Categories
महत्वाचे दिवस संस्कार

वसुंधरा

आम्ही लहान असताना सुट्टी लागली की, हमखास कोकणात एक सहल करायचीच, हे अगदी ठरलेलं असे. लहान असताना आता असतात तसे फार काही पर्याय सहलीसाठी नसायचे. कोकण, खंडाळा-लोणावळा ही ठिकाणं  नाहीतर गड-किल्ले यावर एक एक दिवस आरामात जात असे. गाडीमध्ये सगळेजण बसलो की मग गाण्याच्या भेंड्या चालू. काही गाणी अगदी ठरलेली असत, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग चेडवा दिसतो कसो खंडळाचो घाट, हे गाणं  तर अगदी ठरलेलंच. खरंच खंडाळ्याचा घाट आला की मग निरीक्षण सुरु. कुठे माकडं दिसतं तर कुठे घाटातून उतरताना प्रवासात मागे गेलेली एक नागमोडी वाट दिसे मज्जा यायची ते सगळं बघायला. सगळीकडे अगदी हिरवी गार झाडं!

छायाचित्र सौजन्य -अजय काणे, विरार.

आता पुढच्या पिढीला मात्र हिरवी झाडं खरचं शोधावी लागतील. आमच्या आई वडिलांनी त्यांच्या बालपणी हा खेळ खेळला, आम्ही  वडाचं झाड तेवढं पाहिले, त्याच्या पारंब्या मोठ्या होईपर्यंत कुठलंच झाडं टिकलं नाही. आता आपल्या मुलांना वडाचं काय किंवा पिंपळाचं काय? एकंदर झाडं बघायला मिळणं हेच अवघड झालयं. त्यांच्या पुढच्या पिढीला मात्र झाडं बहुदा फोटोमध्येच बघावी लागतील. ज्या वेगाने झाडांची संख्या आणि प्रजाती नष्ट होत आहेत ते बघून खरंच  वाईट वाटतं.

दरवर्षी पृथ्वी दिवस साजरा करतं एखाद्या ठिकाणी वृक्षारोपण करणे, नदी स्वच्छ  करणे असे प्रकल्प राबवले जातात. ते करण्यास काहीच हरकत नाही. आपण दैनंदिन जीवनात काय करू शकतो याचा कोणी विचार केला आहे का? अश्या काही गोष्टी ज्या रोजच्या दिनक्रमामध्ये आपण सहभागी करू शकतो. तर अश्या काही गोष्टींचा विचार करूया.

१) रोज सकाळी आपण दात घासण्यासाठी प्लास्टिक ऐवजी लाकडाने तयार करण्यात आलेले ब्रश वापरू शकतो.

२) दुधाची पाकीट असतात, त्याचे टोक शक्यतो पाकिटापासून संपूर्ण रित्या न कापता, दूध पातेल्यामध्ये काढावे असे केल्याने दुधाचे पाकीट पुनर्प्रक्रियेला पाठवता येईल.

३) मुलांचा वाढदिवस साजरा करताना शक्यतो इको फ्रेंडली वस्तूच रिटर्न गिफ्ट म्हणून घ्यावात. वाढदिवसाला फुग्यांची सजावट करणे टाळता देऊ  शकते. रिटर्न गिफ्टला आवरण करताना शक्यतो ते कागदाचे करावे.

४) खाद्य पदार्थ देण्यासाठी जे प्लेट्स वापरले जातात ते शक्यतो इको फ्रेंडली असावेत.

५) घरात पुठ्ठयाचे बॉक्स असल्यास ते कचऱ्यामध्ये न टाकता ,एखाद्या रिसायकल युनिटला देता येतील.

६) शाळेतील मुले जी स्टेशनरी वापरतील,ती देखील शक्यतो रिसायकल पेपर ची असावी.

७) लाकडाची पट्टी, रिसायकल कागदापासून तयार करण्यात आलेले फोल्डर, पेन्सिल हे देखील बाजारात उपलब्ध असतात.

८) मुलांना सुट्टीमध्ये सीड बॉल्स तयार करणे, वृक्षारोपण करणे हे शिकवल्यास त्यांना त्याची मदतच होईल.

९) मुलांना देण्यात येणारे लंच बॉक्स आणि पाण्याची बाटली हे प्लास्टिक चे वापरात असाल तर ते प्लास्टिक फूड ग्रेडचे असावे. शक्यतो स्टीलचे वापरावे.

