Categories
माझा कट्टा

पुण्यातील रस्त्यावरचे गाडीचालक शूरवीर

मी पर्वा गाडी चालवत होते. माझा पाच वर्षाचा मुलगा मागे car seat मध्ये बसला होता. माझी गाडी आमच्या lane मध्ये जात असताना एकदम मधे एक बाईक वाला आला. ‘अहो बाईक कर काका जरा जपून!’ माझ्या तोंडून पटकन असे उदगार निघाले. तोच माझा मुलगा पटकन म्हणाला, बाईक कर काका म्हणजे कोण? तुझे काका की माझे काका? त्याच्या प्रश्नांनी मला हसूच आले. तर हे बाईक कर काका कोण आणि का?

पुण्यात गाडी चालवत असताना मला विविध प्रकारचे लोक दिसतात. ह्यातील काही प्रकार वारंवार दिसतात आणि अश्या लोकांच्या विशिष्ट सवयींमुळे मी त्यांना काही विशिष्ट नावे दिली आहेत. त्यातलाच एक नाव म्हणजे बाईक कर काका.

पुण्यातील रस्त्यावरचे गाडीचालक  शूरवीर

बाईक कर काका

हे सहसा ३० पार केलेले, पण अजूनही स्वत:हाला कॉलेज मध्ये समजणारे असतात. त्यांच्या कडे कुठली तरी स्कूटी असते किंवा कुण्या एके काळाची बाईक असते. अहो पण केवढा तो गाडीवरचा आत्मविश्वास! ते स्वतःची गाडी कुठल्या high speed bike पेक्षा कमी लेखत नाहीत. अर्थात त्यांच्या गाडीचा वेग हि high स्पीडचं . पण मनात कितीही असलं तरीही त्या बिचाऱ्या गाडीला झेपलं पाहिजे ना! ती आपली side hero ला स्टन्टस करायला लावल्या सारखी रडत जीव ओढत असते. Lane वगेरे पाळणे ह्यांना फारसे पटत नाही आणि सिग्नल हिरवा होई पर्यंत थांबणे त्यांच्या तत्वांत बसत नाही.

Airplane mode Kaku

ह्या सहसा स्वत:हा गाडी शिकलेल्या, license वगेरे मिळवायच्या फंदात न पडलेल्या मूली आणि काकू असतात. गाडी balance झाली म्हणजे, गाडी आली हे त्यांचे ठाम मत असते. ह्या सहसा आपल्या माहितीचा परिसर सोडून फार कुठे जात नाहीत. पण तेवढ्या भागात फिरताना त्या स्वत:हला स्पेशालिस्ट पेक्षा कमी समजत नाहीत. इंडिकेटर, साईड मिरर हे सगळे जास्तीचे पैसे उकळण्यासाठी गाडी बनवणाऱ्या कंपन्यांनी दिलेले फीचर्स आहेत, असे त्यांचे ठाम मत असते. ह्या गोष्टी म्हणून वापरल्या जात नाहीत किंवा दयनीय अवस्थेत असतात. कधी कधी मिरर चा वापर लिपस्टिक लावण्यासाठी आणि इंडिकेटर चा वापर मुलाला खेळण्यासाठी असा केला जाऊ शकतो.

स्टाइल भाई

हे आपले नवीन गाडी हातात मिळालेले तरुणअसतात. त्यांच्या गाडी मध्ये फीचर्स आणि वेग ह्याची कमी नसते. हेल्मेट घालणे, traffic शिस्त पाळणे वगेरे त्यांच्या लेखी महत्त्वाचे नाही. जागा मिळेल तिथे गाडी घालणे, म्हणजे अगदी फूटपाथ वर सुद्धा गाडी घालणे ह्यात त्यांना काहिं चुकीचे वाटत नाही. Lane cutting, मोठ्या गाड्यांना कट मारून जाणे ह्यातच thrill असत असं त्यांना वाटते, पण घरी आपली कोणी वाट बघत आहे, हे त्या thrill मध्ये ते विसरून जातात.

मल्टी तस्कर

ह्यांना कमालीचा आत्मविश्वास असतो. ह्या सिग्नल वर एकाच वेळी त्या कानात लावलेल्या रेडिओ चे गाणे बदलत असतात, दुसरीकडे रस्त्यावर काहीतरी विकत घेत असतात आणि सिग्नल सुटणार म्हणलं कि, नेमके पैसे काढून देतात आणि मागून हॉर्न वाजवणाऱ्या लोकांना शिव्या देत सरळ निघून जातात. ही वेगळी गोष्ट की, हे सगळे करत असताना त्यांनी u-turn आणि उजवीकडे वळणारे traffic अडवून धरलेले असतात. हेल्मेट चा वापर डोके वाचायलाच न्हवे तर मोबाईल होल्डर म्हणून पण करता येतो हे मी ह्याचाच कडून शिकले.

डी जे बाबू

हे तरुण असतात, वडिलांची किंवा तत्सम कोणाची तरी नवीन अथवा महागडी गाडी फिरवत असतात. त्या गाडी मध्ये त्यांचे मित्र मैत्रीणी ही असतात आणि हे सगळे joyride साठी आलेले असतात. सहसा ह्यांच्या गाडीत लेटेस्ट गाणी एकदम high volume वर चालू असतात. ही गाणी इतक्या जोरात असतात की, बंद खिडकीतून सुद्धा मंद आवाज बाहेर येत असतो. ह्यांना मागच्या लोकांचे हॉर्न ऐकू येतात का? ही दाट शंका मला नेहमीच असते. 

हे काही लोक जे मला पुण्याच्या रस्त्यांवर सर्रास आढळले. तुमच्या शहरात असे लोक तुम्हाला आढळले का? काय सांगता, काही नवीन प्रकार चे लोक ही दिसले? जरूर कळवा खाली कमेंट मध्ये.

Categories
माझा कट्टा

Misson कंटाळा – ह्या आयांने शोधला आहे उपाय

माझी आई सध्या माझ्याकडे आली आहे. आपल्या मुलांकडे आलेल्या प्रत्येक पालकांसारखीच तिचीही व्यथा आहे. स्वतःच routine इथे बसत नाही. माझ्या routine मध्ये तिची लुडबुड होते, असं वाटतं पण काही केलं नाही तरी कंटाळा येतो! मग काय करावे?

