यम जगतावरील सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम

करोना नामक विषाणूने जगात कसा हाहाकार माजवला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. करोनाचे भिन्न व्यक्तींवर, व्यापाऱ्यांवर आणि उद्यम जगतां वर झालेल्या परिणामांमध्ये कशी तफावत आहे याचं विवेचन करूया. काही उद्योग आणि रोजगार करोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत बंद पडले तर हीच प्रतिकूलता काही उद्योग जगतात अनुकूलता बनून पोषक ठरली आणि त्यांचा व्यापार वृद्धिंगत झाला.

याचं सगळ्यात ठळक उदाहरण द्यायचं झालं तर मॉल्स आणि ई-कॉमर्स हे असेल. ई-कॉमर्समुळे आणि त्यांच्या भारी सवलतींमुळे असाही मॉल संस्कृतीला थोडा फार धक्का बसला होता, पण मॉल्स बंद पडले नव्हते कारण समाजात असा एक मोठा वर्ग आहे जो ते टेक जाणकार नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्यासाठी आभासी/वर्चुअल खरेदी समाधानकारक व सोयीस्कर नसल्यामुळे म्हणा मॉल्स आणि दुकानांकडे आकर्षिला जातच होता. पण करोनामुळे आणि पर्यायाने आलेल्या लॉकडाऊन मुळे हे चित्र पूर्णपणे पालटलं. मॉल्स आणि दुकाने बंद पडल्यामुळे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा अशा अनेक ई-कॉमर्स कंपन्यांची चलती झाली. एकीकडे मॉल्स मधले दुकाने बंद पडून त्यांना टाळे बसण्याची वेळ आली आणि दुसरीकडे ई-कॉमर्स कंपन्यांना होणाऱ्या नफ्यात किती तरी पटींनी वाढ झाली.

माहिती-तंत्रज्ञान उद्योग जगतात आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या उद्यम जगात घरून काम करण्याची मुभा असल्याने त्याचे अनेक फायदे आणि तोटेही झाले. लोकांचा घरातून ऑफिस आणि ऑफिस मधून घरी येण्यात जाणारा वेळ, श्रम आणि पैसा वाचायला लागला. हवा आणि ध्वनी प्रदूषण काही काळाकरता का होईना कमी झाले. काम ऑनलाईन करता येऊ लागल्यामुळे भौगोलिक दृष्ट्या तुमचं कुठेही असं चालणार होतं. बऱ्याच लोकांनी या परिस्थितीचा अदमास घेतला आणि आपल्या मूळ गावी किंवा शहरी किंवा आईवडिलांकडे बस्तान हलवलं. त्यामुळे दर महिना घरभाड्यात आणि इतर खर्चात जसे वीज पाणी वगैरे बचत झाली. बऱ्याच लोकांनी तो वाचवलेला पैसा स्टॉक मार्केटमध्ये निवेश केला. पाश्चात्त्य जगात काही लोकांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली छोटी घर विकुन उपनगरात मोठी घरं घेतली कारण घरून काम करणे ही संधी त्यांना करोनामुळे मिळाली होती. त्याकरता ऑफिस जवळ घर असणं हा जो एक निकष होता तो निकालात लागला. आपल्याकडेसुद्धा काही लोकांनी वाचवलेला पैसा घरात गुंतवणूक करण्यात वेचला.

घरून काम करण्याचा एक मोठा तोटा म्हणजे कामाच्या वेळा ज्या आधीच ताणलेल्या होत्या त्यांना आता काहीच निर्बंध उरलेला नाही. कनेक्टेड किंवा इंटरनेट बरोबर जोडला गेला आल्यामुळे आजकाल माणूस सतत ऑनलाईन किंवा कॉल वर असतो.

दुसऱ्या काही उद्योग जगतात याच्या अगदी विरोधी चित्र दिसते. जिथे व्यक्तीने शारिरिकरित्या कामावर हजर राहणे ही एक गरज आहे असे व्यवसाय बंद पडले. अनेक बांधकाम मजूर, कारखान्यातील मजूर आणि इतर यांचे रोजगार गेले. लहान-मोठे व्यापार करणाऱ्यांना आपल्या रोजीरोटी देणाऱ्या मूळ स्त्रोताला काही दिवस टाळे लावावे लागले.

वैद्यकीय जगात आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या उद्योग जगतात जसे फार्मास्युटिकल्स, औषधांची दुकाने इन्शुरन्स कंपन्या यांचादेखील खूप फायदा झाला.

मॉल्स आणि ई-कॉमर्स याप्रमाणे आणि एक एक उदाहरण देता येईल ते म्हणजे उपाहारगृहे आणि खाद्य वितरण ॲप्स, जसे स्विगी आणि झोमॅटो. जरी उपहारगृहांचा व्यवसाय लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात कमी झाला असला तरी नंतरच्या काळात झोमॅटो, स्विगी वगैरे सारख्या खाद्य वितरण ॲप्सनी त्यांना तारून नेलं आणि काही प्रमाणात सावरायला मदत केली. अशी परिस्थिती असून सुद्धा काही उपहारगृहे कायमची बंद झाली. यात उपहारगृह आणि खाद्य वितरण ॲप्स यांच्यावर झालेल्या परिणामांमध्ये तफावत दिसून येते.
एकीकडे पुरुष आणि महिला प्रसाधन गृह बंद पडली तरी दुसरीकडे अर्बन clap सारख्या उद्योगांमधून ब्युटीशियनना रोजगार संधी उपलब्ध झाल्या.

आपल्याला जगायला आवश्यक फक्त तीन गोष्टी रोटी, कपडा और मकान या त्रिसूत्रीप्रमाणे जीवनावश्यक वस्तू जसं फळ, भाज्या, वाणसामान या दुकानात पूर्वी जशी अमिताभ बच्चन यांच्या पिक्चरला गर्दी व्हायची तशी गर्दी झाली होत होती. संग्रह करण्याकडे मनुष्यजातीचा कल असल्यामुळे भीतीपोटी जीवनावश्यक वस्तुंचा साठा केला गेला. ज्या योगे जीवनावश्‍यक वस्तू विकणाऱ्या व्यापारांचा खूप फायदा झाला. ज्यांचे रोजगार गेले त्यांनी फळ, भाजी यांची दुकानं थाटली आणि आपला उदरनिर्वाह केला.

ऑनलाईन शाळेमुळे इतरही क्लास ऑनलाईन होऊ शकतील याची जाणीव व्हायला लागली. ऑनलाईन योगा, झुम्बा, फिटनेस क्लासेस, आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस असे इतर अनेक व्यवसाय उदयाला आले. बऱ्याच गृहिणींनी डबे पुरवण्याचा व्यवसाय सुरू करून घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावला.

या सगळा बदल शक्य झाला तो संगणक/कम्प्युटर्स, इंटरनेट, स्मार्टफोन्स यामुळे. यांच्याशिवाय काय करू शकलो असतो आपण?

माणसाचा मूळ स्वभाव आशावादी असतो. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता शेवट पर्यंत त्याच्याशी झगडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या करोनाच्या संकटात अत्यंत वाईट गोष्टी घडल्या याबद्दल अजिबात दुमत नाही पण काही अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडले आणि प्रत्येकाची एक नवीन जीवनशैली विकसित झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीतहीआपल्याला त्या सिल्वर लायनिंग किंवा चंदेरी किनार दाखवून गेल्या. म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम है. या म्हणीला अनुसरून आशा करूया केव्हा न केव्हा तरी हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, एक दिन…..मन मे है विश्वास….

प्रिया सामंत