१०) कपडे देखील शक्यतो कॉटन चे वापरावेत.

यातल्या काही गोष्टींतर अगदीच सहज शक्य आहे. दैनंदिन जीवनात जर या गोष्टींचा विचार केला तर किती कचरा नाहीसा होईल. पर्यावरण रक्षण करण्यास थोडासा हातभार लागेल. वर्षातून एक तरी झाड लावा आणि त्या झाडाची पूर्ण पणे काळजी घ्या. पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा.

भविष्याचा विचार करून आताच काही उपाय योजना करायला हवी. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार आम्हाला जरूर कळवा.

Categories
संस्कार

गोष्ट विचारी श्रीरामाची

आभास एक हुशार मुलगा.  इंजिनिअरिंगच शेवटचं वर्ष. मार्क सुद्धा उत्तम. शेवटचं वर्ष असल्यामुळे कॅम्पस सिलेक्शन चालू होतं. आभासच मार्कशीट उत्तमच त्यामुळे त्याला प्रत्येक कंपनीकडून इंटरव्ह्यूसाठी बोलावंण येत होतं. पण माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक ऑफर काही हाती लागेना. आभास मात्र उदास होता. शेवटी आईने आभासला विचारलं “काय झालं? कसा झाला इंटरव्यू? तेव्हा तो म्हणाला “अगं आई मी चार वर्ष शिकलो त्याचा आणि इंटरव्यू मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा काही ताळमेळच लागत नाही. मला इंटरव्यू मध्ये काहीच जमत नाही.” मग आई त्याला म्हणाली “तुला लहानपणी सांगितलेली श्रीरामाची गोष्ट आठवती आहे का? त्याचा बहुतेक तुला विसर पडला आहे. म्हणून तुझं असं होत आहे. “कुठची गोष्ट आई?” आभास म्हणाला. तशी आई सांगू लागली.

हि तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा श्रीराम आणि त्यांचे तीन भाऊ लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न हे चौघेही ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या आश्रमात शिकत होते. म्हणजे शाळेतच जात होते. पण तुमच्या आमच्यासारखी शाळा नाही. बारा वर्ष गुरूंच्या सान्निध्यातच राहायचं. घरापासून लांब,आई-बाबा नाही, कोणाला भेटणं नाही.

गुरु वशिष्ठांनी त्यांना वेदाभ्यास संस्कार याचबरोबर धनुर्विद्या, अश्वारोहण, पशु परीक्षा, अस्त्रविद्या, न्यायव्यवस्था, रथाचे सारथ्य, एकाग्र मन या सर्वांचे ज्ञान दिले. सगळं शिक्षण पूर्ण झाल्यावर उजाडला तो परीक्षेचा दिवस. एकेक करून सगळ्या परीक्षा होत्या. आता वेळ होती धनुर्विद्येचा परीक्षेची. गुरु वशिष्ठ एकामागून एक प्रश्न समोर ठेवत होते. कधी हलत्या माठावर नेम साधायचा होता. तर कधी आकाशात उंच उडवलेल्या चेंडूवर नेम साधायचा होता. सगळेच विद्यार्थी गुणवंत होते. पण आता मात्र शेवटची सगळ्यात अवघड अशी परीक्षा होती. या परीक्षेतून सर्वोत्तम कोण हे निवडायचं होतं.

गुरूंनी आकार न उकार असलेला अत्यंत वाकडा तिकडा धनुष्य सगळ्या विद्यार्थ्यांना समोर आणून ठेवला. तर आता प्रश्न असा होता की, धनुष्याला प्रत्यंचा बांधायची(धनुष्याची दोरी)आणि समोर ठेवलेल्या लक्ष्यावर नेम साधायचा. बाण तोच पण धनुष्य वेगळा. गुरुजी म्हणाले आता प्रश्न सोडवा. एक एक करून सगळे विद्यार्थी समोर येत होते. पण कोणाला दोरी नीट बांधता येत नव्हती. कोणाला धनुष्य नीट पकडता येत नव्हता. कोणाला बाण सोडता येत होता, पण तो बाण तिरकाच जात होता. हे करणं अशक्यप्राय आहे असे सर्व विद्यार्थ्यांना वाटत होते.शेवटी श्रीराम उभे राहिले.