 मला तिची व्यथा कळत होती, पण प्रत्येक मुलासारखे तिने माझ्याकडे राहावं, मला तिचा सहवास मिळवा असंही वाटत होत. दर वर्षी ती आल्यानंतर सुरवातीचे काही दिवस मजेत जातात, पण मग कंटाळा हळूच डोकवायला लागतोच.

आमच्या society मध्ये चालायला तशी बरीच मोकळी जागा आहे. छोटीशी बाग आहे. जिथे निवांत बसायला बाक आहेत. तिला रोज संध्याकाळी चक्कर मारायची सवय आहे. संध्याकाळचा तो एक तास तिचा असतो. तिचा तो एक तास सहसा अश्या निसर्ग रम्य आणि शांत परिसरात जात असत. 

ह्या वर्षी ती आली तेव्हा तिने स्वतःच एक टाइमटेबल करून आणले होते. सकाळी मी अमुक अमुक कामे घरात करीन असं तिने जाहीर केलं. हा दर वर्षीचा प्रश्न असल्यामुळे तिने ह्या वेळी त्या वर तोडगा काढायचा असं ठरवूनच आली होती. 

मला मदतीला ती आहे म्हंटलयावर माझी कामे पटापट आवरत. मग मला तिच्या बरोबर गप्पा मारायला जास्त वेळ मिळतो .

संध्याकाळचे ५वाजले की मात्र ती आवरायला जायची. मग ती चक्कर मारायला जायची. मी मुलांना खेळायला घेऊन जायची त्यामुळे खाली तिची माझी भेट होत नसे.

काल ती घरी आली तेव्हा म्हणाली, उद्या मी आणि माझ्या मैत्रिणी डोसा खायला शेजारच्या हॉटेल मध्ये जाणार आहोत. म्हणून संध्याकाळी यायला उशीर होईल आणि जेवणाचं पण फार काही खरं नाही.

तिचे हे वाक्य ऐकून मी चपापलेच! आईला आमच्या सोसायटीमध्ये मैत्रीणी होत्या. हे मला माहीतच नव्हतं ! “अगं तू हवं तर त्यांना घरी बोलावू शकतेस! आणि कोण आहेत ह्या मैत्रीणी? मला ही भेटायला आवडेल त्यांना!” आई हसली आणि म्हणाली, आम्हाला मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत आणि एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे. तोही celebrate करायचा आहे. 

तिने फोन सुरू केला आणि मला काही फोटो दाखवले. ५ बायका, ज्या समवयस्क होत्या. ह्यांचे विषय ही सारखे होते आणि येणारा कंटाळा ही सारखाच होता. कोणी आपल्या मुलाकडे आले होते. तर कोणी आपल्या मुलीकडे. २ जणी नुकत्याच कायमच्या मुलाकडे राहायला आल्या होत्या. 

women above 50 finding their way

” आम्ही रोज भेटतो. काही सुख दुखाच्या गोष्टी शेअर करतो. नवीन काही कळलं तर सांगतो आणि आपला दिवस कसा आनंदात जाईल हे बघतो. मी खूप काही शिकले सुद्धा ह्यांच्याकडून” आई म्हणाली.

एक काकू,  वय वर्ष ७० असून घर बसल्या ट्रान्सलेशनच काम करतात . त्यांचं मराठी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे फावल्या वेळ त्या अश्या प्रकारे सत्कारणी लावत होत्या. तर दुसऱ्या काकू ज्या गुजरातहून आल्या होत्या. त्या नवीन नवीन हस्तकलेच्या गोष्टी शिकून, आपल्या नातवंडांना आणि इतरांना देत होत्या. 

केरळ मधून आलेल्या काकूंनी तर कमालच केली होती. त्यांनी insurance चा अभ्यास करून परीक्षा देऊन, आता इन्शुरन्स एजंटच काम त्यांनी सुरू केले होते.

लखनौ मधून आलेल्या काकूंना स्वयंपाकाची भारी हौस. त्यांनी परप्रांतातून आलेल्या आणि सध्या एकटेच राहत असलेल्या बऱ्याचश्या society मधील मुला मुलींना घरचा डबा द्यायचा उद्योग सुरु केला होता. 

ह्या बायका रोज भेटायच्या, मनमुराद गप्पा मारायच्या, कोणी नवीन पदार्थ करून आणायच, तर कोणी वाचायला किंवा ऐकायला काही चांगलं असेल, तर ते सुचवायचे. कधी जुने किस्से निघत तर कधी जुन्या आठवणी.

ह्या सगळ्या बायकांच्या जिद्दी कडे पाहून आश्चर्य वाटले आणि खूप कौतुक सुद्धा! ह्यांना एक दुसऱ्याची भाषा काही येत नव्हती, पण संवाद साधता आला होता. परप्रांतात, आपल्या आप्तेष्ट आणि शेजार पाजारहुन लांब असूनही ह्यांनी नवीन मैत्रिणी जोडायच धाडस केल होतं ! ‘मी काय करू’ पासून ते ‘मी अजून सुद्धा मनात आणलं तर काही करू शकते’ पर्यंतचा प्रवास फार सहज रित्या पार पडला होता. आता मला आईच्या कंटाळ्याची काळजी नव्हती. 

Categories
माझा कट्टा

तपकीरी सोनं!

‘तपकीरी सोनं’ हे ऐकल्यावर तुम्हाला वाटत असेल कि माझं काहीतरी चुकतंय….  हो ना ? सोन्यामध्ये तर, तसे बरेच प्रकार असतात White gold, Yellow gold, Rose gold, Green Gold, Black gold हे सगळे सोन्याचे प्रकार तुम्ही ऐकले असतीलच. कधी तपकीरी सोनं(Brown  gold) ऐकलं आहे का? काय म्हणता …. नाही ऐकलं? “अहो हे सोनं तर, अगदी निशुल्क रित्या भरपूर प्रमाणात तुमच्याकडेच उपलब्ध आहे. अगदी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात मातीवर किंवा अगदी तुमच्या घराच्या गॅलरी मध्ये झाडाखाली सापडेल तुम्हाला….लगेच बघा”.

काय म्हणता “पाला-पाचोळा आहे झाडाचा”? “अहो हो, मग तेच तर…‘तपकीरी सोनं’. आता तुम्हाला सगळ्या वाचकांना प्रश्न पडला असेल कि हे काय नवीनच”?

आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरी झाडं असतातचं. मग झाड म्हणलं कि त्याची सावली, चविष्ट फळं, सुगंधी फुलं याचा आपण अगदी मन मुराद आस्वाद घेतो. झाडाची पानगळ जेव्हा सुरु होते तेव्हा मात्र अगदी बरेच जणांना तो पाला पाचोळा  झाडून ठेवायचा वैताग येतो. किती कचरा तो असं पटकन मनात येतं. मग कधी कधी तो कचरा वाऱ्याबरोबर रस्त्यावर उडतो देखील मग आजू बाजूची लोकं तक्रारीच्या सुरात टोमणे मारतात, “फारच पानं पडतात नाही झाडाची?” आपल्याला ‘हो’ म्हणण्या वाचून काही इलाज नसतो. मग शेवटी बरेच जण ह्या पानगळीच्या कचऱ्याला कंटाळून तो कचरा सरळ जाळून टाकतात. 

झाडांची पानगळ का होते? याचा कुणीच विचार करत नाही. आपल्याकडे साधारण नोव्हेंबर ते मार्च किंवा जून पर्यंत पानगळ होते. कारण झाड येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तयारी करत असते. पानांमधून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात  होते. पाणी टिकवून ठेवण्यासाठी झाडे पानं गाळून बाष्पीभवन कमी करतात. अश्या वाळलेल्या पानांचे आच्छादन जमिनीवर पसरल्याने सूर्याचे अति तीव्र सूर्य किरण थेट जमिनीवर पोहचत नाही. माती मधील ओलावा पर्यायाने टिकून राहतो. तसेच माती साठी उपयुक्त किडे आणि कृमी यांना देखील वाळलेल्या पानांचा आश्रय मिळतो. झाडं जमिनीतील ५०% ते ८०% पोषक द्रव्ये शोषून घेतात तीच पानांमध्ये असतात. वाळलेल्या पानं पुढे पावसानी कुजुन पोषक द्रव्ये, त्याचं रूपात परत जमिनी मध्ये जातात. निसर्गा मध्ये जी संकल्पना आहे ती अशी चक्राकार आहे. हे निसर्ग चक्र काम करत राहते. जगंलामध्ये हे सहज शक्य होतं. 

शहरामध्ये मात्र आपल्याला हा कचराचं. कारण आपल्याकडे जमीन थोडी आणि सिमेंटची जंगलंच फार. मग याचं करायचं काय? तर जाळायचं? जाळून काय होतं? तेही माहित करून घेऊया.

१)पाला पाचोळा जळाल्याने त्यातून अनेक घातक वायू आणि कण  बाहेर पडतात. हेच धुरा वाटे हवेत प्रदूषण वाढवतात.

२) धूरावाटे बाहेर पसरलेले कण श्वसनावाटे फुफ्फुसात जातात. खोकला, धाप लागणे, छातीत दुखणे आणि श्वसनाचे इतर आजार वाढीस लागतात. 

३) पाला पाचोळा अर्धवट जाळला तर कार्बन मोनोकसाईड(CO) हवेत पसरतो जो हानिकारक आहे. हा वायू रक्तामध्ये शोषला गेल्यास, रक्तपेशींची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते. तसेच जागतिक तापमान वाढीला कारणीभूत होतो. संपूर्ण पणे जरी तुम्ही पाने जाळली तरी कार्बन डायॉक्साईड (CO2) तयार होतो.

आता अश्या वाळलेल्या पानांचं करायचं काय? तर याचही उत्तर आता आदिती देवधर यांच्या ‘ब्राऊन लीफ’ या उपक्रमामुळे  तुम्हाला मिळेल. त्यांच्या या उपक्रमाबद्दल थोडं जाणून घेऊया.  

Aditi Deodhar
Photo Credit – The Brown Leaf

“गरज ही शोधाची जननी असते” असं म्हणतात, तसंच काही इथेही झालं. अदिती यांच्या घराजवळ वावळाचे एक झाड आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान झाडाची पानगळ होते. या पानगळीमुळे त्यांच्या घराचा परिसर आणि आजूबाजूचा काही भाग हा या पानगळीमुळं आच्छादून गेला. इमारती मधील रहिवाश्यानी  ठरवलं पानं जाळायची नाहीत. मग त्या पानांचं करायचं काय? हा प्रश्न उभा राहिला. अदिती यांनी whatsapp वर वेगवेगळ्या ग्रुप्सवर विचारणा केली तेव्हा त्यांना कळले कि त्यांची एक मैत्रीण जमिनीवर ३ कुटुंबाना पुरेल इतका भाजीपाला पिकवणार आहे त्यांना वाळलेल्या पानांची गरज होतीच. दुसऱ्या दिवशी त्यांची मैत्रीण सुजाता नाफडे पोत्यामध्ये भरलेली पाने घेऊन देखील गेल्या. तेव्हा अदिती यांच्या असं लक्षात आलं कि हा  पाला पाचोळा किती उपयोगी होतो. म्हणजे बरेच लोकांना हा पाला पाचोळा कचरा वाटतो तर दुसरीकडे काही लोक या पाला पाचोळ्याच्या शोधात देखील असतात. यातूनच ब्राऊन लीफ ही संकल्पना सुरु झाली. ब्राऊन लीफ हे लोकांना सोशल मीडिया च्या माध्यमातून पानांचे आच्छादन करणे, त्याचे खत तयार करणे आणि ज्यांना पाने -पाला पाचोळा हवा आहे त्यांना तो देणे किंवा कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करत आहे

१) आच्छादन करणे – वाळलेली पाने तुम्ही घरातल्या घरात एखाद्या कुंडी मध्ये  किंवा मातीवर छान पसरून ठेवली तर उन्हाळ्यात त्याचा खूप चांगला उपयोग होतो.निसर्गा तून निर्मित झाली ती गोष्ट पुन्हा निसर्गात समाविष्ट होते. निसर्गाचे चक्र या रीतीने कार्यरत राहते. 

२) खत तयार करणे – वाळलेल्या पानांचे खत तयार करणे ही त्यातल्या त्यात फार सोपी पद्धत आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मदत लागली तर नक्की घ्यावी. 

