Categories
कविता

जिद्दी

लोकांना फक्त उद्धट, जिद्दी, कोणाचंही न ऐकणारी ती दिसली,
त्याच्या मागचं सत्य उलगडण्याचा कधीच कोणी प्रयत्न देखील केला नाही…
लोकांना फक्त ती निखळ हसणारी, फक्त आणि फक्त करिअर बघणारीच वाटली.
त्यांना कसं कळेल की तिथवर जाण्यासाठी देखील तिने  खूप खस्ता खाल्ल्या होत्या…
नशिबाने खूप वेळा हरवलं होतं,
आणि जिद्दीनं जिंकवलं होतं.
का कुणास ठाऊक लोकांना फक्त एकच बाजू दिसली,
का बरं दुसरी बाजू नेहमीच हरपली?
आणि साहजिकच मुखवटा घालून फिरणारे आपण,
कधी समजू शकलो असतो का दुःख तिचं आपण…
पण ती देखील तितकीच जिद्दी, तितकीच हट्टी
ती कुठे सांगणार होती तिचं स्वतःचं दुःख,
ती तर लढणार होती पुन्हा आणि…
आणि दरवाजा बंद करून रडणार देखील पुन्हा
वेड्यासारखी एकटीच तक्रार करणार पुन्हा…
सरतेशेवटी निर्णय घेणार पुर्ण संपवण्याचा
आणि सरतेशेवटी पुन्हा सगळं नव्याने पुर्ण करण्याचा देखील….
काय वाटलं तुम्हाला…
संपवण्याचा शब्दशः अर्थ घेतलात ना तुम्ही
साहजिकच आहे, त्यात तुमचा दोष नाही
एखाद्या स्वतंत्रपणे उडणाऱ्या, समुद्राला स्पर्श करणाऱ्या पक्ष्याला कशी समजेल एका कुंपणात बांधून ठेवलेल्या प्राण्याची कथा…
शेवटी तिच्या जिद्दीने तिला पुन्हा जिंकलवलचं,
आणि बळ दिलं तिच्या पंखांना नव्याने उडण्याचं….!!!

Categories
Uncategorized कविता

खेळ-भांडे

कड़क उन्हाळा न भयान शांतता..!
आज ही विचारात आठवनीत एकांतात गावातील शाळेत जाऊन बसलो..!

शाळा बंद त्या मुळे शांतता..
बसून वेगवेगळा विचार येत होता..

आजूबाजूला कोनी च नव्हतं,कधी पापनी लागली न कधी झोपलो कल्पनाच नाही..!
कुठला तरी आवाज कानावर पडला..
तोच झोप उडाली,थोड्या अंतरावर.. २-३ चिमुकले खेळत होती..त्यांचा धींगाना चालू होता..
परत झोपन्याचा प्रयत्न करतं होतो पन चिमुकल्यानचा आवाज झोप उडवत होता…

शेवटी बसलो त्यांचा कड़े बघत..
२ मुली आनि १ एक मुलगा..
छोट्या छोट्या डब्या..खेळ भांडी त्यात झाडाची पानं, छोटा गैस, त्यावर भांडी..
एक छोटसं घरच आहे जनु असा खेळ..

त्यांचातला संवाद थोड़ा काना वर पडला..

“ये हा माझा नवरा..
न आम्ही शेतात जातो..
तू आमची मुलगी तू घरीच थांब..”

लगेच त्यातली दूसरी मुलगी

“ये हा माझा नवरा न तू आमची मुलगी..
न तू घरी थांब.. नाय तर मि नाय खेळत…”

त्यांचा सवांद सोडा..
त्यांच् बोलन सोडा..

किती साहजिकच घडत होत्या ना लाहनपनी त्या गोष्टी …म्हणजे घर घर म्हणजे (संसार) एक खेळच खेळायचो, पण किती निरागसतेने..
अर्थ माहित नसायचा..पण भाव होता…
तो खेळ होता न आज ति एक जबाबदारी आहे..
ति निरागसता, तो चांगूलपणा, ते प्रेम ,तो भाव, या सगळ्या गोष्टी जबाबदारी आणि शारीरिक आकर्षण..
या ओझ्याखाली दडून पडल्या..