धैर्यवान, अविचल, स्थिरचित्त असलेले श्रीराम शांतपणे धनुष्या कडे बघत होते. गुरूंनी शिकवलेल्या सर्व ज्ञानाचा एकत्रित विचार करून काही गोष्टी त्यांनी मनाशी ठरवल्या आणि त्या केल्या जसे–

(१) प्रथम त्यांनी धनुष्य हातात घेतला. त्याच्या विकृतीचा अभ्यास केला. धनुष्याचा आकार प्रमाणापेक्षा जास्त होता. म्हणून धनुष्याची दोरी काढून श्रीरामांनी असलेल्या जागे पेक्षा ती थोडी पुढे बांधली.

(२) आता प्रश्न होता बाण सोडल्यावर तो तिरका जात होता, याचे उत्तर शोधताना श्रीरामांनी वाऱ्याच्या दिशेचा विचार केला म्हणून त्यांनी माती मुठीत घेऊन ती मुठीतून सोडून वाऱ्याची दिशा बघितली.

(३) आता त्यांनी बाण हातात घेतला. बाणाच्या लांबीचा, वजनाचा आणि हातात असलेल्या धनुष्याचा एकत्रितपणे अभ्यास केला.

(४) नेम साधायला श्रीराम सज्ज झाले. मगाशी वाऱ्याची दिशा त्यांनी बघितलीच होती. बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला उभे राहात त्यांनी बाण सोडला.

लक्ष भेद झाला तोही अगदी बरोबर आणि अचूक जे बाकी सगळ्यांना नाही जमलं ते फक्त श्रीरामांना कसं जमलं? गुरु वसिष्ठांनी त्यांना फक्त अस्त्रविद्या, म्हणजे फक्त अस्त्र सोडणे एवढेच नाही शिकवलं. पण सोडलेलं अस्त्र वेळ पडली तर परत कसं घ्यायचं हे सुद्धा शिकवलं. त्याचप्रमाणे त्याच्यात बिघाड झाल्यास ते अस्त्र दुरुस्त करणे हेसुद्धा शिकवलं. रथाचा सारथ्य शिकवलं, तसं मोडलेला रथ दुरुस्त करायलाही शिकवलं. शिकवलेल्या सगळ्या विद्या, त्यातील ज्ञान कुठे आणि कसं वापरायचं हे श्रीरामांना उमगलं. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर शिकलेल्या theory चा practical मध्ये उत्तम उपयोग.

म्हणूनच श्रीरामाच्या बाबतीत असे म्हणतात की, चार वेद मुखोद्गत आहेत. म्हणजेच पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणासह धनुष्य आहे, म्हणजेच शौर्य आहे. एकंदरीत येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेज आहेत.

अग्रतश्चचतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।

ही गोष्ट ऐकताक्षणी आभास ला त्याची चूक कळली आणि  पुढच्या वेळी शिकलेल्या सगळ्या ज्ञानाचा एकत्रित अभ्यास करून इंटरव्यू कसा द्यायचा हे त्याला कळले.

Categories
महत्वाचे दिवस संस्कार

सखे राम जन्मला! अर्थात श्रीराम नवमी.

श्रीराम नवमी

चैत्र शुद्ध नवमीला, दुपारी मध्यान्ही सूर्य असताना श्रीरामांचा जन्म झाला. श्रीविष्णुंच्या दशावतारांपैकी, सातवा अवतार म्हणजे श्रीराम. दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिन्ही राण्यांना गर्भधारणा झाली. दशरथ राजाला चार पुत्ररत्न प्राप्त झाले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. धन्य ती कौसल्या राणी आणि दशरथ राजा, ज्यांच्या पोटी स्वतः श्रीरामांनी जन्म घेतला. अयोध्यावासी जनता आनंदानी आणि उत्साहाने न्हाऊन निघाली. राजपुत्र जन्माला आला.

श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम,सीतादेवी,लक्ष्मण,आणि हनुमान यांची मूर्ती
ठिकाण-श्रीराम मंदिर ट्रस्ट, बोळींज- विरार.
फोटो सौजन्य – अजय काणे, विरार.

आजही रामनवमी साजरी केली जाते. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच श्रीरामनवमीला दुपारी बारा वाजता रामजन्म साजरा केला जातो. श्रीरामाची पूजा करून, हार-फुले वाहून, प्रार्थना केली जाते. पाळणा सजवण्यात येतो आणि “रामाचा पाळणा” गायला जातो. जनतेसमोर एक उत्तम आदर्श असावा या हेतूने रामाचा जन्म झाला. श्रीराम म्हणलं की आपोआप रामायण आणि त्यातली राम, लक्ष्मण, सीता, कैकेयी, हनुमान, रावण, ब्रह्मर्षि विश्वामित्र, ब्रह्मर्षि वसिष्ठ,वाली, सुग्रीव, बिभीषण, मंदोदरी, मारीच राक्षस, रावण ह्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात.