३) गच्चीवरील बागेसाठी- आता बरेच लोक हे अपार्टमेंट मध्ये राहतात. मग काही जण तिथल्या गच्चीवर किंवा अगदी बाल्कनीमध्ये झाडं लावतात. त्यासाठी माती आणा, कुंड्या आणा हे ओघाने आलेच कि मग. तर आता अश्या प्रकारच्या बागेसाठी माती ऐवजी हे पानांचे खत किंवा पाने तुम्ही वापरू शकता. शिवाय वजनाला हलकी असल्याने उचलण्यास सोपी पडते जागा बदलायची असल्यास सोपे जाते. वाळलेली पाने माती प्रमाणे पाणी  धरून ठेवत नाहीत त्यामुळे इमारतीला काही धोका नसतो. 

आता वरील उपलब्ध तिन्ही प्रकार करण्यास तुम्हाला जमत नसेल किंवा वेळ नसेल तर आता तुम्ही ती वाळलेली पाने चक्क दान करू शकता. आता ते शक्य झालं आहे अदिती देवधर यांच्या ‘ब्राऊन लीफ’ या उपक्रमामुळे. या अभिनव उपक्रमामुळे सध्या पुणे शहरात, सगळ्या ‘पाने हवी’ असणाऱ्या लोकांशी, त्यांच्या जवळपास, ‘पाने असणारे’ लोक ब्राऊन  लिफ मार्फत जोडले गेले आहेत. तरी देखील ‘पाने असणारी’ लोक 

जास्त आहेत तरी कुणी टेरेस गार्डनिंग किंवा शेतकरी असतील ज्यांना वाळलेल्या पानांची गरज आहे. अथवा कुठल्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी पुढील लिंक वर संपर्क करावा.  

https://brownleaf.org/contact

माहितीचा स्रोत- अदिती देवधर. 

अश्या रीतीने किमान तुमच्या घराजवळील एकही वाळलेले पानं जाळले जाणार याची खबरदारी जर प्रत्येकानी घेतली तर किती सहज शक्य आहे. आता वाळलेल्या पानांचा एवढा उपयोग होतो हे समजल्यावर त्याला ब्राऊन गोल्ड म्हणजे तपकीरी सोनं का म्हणू नये? झाडांचे किती उपयोग अगदी वाळलेलं पानदेखील  झाडा तील ५०% पोषक मूल्य जमिनीत परत घेऊन जातं. आपली जबाबदारी ती काय? झाडांना रोज पाणी घालणे इतकीच!

यावरून मला एक संस्कृत भाषेतील सुभाषित आठवलं . 

छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे ।  

फलान्यापी परार्थाय वृक्षा: सत्पुरुषा इव ।। 

अर्थात ,वृक्ष हे स्वतः तळपत्या उन्हात उभे राहून ,स्वतःची शीतल छाया इतरांना देतात. त्यांची सुमधुर फळे ती देखील दुसऱ्या साठीच आहेत. असे हे वृक्ष खरोखर सत्पुरुषाप्रमाणे आहेत. 

मग पुढच्यावेळेस पडलेला ‘पाला-पाचोळा’  कचरा समजून जाळू नका. लक्षात ठेवा तो ‘कचरा’ नाहीये. 

 ते ‘तपकीरी सोनं’ आहे. तर ते सत्पात्री दान करा.

Categories
माझा कट्टा

चला भक्तीला देऊ पर्यावरण संरक्षणाची झालर

आत्ताच विठु माऊलींची पालखी पुण्याहून निघाली. तो भक्ती मध्ये आकंठ बुडालेला जन समुदाय बघून मन भरून येते. आपसूक ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असे नामस्मरण होते. ह्या वर्षीची वारी मात्र अजून एका कारणामुळे सुंदर आणि अविस्मरणीय होती, ती म्हणजे ‘हरित वारी’ किंवा ग्रीन वारी ह्या संकल्पाने मुळे.

ह्या वर्षी वारकऱ्यांनी माउलीच्या चरणी आपली भक्ती आणि भूमातेच्या चरणी आपले श्रम दान करायचे ठरवले आहे. मंगळवेढा ते पंढरपूर ह्या २३ किलोमीटर मार्गावर त्यांनी ९,२०० रोप लावण्याचा चंग बांधला आहे. ह्या हरित वारी मध्ये भाग घेण्यासाठी बऱ्याच दिंड्या पुढे आल्या आहेत.  ह्यांना सोलापूर प्रशासन आणि वन विभाग देखील मदत करणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अख्या वारीच्या मार्गावर ही हरित दिंडी पुढच्या वर्षी काम करेल.

हरित दिंडी ची संकल्पना बऱ्याच खाजगी शाळा आणि शिक्षण संस्थांनी सुद्धा राबवायचे ठरविले आहे. ह्याच प्रकारे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ने देखील त्यांच्या (NSS) विभागाच्या मदतीने वारी च्या मार्गावर असलेल्या सगळ्या युनिव्हर्सिटी च्या खाली असलेल्या कॉलेज भोवती वृक्षारोपण चे काम हाती घेतले आहे. 

फोटो क्रेडिट – सकाळ टाइम्स

किती सुंदर संकल्पना आहे ना ही? ज्या भक्ती भावाने आपण मूर्ती पूजन करतो त्याच भक्ती नी  पृथ्वी सृजन करण्यात हातभार लावला तर त्या परमात्म्याला किती आनंद होईल? एका सुंदर कल्पनेला हजारो लोकांनी उचलून धरल्यानंतर ती यशस्वी का नाही होणार ?

एके काळी वारीच्या मार्गावर दोन्ही बाजूला डेरेदार सुंदर वृक्ष होते. ही झाडे दमलेल्या वारकऱ्यांना विसावा देत, सायंकाळी त्यांच्या सावलीत अभंग आणि कीर्तनाचे कार्यक्रम होतं. एखाद्याचा क्षीण हरपून जायचा त्या विशाल वृक्षांच्या सावलीत, पण आता प्रगतीच्या नावाखाली ह्या वृक्षांचा बळी गेला आहे. पण जर आताच काही केला नाही तर चेन्नई सारखी भीषण परिस्थिती फार लांब नाही . 

एका वारी यात्रे मध्ये जर हजारो वृक्ष लावली जाऊ शकतात तर विचार करा अशी भक्ती ची साथ पर्यावरणाला देश भरात मिळाली तर खरी हरित क्रांती लांब नाही. 