कारणं हा खेळ आज विकत घ्यावा लागतो..
या देवानघेवानला हुंडा ही म्हणू शकतोच.!

आज बघतो तर प्रत्येक संसारात तू तू- में में ..
मानसिक, शारीरिक त्रास, पुरुषात्मक विचार, चिड चिड, संशय, दारू या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत, कारण प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण मनाने किंवा प्रेमाने नाही तर डोक्यानी विचार करतोय..!

वाढत्या वयानुसार विचारात बदल होतोय पण मन मात्र कमकुवत होत चाललय..

सोप्या भाषेत सांगायच झाल तर..एक दिवस संसार लाहानपनीच्या खेळासारखा जगून बघा..!
कारण ज्या वयात काहीच कळत नव्हतं माझ्या मतेतरी तिथेच प्रेम होतं ..!

धनेश खंडारे.

Categories
कविता

कविता – वाटतं कधी तिच्यासाठी

वाटतं कधी तिच्यासाठी

कामातून वेळ काढावा

हात तिच्या हाती घेऊन

एक सिनेमा पहावा
गालावरच्या केसांची बट

तिने हळूच कानापाठी न्यावी

मग स्वतः मध्ये रमून

तिने ओढणीशी खेळ करावा
घरच्या वाटेवरून तिने

माझ्याहून थोडं पुढे जावं

मागे वळून पुन्हा

मलाच येऊन बिलगाव
प्रेमाच्या या गुलाबी रंगात

सदा रंगून जावं

हे कवी मन

तिलाच अर्पित करावं


शशांक

Categories
कविता

बाळाचे स्वप्नं (बालकविता)

पक्ष्यांनो जरा हळूच कुजबुजा

बाळ माझे निजले आहे,

स्वप्नांच्या दुनियेत रममाण

त्याच्या गाली खळी ओठी हास्य आहे ll

बाळ माझे निजले आहे

पावसा जरा हळूच कोसळशील,

तुझे शिंतोडे स्वप्नांवर पडून

त्याचे रंग ओघळून जातील ll

बाळ माझे निजले आहे

ढगा जरा हळुच गडगडशील,

तुझ्या हास्याच्या आवाजाने

स्वप्नी त्याच्या राक्षस येतील ll

बाळ माझे निजले आहे

सुखस्वप्नांनो तुम्ही लवकर या,

चाहुलीने मात्र तुमच्या

वाईट स्वप्नांना पिटाळून लावा ll

Categories
कविता

शब्द!

शब्द…
लागतात जिव्हारी
शब्द…
पाडतात हृदयाला घरे
शब्द…
करतात रक्तबंबाळ

म्हणून गप्पची बसावे?

तर शब्द…
रुसतात
शब्द…
देतात दिलासा
शब्द…
घालतात हळुवार फुंकर
शब्दच…
देतात आशा,आत्मविश्वास
शब्दच…
दाखवतात दिशा

कुठे, कधी, कुणाचे आपणच ठरवावे
आपले दान आपण पाडून घ्यावे.

Categories
Uncategorized कविता

काटेरी

काट्यांची सवय झाली आहे मला

त्यांच्या रुतण्यातही सुख वाटतंय,

वाटेवर एखादं फुल असलं तरी,

मला त्या सुखाचं भय वाटतंय ll१ll

फुलांच्या गळण्याचं सावट

मनावर सदा मी बाळगलय,

शाश्वत काट्यांच्या आधारावर

म्हणूनच मन विसंबलय ll२ll

फुलांपासून अलीकडे मी

चार हात अंतर ठेवलंय

काट्यांमध्येच उमलण्यात

सुख मी शोधलय ll३ll

काट्यांच्या सहवासाने

मलाही काटेरी बनवलय,

फुलांसारखं नाजुक असण्यापेक्षा

काटेरी असणं मी पसंत केलंय ll४ll

काटेरी झाल्यावर

भीती नसते कुणी खरचाटण्याची,

फुलांना मात्र सदा भीती

कुणीतरी कुस्करण्याची ll५ll