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम

श्रीराम म्हणजे पुरुषोत्तम, ते एक आदर्श. ब्रह्मर्षि विश्वामित्र यांनी राक्षसांनी त्रास देण्यास सुरुवात केल्याने मदतीसाठी म्हणून दशरथराजाकडे श्रीरामांना त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. कारण त्यांना माहित होते की या राक्षसांना मारण्याचे सामर्थ्य फक्त श्रीराम यांच्याकडेच आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करून दशरथराजाने श्रीराम यांना विश्वामित्र ऋषींबरोबर राम आणि लक्ष्मण दोघांनाही पाठवले. तेव्हापासुन ब्रह्मर्षि विश्वामित्र हे राम आणि लक्ष्मण यांचे गुरु झाले.

एकदा विश्वामित्र श्रीरामांना मिथिला नगरी मध्ये घेऊन गेले. तेथे सीता स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. “जो कोणी शूरवीर शिवधनुष्यास प्रत्यंच्या लावेल त्या शूरवीरासह मी जानकीचा विवाह करून देईन.” अशी घोषणा जनक राजाने केली होती. ब्रह्मर्षि विश्वामित्र यांनी जेव्हा श्रीराम यांना आज्ञा केली आणि त्यामुळे श्रीराम स्वयंवरात सहभागी झाले. त्यांनी शिवधनुष्य सहज उचलून धरले. धनुष्याला प्रत्यंचा लावणार तोच, शिवधनुष्य भंग पावले. तो आवाज ऐकून श्रीविष्णु अवतार परशुराम तेथे आले. त्यांनी श्रीराम यांना ओळखले आणि अशाप्रकारे सीतामाता आणि प्रभू श्रीराम यांचा विवाह संपन्न झाला.

श्रीराम हे एक आदर्श पुत्र… दशरथ राजा एकदा देव आणि दानव यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धात देवांना मदत करण्यासाठी सहभागी झाले. राणी कैकेयी त्यांच्यासोबत होती. त्यावेळी कैकेयीने दशरथ राजाचे प्राण वाचवले म्हणून त्यांनी तिला दोन वर मागण्यास सांगितले. तेव्हा “वेळ आल्यावर मागेन” असे सांगून, रामाच्या राज्याभिषेकाच्या आधी तिने ते दोन वर मागितले. रामाला चौदा वर्ष वनवास आणि भरत याला राजा घोषित करावे असे दोन वर मागितले. श्रीरामांनी वनवासही मान्य केला.

ते एक आदर्श राजा देखील आहेत, त्यांच्यासाठी कायम प्रजेचे हित हेच प्राधान्य होते. त्यामुळेच रामराज्य ही संकल्पना रुजू झाली. अयोध्येत आल्यानंतर परिटाच्या संशयामुळे राजधर्माचे पालन म्हणून श्रीरामांनी सीता त्यागही केला.

राम आणि भरत भेट, राम-लक्ष्मण बंधुप्रेमाच्या कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत.

श्रीराम हे आदर्श पतीही आहेत. मारीच राक्षसाने सोन्याच्या हरिणाचे रूप धारण केले आणि सीतेला भुरळ घातली. तिच्या हट्टामुळे त्यांना हरिणाला पकडण्यासाठी पर्णकुटी सोडून अरंण्यात जावे लागले. काही वेळाने श्रीरामांनी मदतीसाठी हाक मारली आहे असे सीतेला वाटल्याने तिच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने सीतेच्या पर्णकुटी भोवती लक्ष्मण रेषा आखून मग ते रामाला शोधवयास निघाले. सीतेला सांगितले होते, “ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका.” इकडे रावण वेष बदलून भिक्षा मागण्यासाठी पर्णकुटीबाहेर उभा राहिला. लक्ष्मण रेषा ओलांडू नये हे सीतेला लक्षात आले पण भिक्षा तर द्यावी लागेल म्हणून तिने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रावणाने मूळ रूपात येऊन सीतादेवीचे अपहरण केले. वाटेत जटायूने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा एक पंख
कापुन रावणाने त्याला घायाळ केले. मग सीता लंकेमध्ये आहे हे कळल्यावर सेतू बांधून योजना आखून सीतेसाठी त्यांनी रावणाशी युद्ध केले. रावणाचा वध केला.