१. आपल्या देशात प्रत्येक गावात एखादी तरी पालखी किंवा मिरवणूक असते. जर प्रत्येक आयोजकांनी ठरवले कि ते त्या पालखीच्या मार्गावर वृक्षा रोपण करतील तर किती झाडे लावली जातील!

२. आपल्या गावात जत्रा असेल तर जत्रेच्या परिसरात वृक्षारोपण करा. 

३. देव दर्शनाला जात असाल तर वाटेत दिसतील त्या झाडांना थोडे बाटलीतलं पाणी घाला. 

४. घाटात पैसे आणि नाणी टाकण्याऐवजी बीज टाका. 

५. प्रवासाला जाताना आपल्या परिसरात सहज येणारी फळं बरोबर घ्या, व खाऊन झाली कि बिया रस्त्या किनारी मऊ मातीत पेरा. 

६. ट्री गणेशा सारखे बाकी देवांचे हि मातीचे व बीज असलेले मुर्त्या विकत घ्या

७. आपल्या व परिवारातील इतर जणांच्या वाढदिवसाला एखादे झाड लावा आणि ते जगवा. 

८. पावसाळ्यात पाणी आडवा आणि जिरवा. 

जर असे उपक्रम धार्मिक संस्थांनीं हाती घेतले आणि लोकांना त्यात दडलेली देव भक्ती पटवून दिली तर भारत एक पर्यावरण स्वरक्षणाचे उदाहरण म्हणून जगासमोर उभे राहील असे मला वाटते. 

Categories
माझा कट्टा

सुमनांचे सु‘मन’

परवा काही खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले. थोडी फार खरेदी झाली, मग नेहमीप्रमाणे भाजी घेण्यासाठी बाजारात गेले. थोडी फार भाजी हवी होती ती घेतली आणि निघाले. आता भाजी घ्यायला गेलेय म्हणल्यावर लिंबु, कोथिंबीर, पुदिना, नारळ, मेथी आणि कांदा या भाज्यांचे वास म्हणजे अगदीच ओळखीचे झाले आहेत. माझे डोळे बंद करून जरी मला कोणी विचारले, हि कुठली भाजी आहे ते सांग? तरी ते मी सांगू शकेन. “झाली बाबा एकदाची भाजी घेऊन” असं मी म्हणलं आणि तितक्यात कुठलासा छानसा सुगंध माझ्या नासिकेतून थेट मनापर्यंत पोहोचला. “अहाहा! किती सुंदर सुगंध येतोय” …. असं  म्हणतं, मी त्या दिशेने वळले आणि पाहते तर काय? समोर निशिगंध, चाफा या फुलांची रास होती. मन पार हर्षुन गेलं. कितीतरी वर्षांनी मी अशी निशिगंध आणि चाफ्याच्या फुलांची रास बघितली होती. लगेहाथ मी चाफ्याची आणि निशिगंधाची फुलं घेऊन बाजारातून बाहेरदेखील पडले, पण त्या फुलांच्या सुगंध काही केल्या मनातून नाहीसा होत नव्हता आणि तो नाहीसा व्हावा अशी माझी इच्छाही नव्हती. 

घरी आल्यावर आधी भाजी काढून ठेवली. मग त्या फुलांना अलगद पिशवीतून बाहेर काढलं आणि निशिगंधाचा काय सुगंध पसरला, आहाहा!  चाफ्याची फुलं थोड्यावेळ छान पाण्यामध्ये भिजवून ठेवली. घरामधल्या एका छान नक्षीकाम असलेल्या फुलदाणीत त्या निशिगंधाच्या फुलांना सजवलं. तेव्हा एक प्रश्न नक्की पडला. “मी त्या फुलांना सजवलं कि त्या फुलांनीच  माझं घर सजवलं”? तुम्हाला काय वाटतं? विचार केला तर आपल्या कितीतरी सणा समारंभांना आपण कैक प्रकारची फुलं वापरतो. लग्न- मुंज अश्या शुभकार्यानां गजरे-हार अगदी हमखास लागतातच. लग्न समारंभात लांब सडक केसांच्या वेणीवर माळलेला  मोगरा आणि अबोलीचा नाजूक गजरा खरंतर अजूनच शोभा आणतो. एखाद्या लावण्यवती स्त्रीला खरंतर मेकअपची गरजचं नसते. एक गजरा घातला की झालं… तसंच परकं पोलकं घातलेल्या एखाद्या छोट्याश्या गोंडस मुलीला गजरा केसात माळला तर ती अजूनच गोड दिसते नाही का?

फुलांचे सुद्धा स्वभाव असतात नाही का? म्हणजे आता बघा ना.. लग्न समारंभात मोगरा, अबोली,शेवंती ही फुलं अगदी हमखास हजेरी लावतातचं. चाफा आता तसा दुर्मिळ झाला आहे. पण मला मात्र चाफा नेहमी देखणा वाटतो. त्याचा रंग, सुगंध, छान मऊ पाकळ्या… फक्त डोळ्यासमोर पटकन अवतरित होत नाही झाडाच्या  पानांमागे दडून बसतो. शोधावं लागतं त्याला! सदाफुलीची फुलं मात्र अगदी सहज नजरेस पडतात. शाळेमध्ये एखादी सतत हसणारी मुलगी असावी… जी कधीही शाळा बुडवत नाही ना तशी. अबोली मात्र नावाप्रमाणे शांत, तिला सुगंधही नाही पण अंगणाच्या एखाद्या कोपऱ्यात ती मात्र तग धरून वाढते. एखादं दिवस अबोलीचं  फुलं दिसलं नाही तर मग मात्र तिचं अस्तित्व जाणवतं. कमळ, ब्रह्मकमळ हि फुलं मला उत्सुकता वाढवणारी आणि अध्यात्मिक प्रगती करणारी फुलं वाटतात. जास्वदींचे फुल मात्र अगदी आपली सहनशीलता बघत कधी कधी. आपण अगदी अधीर असतो नवीन उमललेलं फुल बघण्यासाठी,पण एकदा का ते उमललं कि, “चला आज फुल आलं, आता आधी देवघरातल्या गणपतीला वाहूया”  हाच भाव मनी जागृत होतो. हा आपला गुलाब मात्र वेगवेगळ्या रंग रूपात अगदी छान वावरताना आढळतो. कधी लाल, पिवळा, कधी गुलाबी, कधी अगदी शुभ्र, तर कधी अगदी काळा देखील. वेगवेगळ्या रंगांच्या छटामध्ये सतत भुरळ घालत राहतो. कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांकडून तर याला फारच डिमांड! Rose day, valentines day, Propose day या दिवशी तर गुलाबाच्या फुलाशिवाय चालतचं नाही. कधी कधी मला वाटतं….त्या गुलाबांना बोलता येत असतं..  तर कितीतरी successful or unsuccessful love stories ऐकायला मिळाल्या असत्या नाही का? किती जणांच्या प्रेमाचा ‘गुलकंद’ झाला हे देखील कळलं असतं, किती गम्मत आली असती. झेंडूच्या फुलांचा मात्र एक वेगळाच तोरा असतो. एरवी सजावटीसाठी आपण झेंडूच्या माळा करतो पण दसरा आणि दिवाळीला मात्र अगदी सोन्यासारखा दिसणारा झेंडू, सोन्याचेच भाव घेऊन बाजारात मिरवत असतो.