आज जेव्हा जेव्हा श्रीराम यांचे नाव घेतले जाते त्याचबरोबर सीतेचाही आपोआप उल्लेख होतो. हनुमान यांच्यासारखा दुसरा निस्सीम भक्त होणे नाही. श्रीरामांनी  दिलेल्या प्रत्येक आज्ञेचे पालन हनुमानांनी केले.

शत्रुसाठी श्रीराम हे उत्तम योद्धा आहेत. रावण हा एक शिवभक्त होता. रावण त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना श्रीरामांनी लक्ष्मणाला, रावणाकडून ज्ञानग्रहण करण्यास सांगितले. श्रीरामांना माहित होते की रावण हा खूप ज्ञानी आहे. फक्त सत्तेची हाव आणि पर स्त्रीचा लोभ यामुळे रावणाला श्रीरामाशी युद्ध करावे लागले.

श्रीरामांबद्दल जितके लिहावे आणि बोलावे तेवढे कमीच आहे. श्रीराम म्हणलं की वाल्मिकी ऋषींचे रामायण प्रत्येकाला आठवते. याचा प्रचार आणि प्रसार श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश यांनी केला. रामायणावरून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

कर्तव्यांचे पालन करा. आज्ञेचे पालन करा. कितीही संकटे  आली तरी सत्याच्या मार्गापासून दूर होऊ नका.निस्सीम भक्ती आपलं रक्षण करते. अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजच्या काळातही आपण शिकु शकतो. तसंच रामायणाने आपल्याला बऱ्याच संकल्पनाही दिल्या ज्याचा अर्थ खूप खोल आहे. “रामराज्य”, “खारीचा वाटा”, “लक्ष्मणरेषा”, “शबरीची बोरं”, “शिव धनुष्य”.

संत रामदास, संत तुलसीदास यांनी जगापुढे श्रीरामांचे कार्य आणि चरित्र अजून सोपे करून सांगितलं. भक्ती मार्ग सोपा करून, समजावून सांगितला.बाबूजी आणि गदिमा यांनी जगाला दिलेली एक सुंदर भेट म्हणजे गीत रामायण !मग रामनवमीच्या दिवशी “राम जन्माला गं सखे” हे गीत आठवणार नाही असे कसे होईल.

शेवटी एवढचं म्हणेन, सृष्टीच्या चरा चरात राम आहे. म्हणूनच तर म्हणलंय…

नादातूनि या नाद निर्मितो ।। श्री राम जय राम जय जय राम ।।

नाद निर्मितो मंगलधाम ।। श्री राम जय राम जय जय राम ।।


Categories
संस्कार

चैत्रांगण…….. एक रांगोळी!

चैत्रांगण.

नमस्कार मंडळी,

सर्व प्रथम, मराठी नवं वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. !!!

आज गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस. चैत्र महिना लागला कि जाणवु  लागतं ते रणरणतं ऊन. पण असं असलं तरी पानगळती होऊन  झाडांना छान चैत्र पालवी फुटते. नुकत्याच झाडाला कैऱ्या लगडलेल्या असतात, त्यामुळे घरोघरी थंडाव्यासाठी पन्हं तयार केलं जातं . निसर्गाने सर्व गोष्टींचा किती सुरेख समतोल साधलाय नाही? अशातच, घरी माहेरवाशीण ‘चैत्रगौर’ महिनाभर रहायला येते.चैत्र तृतीया ते वैशाख तृतीया म्हणजेच ‘अक्षय्य तृतीया’. याच वेळेस  चैत्रगौरीचे हळदी-कुंकू करतात. घरच्याच अन्नपूर्णेला छान अलंकार आणि वस्त्रांनी नटवतात. तिच्यासमोर विविध प्रकारचे फराळ करून मांडतात. ह्या ऋतूतील फळं म्हणजे कैरी, खरबूज आणि कलिंगडाचे छान कोरीव काम करून वेगवेगळे आकार देऊन त्याचीही आरास करतात. सर्व वातावरण कसं मंगलमय होतं. तिचं कौतुक करण्यासाठी कैरीची डाळ आणि पन्हं करायची परंपरा तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. हळदी कुंकू साठी आलेल्या सवाष्णींना  कैरीची डाळ आणि  पन्हं देण्याची प्रथा आहे.

खूप  ठिकाणी चैत्रात तुळशी समोर ‘चैत्रांगण’ काढायची पण परंपरा आहे बरं का.आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन?  माहेरी आलेली ‘चैत्रगौर’ म्हणजे साक्षात पार्वती. तिच्या स्वागतासाठी काढली जाणारी ही एक रांगोळीच आहे. रांगोळी हा सर्व महिला वर्गाचा एक आवडता प्रकार.  आपली एक पारंपरिक कला आहे. संपूर्ण भारतात रांगोळी काढण्याचा प्रघात आहेच. दक्षिण भारतात काही ठिकाणी तांदुळाच्या पेस्टने रांगोळी काढतात. पूर्वी बायकांना चित्रकलेचं आवड जपायचे हे एक साधन होते. त्यामुळे अंगण सुशोभित होते. आपल्याकडे आजकाल विविध प्रकारच्या  रांगोळ्या बघायला मिळतात….. ठिपक्यांची, फ्री हॅन्ड, पानं, फुलं- वेली, काही चक्क सामाजिक जागरूकता निर्माण करणारी रांगोळी. तशीच ‘चैत्रांगण’ ही आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारी एक पारंपरिक रांगोळी आहे.  यामध्ये ५१ प्रकारची शुभं चिन्हे आहेत. पार्वतीचा लाडका पुत्र गणपती आहे. दिनमान ठरवणारी  सूर्य चंद्राची जोडी आहे. साक्षात पाळण्यात बसलेली चैत्रगौर आहे. तिचे सौभाग्य अलंकार, जसे मंगळसूत्र, करंडा, फणी,आरसा, ओटी. काही पवित्र वृक्ष  आणि फळे, तुळस, आंबा, नारळ, केळी आहेत. गाय, हत्ती, कासव आणि नागोबा आहे. पार्वती देवीला साजेशी अशी तिची आयुधं  …… शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशुळ,धनुष्य-बाण आहेत. कलश, शिवलिंग, पणती, पाळणा, मोरपीस, धान्याची ओंबी, ध्वज आणि तोरणही आहे. विद्येची देवता सरस्वती आहे. विजयाची प्रतिक असलेली गुढी आहे. देवीला हलकेचं वारं घालता यावं म्हणून छान दोन हातपंखे देखील आहेत. ह्या सर्व बोधचिन्हांचं आपलं असं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणालं  एवढी मोठी रांगोळी काढायला वेळ आहे कुणाला? आणि आपल्याकडे सहज रुजत चाललेल्या फ्लॅट संस्कृती मध्ये तर रांगोळी काढायला जागा तरी असते का हो……… मी काय म्हणते अगदी आपल्या आजी किंवा पणजी सारखं नाही तरी निदान रोज २-३ वेगवेगळी बोधचिन्हं काढली तर काय हरकत आहे? आणि सध्या बाजारात चैत्रांगणाच्या स्टेनसिल्स  सहज उपलब्ध आहेत. त्यांनी अगदी पाच मिनिटांमध्ये होते रांगोळी काढून. आपली संस्कृती टिकवायला आणि आपल्या पुढच्या पिढी पर्यंत न्यायला थोडी मेहनत घ्यायला काय हरकत आहे ?

Categories
Uncategorized संस्कार

गुढीपाडवा: ह्याच तिथीला झाला वाली वध

गुढीपाडव्याच्या सुमंगल दिनी आपण चांगल्या विचारांची कामना करतो ते वाईट विचारांना तिलांजली देऊनच. हाच आदर्श आपल्याला  प्रभू रामचंद्रांनी दिला आहे. दुष्टांचा संहार, सृजनांचा विकास आणि धर्माची स्थापना करून श्रीरामांनी नवीन पर्व सुरू केले तेही याच तिथीला.

मित्र-मैत्रिणींनो,  श्रीरामांच्या बाणांनी घायाळ झालेला वाली श्रीरामांना विचारतो, “शत्रुता तर माझी आणि सुग्रीवची होती मग हे प्रभू तुम्ही मला का मारलं?” मरता मरता श्रीरामांनी वालीला काय गुपित सांगितले त्याचीच हि गोष्ट.