बाजारामध्ये फुलांचे बुके किंवा नुसती फुलं घ्यायला गेले कि आजूबाजूला दरवळणाऱ्या सुंगंधाने मन आपोआपचं  प्रसन्न होतं. तेव्हा जाणवतं …मन शांत करायला काही लागू पडत असेल तर हीच ती थेरपी. फुल विक्रेते देखील व्यवसाय म्हणूनच फुलं विकत असले तरी, मी तरी त्यांना आज पर्यंत कधी चीड चीड करून बोलताना ऐकलं नाही.मोगऱ्याचा गजरा विकणाऱ्या बायकादेखील किती प्रेमाने बोलतात, “ताई, गजरा घ्या ना, बघा छान दिसेल तुम्हाला” तेव्हाच फक्त केस कापल्याचे दुःख होतं. कदाचित फुलांच्या सुगंधाने त्यांचही मन शांत होत असेल. आपण आपली डोके दुखी, पाठदुखी, गुडघे दुखी कुरवाळत बसतो. पण या फुल विक्रेत्यांना मात्र एक दवा लागू पडतं असेल ती म्हणजे हे फुलरूपी सुखाची टोपली! बस्स, अजून काय पाहिजे? किती छान नाही का? सकाळी उठल्या उठल्या अशी छान टवटवीत फुलं नजरेस पडली तर दिवसभर आपल्यालाही कसं ताजतवानं वाटतं. मधुमालती, बुचाची फुलं याचा सुगंध अगदी थोडासाच येतो पण तरीही मनाला सुखावून जातो. मी राहते त्या सोसायटीमध्ये आम्ही लहान असताना एक गुलमोहराचं झाड होतं. त्याला फुलांचा इतका छान बहर असायचा. त्या फुलांमध्ये असणाऱ्या पाकळ्यात एक पाकळी थोडी वेगळी असते. त्या पाकळीमध्ये लाल आणि पांढरा असे दोन रंग असतात. त्याला आम्ही ‘कोंबडा’ असे म्हणायचो. मग खाली पडलेल्या फुलांमध्ये किती कोंबडे मिळतात त्यासाठी खटाटोप करायचो. त्याचबरोबर कॉलनीमध्ये अजून दोन झाडं लावली होती बरेचजणांना माहितही नव्हतं कि ती कुठली झाडं आहेत. बरेच वर्ष म्हणजे जवळ जवळ २० वर्षानंतर ते झाड पूर्ण वाढल्यावर त्याला खूप फुलं आली नंतर कळलं कि ते कैलासपतीचे झाड आहे. किती  छान सुगंध पसरतो त्या फुलांचा. आता माझी मुलगी त्या झाडांची फुलं गोळा करते. काही आठवणी असतात अश्याच ज्या मनात घर करून राहतात.

या फुलांचं आयुष्य खरं तर किती? फारफार एक दोन दिवसांचं पण सगळ्यांना प्रसन्न करतात, आपलंस करून घेतात. आपल्याला मात्र आयुष्यभर मदत करतात. त्यांची कुठे अपेक्षा असते मला अमुक हीच जागा पाहिजे. कधी देवाच्या चरणी अर्पण केली जातात. कधी लहान मुलांच्या हाती सापडतात. कधी कुणाच्या गळ्यातला हार होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात. तर कधी कुणाच्या अंत्य संस्काराचे साक्षी होतात. अगदी जन्माला आल्यापासून आपल्या  अंत्य संस्कारापर्यंत आणि त्यानंतरही. फुलं खरंच कधी कुठलाही भेदभाव करत नाहीत.

फुलांना राग, लोभ, मोह, माया, मत्सर, यापैकी कोणीही भुरळ घालूचं शकत नाहीत. आयुष्यातला एक दिवस असं जगून बघा, बघा जमतंय का? कुठलीही अपेक्षा न करता सतत दुसऱ्याला देत राहणं हे आपण …त्या फुलांकडून शिकलं पाहिजे नाही का?

Categories
माझा कट्टा

पुनर्जीवन जुन्या कपड्यांना आणि इको रिगेन, एक स्वप्नवत प्रवास!

प्रत्येक माणूस आपल्या आपल्या पद्धतीने नातेवाईक, मित्रमंडळ यांच्याशी संबंध जोडतो. कोणी एकाच शाळेत, तर कुणी एका कॉलेज मधले, हल्ली त्यातच एक नवीन प्रकारपण आलाय  तो म्हणजे सोशल मीडिया वरील फ्रेंड्स. असचं काहीस आपण आपलं फ्रेंड सर्कल वाढवतो नाही का? पण एक माणूस असा आहे जो तुम्ही दिलेल्या कपड्यांनी आणि त्या कपड्याच्या धाग्या धाग्यांनी माणसं  जोडतो. काय? खोटं वाटतंय? मग हे तुम्ही नक्कीच वाचा. खरंतर कापड तयार करताना काय? किंवा कापडापासून नवीन कलाकुसर तयार करताना काय? त्या व्यक्तीचं कळतं नकळत त्या कापडाच्या धाग्याशी एक वेगळचं नातं निर्माण होत. असंच नातं आहे, स्वप्निल जोशी, त्यांचे सहकारी आणि इको रिगेन या त्यांच्या ब्रॅण्डचं. त्यांचा ब्रँड किंवा इको रिगेन हि कंपनी नक्की काय काम करते त्याबद्दल थोडंसं सांगते. इको रिगेन हि कुठलीही स्वयंसेवी संस्था नसून एक कंपनी आहे.