उंच पर्वत शिखरावर बसून रिक्ष { सुग्रीवाचे आणि वालीचे वडील} पुत्र सुग्रीव विचार करत असतो. आता आपण या आपल्या किष्किंधा नगरी साठी काय करू शकू ? आपला मोठा भाऊ वाली याच्या त्रासापासून कसे सोडवू यात ? आपली पत्नी रोमा हिला वालीच्या छळापासून कसे मुक्त करूयात ? आपल्या वानरसेनेला कसे उत्तम भविष्य देऊ शकू? हे सर्व विचार चालू असताना तिथे सुग्रीवाचा परममित्र हनुमंत येऊन उभा ठाकतो.  त्याच्याबरोबर श्री प्रभू रामचंद्र आणि त्‍यांचे बंधू लक्ष्मण असतात. हनुमान आपल्या परम मित्र सुग्रीवास म्हणतो, “सोडून दे चिंता सारी प्रभू रामचंद्र उभे ठायी।” सांगण्याचे तात्पर्य असे की प्रत्यक्ष श्रीरामचंद्र आपल्या मदतीसाठी आले आहेत.

पण अजूनही सुग्रीवाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह तसेच. आपल्या बलदंड अशा भावास हे श्रीरामचंद्र कसे काय बुवा धडा शिकवू शकतील. कारण वाली तर एका झटक्यात सात झाडांना उद्ध्वस्त करणारा बलशाली वानर. पण प्रभु रामचंद्रांची कीर्ती शक्ती सुग्रीवास थोडीच माहीत होती.  मग काय श्रीरामांनी सात झाडं एकाच बाणांनी जमीनदोस्त केली.

तेवीं आपुल्या सामर्थ्यानें। साऱ्या जगा थक्क करणें।

परी आपुली न होऊं देणे। चलबिचल कशानेंही।

(अनुवाद ज्ञानेश्वरी, स्वामी वरदानंदभारती, अध्याय १८, श्लोक ४३, अनुवाद ९५१)

असेच सामर्थ्य होते श्रीरामांचे. मग काय सुग्रीव गेला वालीला युद्धाचे आवाहन करायला!

त्यानंतर सुरू झाले वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध, वालीच्या जबरदस्त शक्ती पुढे सुग्रीवाचा टिकाव लागेना. बरं त्यात वालीला महादेवांनी दिलेले वरदान, की जो त्याच्यासमोर जाऊन युद्ध करेल त्याची अर्धी ताकद वालीला मिळेल. ठरल्याप्रमाणे श्रीराम, वालीवर नेम साधतच होते पण झालं असं की, लांबून सुग्रीव आणि वाली एकसारखेच दिसत होते. चुकून बाण सुग्रीवास लागला तर काय?

सुग्रीव जखमी होऊन आला आणि श्रीरामांनी सुग्रीवाला त्यांची अडचण सांगितली. पण त्या अडचणीवर मात करायचा उपाय सुद्धा प्रभुंनीच दिला. आता सुग्रीवाला त्यांनी नीलकमलांची माळ दिली गळ्यात घालायला. जेणेकरून त्यांना लांबून सुद्धा सुग्रीव ओळखू यावा.

मगं काय, परत सुरू झाले वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध. आता या वेळेस मात्र दोघांचे युद्ध सुरू असताना श्रीरामचंद्रांनी बाण सोडला तो थेट वालीस लागला. जमिनीवर कोसळताना वालीला श्रीराम येताना दिसले. त्यांनी श्रीरामाला प्रश्न विचारला की शत्रुता माझी आणि सुग्रीवाची होती, मग हे प्रभू तुम्ही मला का मारले?

त्यास उत्तर देताना श्रीरामचंद्र म्हणाले,

अनुज बंधू  भगिनी सुत नारी। सुनु सठ कन्या सम ए चारी।।

इन्हहि कुदृष्टि  बिलोकइ जोई। ताहि बधें कछु पाप न होई।।

श्रीराम म्हणाले,”हे वाली ऐक छोट्या भावाची पत्नी, बहिण ,पुत्राची पत्नी आणि कन्या या चार समान आहेत यांना जो वाईट नजरेने पाहतो त्याला मारल्याने काहीही पाप घडत नाही।।४।।”( तुलसीदास विरचित, श्रीरामचरितमानस,किष्किंधाकाण्ड)

Categories
महत्वाचे दिवस संस्कार

नवचैतन्याचा गुढीपाडवा!