इको रिगेनचे प्रोडकशन सेन्टर
छायाचित्र सौजन्य – इको रिगेन.

इको रिगेन नक्की आहे तरी काय?

आपल्याकडे असे बरेच कपडे असतात जे वापरात नसतात मग अश्या कपड्यांचं काय करायचं? हा मोठा प्रश्नं आपल्याला पडतो. काहीजण ते गरजू लोकांना दान करतात. काहीजण ते कपडे तसेच ठेवतात, वेळ मिळाला कि देऊ असा विचार करून. तर काहीजण चक्क कचऱ्यामध्ये टाकून देतातं. गरजुंना दान देणे कधीही चांगलेच पण नंतर त्या कपड्यांचं काय होतं? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? बरेच जणांना याच्याशी काही घेणं देणंही नसतं. माझ्या घरातले मला नको असलेले कपडे(एव्हाना त्याला दहादा कचऱ्याची उपमा किंवा गाठोडं असं म्हणलं गेलेलं असतं.) बाहेर गेले ना? मग बाकी मला काय करायचंय? विचार केलात तर असे दिसून येईल कि ते कपडे पुरेसे वापरून झाले कि या ना त्या प्रकारे कचऱ्यामध्येच जातात. असे होऊ न देता जर, तुमचे कपडे कुणीतरी घेतले त्याचे योग्य ते मूल्यांकन केले आणि त्याबदल्यात तुम्हाला, त्यांनी तयार केलेले काही नवीन प्रॉडक्ट विकत घेता आले  तर! बरं हे प्रॉडक्ट देखील कापडाचं रिसायकल करून तयार केलेले आहेत. त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इको रिगेन हा ब्रँड मेड इन इंडिया आहे. शिवाय हा पहिलाच असा ब्रँड आहे जो फक्त जुन्या कपड्यांपासून नवीन प्रॉडक्ट तयार करतो. ज्याचं जगातलं पहिलं शोरूम पुण्यामध्ये आहे. आहे ना अभिमानाची गोष्ट. जेव्हा इंग्लंड मधील रहिवासी भारतामध्ये येऊन इको रिगेन ब्रँडच्या बॅग्स घेतात तेव्हा ती प्रत्येक भारतीयाला अभिमानाचीच गोष्ट आहे नाही का?

इको रिगेन कश्याप्रकारे काम करते?

आता तरी कपड्यांसाठी ठराविक असा काही निष्कर्ष नाही. इथे सर्व प्रकारचे जुने कपडे स्वीकारले जातात. तुम्ही दिलेले कपडे, वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागले जातात. कपडे व्यवस्थित निर्जंतुक करण्यासाठी देण्यात येतात. कपडे निर्जंतुक झाले कि त्यापासून कुठले प्रॉडक्ट बनवता  येईल याचा विचार केला जातो. त्यानुसार त्यावर DESIGNING केले जाते, मग त्याचे पॅटर्न करून, कापड कापून शिलाई काम करून नवीन प्रॉडक्ट तयार होतं. ज्या कपड्यांची बॅग, सॅक तयार होते त्यापासून तेच बनविण्यात येतं. काही कपडे असे असतात ज्यापासून खरतर कुठलच नवीन प्रॉडक्ट तयार करता येत नाही, असे कपडे मग पानिपत या ठिकाणी पाठवून त्यापासून सुंदर, मऊ गालिचे आणि पायपुसणी करून घेतली जातात. इथे आवर्जून सांगावसं वाटतं कि पानिपतमध्ये दोनशे वर्षांपासून कापडाचे रिसायकल करण्याची प्रथा आहे. तूर्तास तरी इको रिगेनचे हे काम फक्त पुण्यापुरतंच मर्यादित असून भविष्यात पुण्याबाहेरही काम करण्याचा त्यांचा विचार आहे.

इको रिगेनचा उद्देश काय आहे?

ज्या प्रमाणात कपड्यांचा वापर वाढला आहे,त्याच प्रमाणात नको असणाऱ्या कपड्यांची योग्य ती विल्लेवाट न लावल्याने, साठून राहणाऱ्या घन कचऱ्यामध्ये वाढ होत आहे. असे फेकून दिलेले कपडे उकिरडयांवर साठून राहतात, ते पूर्णतः नष्ट होण्यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी लागतो. पाऊस आणि बाकी कचऱ्यामुळे ते कुजतात आणि पर्यायांनी प्रदूषणात वाढ होते. जुने कपडे म्हणजे कचरा नसून त्यातून नवीन वस्तूंची निर्मिती करता येऊ शकते हा विचार जास्तीत जास्त लोकांच्या मनात रुजावा. जुने कपडे हि एक खूप मोठी समस्या असली तरी त्यासाठी योग्य तो पर्याय  शोधण्याचे काम इको रिगेन करते.

छायाचित्र सौजन्य – इको रिगेन

इको रिगेनचे आधार

कुठलीही कंपनी यशस्वी होण्यासाठी त्या कंपनीबरोबर काम करणारी माणसं यांचा खूप मोठा वाट असतो. स्वप्निला या कामात सहकार्य करणारे त्याचे सहकारी सागर देव, सोनम चव्हाण आणि अप्पा जाधव हे त्यांना ऑपरेशन, मार्केटिंग आणि प्रोडक्शन मध्ये मदत करतात.सागर, स्वप्निल आणि सोनम हे महाविद्यालयीन मित्र-मैत्रीण, तर अप्पा हे अगदी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर काम करीत आहेत. “इको रिगेन हा ब्रँड जरी माझा असला तरीही माझ्यापेक्षा जास्त काम माझे सहकारी या इको रिगेन साठी करतात”. असं स्वप्निल सांगतो. त्यांच्यासह शिलाई काम कारणाऱ्या महिलांसाठी काही महिन्याचा ट्रैनिंग प्रोग्रॅमसुद्धा तयार केला आहे. यामुळे गरजू महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध होतेचं. त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीला एक व्यासपीठ देखील मिळतं. जगात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. याशिवाय काही घरगुती महिलांना देखील घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे.