चैत्र पाडवा, म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्ष, नवीन संकल्प. चैत्र महिना लागला म्हणल्यावर, डोळ्यासमोर येते ती झाडांना फुटलेली पालवी. गुढीपाडव्यापासून सुरु होणारे सण, चैत्र गौरीचे आगमन त्यासाठी अंगणामध्ये रेखाटलेलं सुंदर चैत्रांगण, राम नवमी, अक्षय्य तृतीया. दारावरती लागलेलं झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचे तोरणं, नवीन खरेदी; घरोघरी उभी केलेली गुढी. वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता असते.

त्याचबरोबर आठवण येते ती लहान असताना आईने अगदी हट्टाने खायला लावलेल्या  कडुलिंबाचा नैवेद्याची, “वर्षभर आजारी पडायचं नसेल तर हे खायलाच हवं!” असं दटावून सांगणारी आई; आणि नाक मुरुडून तो कडू कडुलिंब खाणारे आम्ही! घरोघरी केले जाणारे खास मिष्टन्नाचे भोजन. श्रीखंड-पुरी, खीर,कोशिंबीर असे एक ना अनेक पदार्थ.

आता मी आईच्या भूमिकेत असते आणि माझी मुलगी कडुलिंब खाताना नाक मुरडते. हा मात्र एवढा फरक झाला. नवीन वर्षात येणारे सगळे सणवार आणि उत्सव आपण वर्षानुवर्षे साजरा करतो. काळानुरूप साजरा करण्यात थोडा फार बदल झाला पण आजदेखील उत्साह मात्र तेवढाच असतो.

गुढीपाडवा का साजरा करतात?

शालिवाहन राजाने या दिवसापासून शालिवाहन शके गणनेला सुरुवात केली म्हणून हिंदू कालगणनेनुसार गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षातील पहिला दिवस म्हणून  साजरा केला जातो.

ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस आपण साजरा करतो.

इतर राज्यातही गुढीपाडवा वेगळ्या नावानी साजरा करण्यात येतो. श्रीराम वालीशी युद्ध करून आणि नंतर चौदा वर्षांचा वनवास संपवून याचदिवशी अयोध्येत परत आले. वातावरणात होणारा बदल हे सुद्धा एक कारण आहे.

Traditional gudi hoisted during gudi padwa celebration
गुढीपाडवा च्या दिवशी दारासमोर उभी करतात ती गुढी

गुढीपाडवा कसा साजरा करतात?

गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करून, देवांची नित्यपूजा करतात. घराच्या प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात येते. सडा-रांगोळी करून अंगण सजवण्यात येते. वेळूच्या काठीला तेल लावून गरम पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यानंतर गुढीला नवीन खण बांधण्यात येतो. त्यावर मग कडुलिंबाची फुलांसह असलेली पाने, आंब्याचा डहाळा, साखरेच्या गाठी आणि छानसा सुगंधित फुलांचा हार असं सर्व एकत्र बांधण्यात येते. सगळ्यात शेवटी तांब्याचा कलश त्यावर उपडा घालण्यात येतो. त्याला चंदन आणि हळदी-कुंकू, फुले वाहून प्रासादित केले जाते.

गुढी घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या दिशेला, रांगोळीने सुशोभित केलेल्या जागेवर, एका पाटावर उभी करण्यात येते. तिची हळदी-कुंकू, अक्षता, फुलं, धूप आणि दिप अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर फुलांसहित कडुलिंब, गूळ, हिंग, ओवा, मिरे आणि साखर हे चिंचेत कालवून एक आरोग्य दाई चटणी बनवून ते ग्रहण केले जाते. या गुढीला “ब्रह्मध्वज” अथवा “विजय पताका” असे म्हणतात. नवीन पंचांगाची पूजा करून, त्यातील संवत्सर फल याचे वाचन केले जाते. संध्याकाळी हळद-कुंकू आणि अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.

गुढीपाडव्याचे महत्व

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे गुढीपाडवा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. गुढीपाडवा, दसरा, अक्षय्य तृतीया हे संपुर्ण तीन दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळीतील पाडवा हा अर्धा दिवस असे साडेतीन मुहूर्त मानले जातात. म्हणजेच जर नवीन खरेदी, व्यवसाय सुरु करायचा असेल तर या दिवशी तुम्ही ते करू शकता त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते.

असा हा गुढीपाडवा तुमच्या  घरी सुख समृद्धी घेऊन यावा ही शुभेच्छा!