आता जाणून घेऊया थोडंसं स्वप्निल बद्दल

स्वप्निलने B.E, M.B.A असे शिक्षण घेतले असून. २०१३ मध्ये  IIT मुंबईचा युवा उद्योजक( Young Entrepreneur) हा पुरस्कारदेखील  त्यांना मिळाला आहे. तसेच NCL तर्फे त्यांचं एक पेटंट सुद्धा फाइल झाले आहे. २०१५ मध्ये त्यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. त्यानंतर समाजाच्या हितासाठी काम करावे असे वाटल्याने, शोध सुरु केला आणि त्यांच्या असे लक्षात आले कि, वापरात नसलेल्या कपड्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. तो कसा सोडवता येईल याचा विचार करत असताना इको रिगेन या कंपनीची स्थापना करावी असे त्यांना वाटले. त्यासाठी ते स्वतः पानिपत याठिकाणी २ महिने राहून आले.

तुमचे वापरात नसलेले कपडे काही महिन्यांनी एका प्रकारचे दूषित वायू सोडू लागतात आणि हवा प्रदूषित करतात. तेव्हा प्रत्येकाने कपड्यांचा वापर कमी करावा. ते शक्य नसेल तर वापरलेले कपडे Recycle and Reuse केले तरी बऱ्याच प्रमाणात वापरात नसलेल्या कपड्यांची समस्या कमी होण्यास मदत होईल. तुम्ही देऊ केलेल्या कपड्यातून  नवीन रोजगार निर्माण होऊ शकतो याचाही विचार करा. तुमच्या मदतीला इको रिगेन आहेच. तेव्हा पुढच्या वेळेस वापरात नसलेल्या कपड्यांचं काय करायचं असा प्रश्न पडला तर इको रिगेन हे नाव नक्की लक्षात ठेवा.

माहितीचा स्रोत- इको रिगेन, स्वप्निल जोशी.

Categories
Uncategorized माझा कट्टा

गुढीपाडव्यातील विविधता!

गुढिपाडव्याची ,गुढी. Illustration by – सौरभ गाडगीळ.

गुढीपाडवा आहे म्हणल्यावर आपण सगळेच कसे एकदम उत्साहाने खरेदी करतो. नवीन कपडे, नवीन दागिने. प्रत्येक सणाच्या आधी घराची स्वच्छता करणं हे मगं आपोआप आलंच. पाडवा असो, दिवाळी असो किंवा अगदी श्रावण महिना असो वातावरणात कसं चैतन्य पसरते. लहान असताना मला असं वाटायचं की  सगळे सण फक्त महाराष्ट्रातचं साजरा होतात, किंबहुना त्यावेळी महाराष्ट्राच्या बाहेरील लोकं कुठले सण साजरा करतात? हा प्रश्नचं कधी माझ्या मनात आला नाही. जसं महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात झाली तसं काही तेलगू, कर्नाटक या प्रांतातील मैत्रिणींच्या सहवासात आल्याने त्यांच्याकडील त्या सणांचे महत्व कळलं. तर आज माहिती करून घेऊया त्यांच्या नवीन वर्षाबद्दल म्हणजे जसं आपण चैत्रातील शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतो, तसंच इतर काही दुसऱ्या राज्या मध्ये नवीनवर्ष कसे साजरा करतात. चैत्र नवरात्र हे देखील याच दिवसापासून सुरु होते. रामनवमीच्या दिवशी या नवरात्रीचा शेवटचा म्हणजे नववा दिवस असतो.

गोवा

गोव्याची आणि महाराष्ट्राची गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत बरीचशी सारखी आहे. गोव्यातही गुढी उभी केली जाते. गुढीपाडवा  गोव्यामध्ये पाडवो” असं म्हणलं जातं. येथेही दारावर तोरणं, रांगोळी आणि गुढी उभी करणे याला महत्व आहे. कडुलिंब आणि गुळ एकत्र करून त्यादिवशी सेवन करणे याला महत्व आहे. देवळामध्ये जाऊन देवदर्शन घेणे. तिथे खास सांन्ना असा इडली सारखा पदार्थ तयार केला जातो. खवलेल्या नारळाच्या गोड रसाबरोबर खाल्ला जातो. काही जण हिट रोस हा गोड इडलीचाही बेत करतात. पंचांगाची पूजा करून त्यातील संवत्सर फल वाचले जाते.

कर्नाटक

कर्नाटकातही गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. “उगादी\युगादी” या नावाने संबोधला जातो. नवीन युगाचा आरंभ असा त्याचा अर्थ. या सणासाठी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. कर्नाटकातसुद्धा  आंब्याच्या डहाळ्यांचे तोरण प्रवेशद्वारावर लावण्यात येते. पुरण पोळी याला इथे होळिगे किंवा ओबट्टू असं म्हणतात. कैरी घालून केलेले चित्रान्न असे काही खास पदार्थ केले जातात. इथेही कडुलिंब आणि गुळ एकत्र करून खाण्याची प्रथा आहे. पंचांगाची पूजा करून त्यातील संवत्सर फल वाचले जाते. देवळामध्ये जाऊन देवदर्शन घेणे.

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश येथे गुढी पाडव्याला “उगादी” असे म्हणतात. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा दिवस साजरा केला जातो. येथेही पहाटे अभ्यंगस्नान केले जाते. रांगोळी आणि दारावर आंब्याच्या पानांचे तोरण याला महत्त्व असतं. पचडी नावाचा खास पदार्थ बनविण्यात येतो.

तर माझ्या असं लक्षात आलं की, राज्य कुठलेही असो, नवीन वर्षाचं सगळेच जण अगदी उत्साहात स्वागत  करतात. बोली भाषा वेगळी असते. साजरा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या असतात. एकाच सणाला नावंही वेग-वेगळी असतात. गुढीपाडवा, युगादी, उगादि अशी. सगळ्यांच्या मनातील श्रद्धा आणि भाव एकच असतो. ती म्हणजे कृतज्ञता ब्रह्म देवासाठी, सृष्टी निर्माण केली म्हणून.

मग या सृष्टीचे संरक्षण करता यावं यासाठी आपण काय करू शकतो? याचाही विचार करायला हवा. नवीन वर्षाची सुरुवात करताना आपले सगळेच सण आणि उत्सव हे पर्यावरणपुरक कसे साजरा करता येतील? याचा विचार करूया! चला तर नवीन संकल्प करू “पर्यावरणपुरक सण साजरा करू!”