Categories
Uncategorized कथा-लघु कथा

म्हाद्या! भाग ३

आज खूप दिवसांनी लिहायला सुरुवात केली आहे. मागच्या म्हाद्या भाग २ मध्ये सरपंच म्हाद्यावर चिडला आणि तो त्याला घरी जाण्यास सांगतो इथपर्यंत आपण वाचले.. आता सरपंच त्याला त्याच्या छोट्या चुकीसाठी कामावरून काढेल का ? असाच प्रश्न पडला होता. आज वाचूया काय होतंय ते. 

म्हाद्या! भाग ३
चित्रकार- उमा लवंदे

म्हाद्या घरी गेल्यावर..

घरी गेल्यावर म्हाद्याने घडलेला प्रकार मालीला सांगितला. तू पण थोडी चिडली ..आणि घडला प्रकार चुकीचा आहे..पण त्यासाठी नोकरी वरून काढणं तिला पण पटलं नाही. दुसऱ्या दिवशी परत

म्हाद्या सरपंचाला जाऊन भेटला आणि पुन्हा विनवणी करून ..अशी चूक पुन्हा होणार नाही.. असा विश्वास दिला ..सरपंच रागीट असला तरी मनाने चांगला होता. त्यांनी लागलीच त्याला सांगितलं .. तुला काही मी कामावरून काढत नाही. येत जा कामावर.. 

दुसऱ्या दिवशी ..

दुसऱ्या दिवशी म्हाद्या कामावर हजर झाला. रोजच्या प्रमाणे  कामाला लागला. बाग बगीचा साफ करत होता.. तिकडून सरपंच आला.. आणि त्याला म्हाद्याला अजून चार जास्तीची काम सांगितली… म्हाद्यानी सगळी काम करून टाकली. तोपर्यंत रात्र  झाली. बऱ्यापैकी काळोख पसरला होता. सरपंच बाहेरून येणार …तेवढ्यात .. त्याचा पाय कुठेतरी अडखळला .. आणि तो पडला .. हे बघून म्हाद्या तिथे धावत जाणार… तोपर्यंत सरपंचाच्या डोक्यावर कुणीतरी मागून वार केला. सरपंच त्याला बघणार तोपर्यंत मारेकरी पळून सुद्धा गेला. तिकडून म्हाद्या धावत आला.. आणि सरपंचाला पकडलं.. आणि आधी उचलून घरात घेऊन गेला. सरपंचाला कळेचना की नक्की काय झालं? कोणी असं वार केला ते? म्हाद्याने मालकीण बाई ना घडला प्रकार सांगितला. मग लगेचच डॉक्टरांना बोलावून मलम पट्टी करण्यात आली. सुदैवाने जास्त दुखापत झाली नव्हती. मग म्हाद्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सरपंचांनी त्याला बोलावलं आणि विचारलं नक्की काय झालं? कोणी असा वार केला .. कारण सरपंच त्या माणसाला ओळखू शकला नव्हता.. म्हणून त्यांनी म्हाद्या ला विचारलं. तसा तो म्हणाला “म्या पन नाय बघू शकलो सईब त्यांना”. 

सरपंच त्याला म्हणाला ..तू माझा जीव वाचवला. मी तुला उगाचच बिन कामाचा समजत होतो.. तू एक काम कर.. तुझ्या बायकोला घेऊन इथे वाड्याच्या जवळच एक घर आहे.. तिथे राहायला ये. आणि उद्यापासून तू माझा खास माणूस म्हणून काम करशील आता ते बागेतली काम थांबव. साहजिक म्हाद्या ला आनंद झाला पण मनात प्रश्न आला.. आता नवीन घर म्हणजे घरभाडे पण द्यावे लागेल. त्यांनी मनातली शंका सरपंचाला बोलून दाखवली त्यावर सरपंच म्हणाला की तू त्याची काही काळजी करू नकोस ..तू माझा जीव वाचवला मी तुझ्यासाठी एवढं नक्कीच करू शकतो. तुझ्या घराचं भाड मीच देईन. तू फक्त माझ्या बरोबर रहा.

म्हाद्याला शेवटी कायमचं काम आणि राहायची सोय झाली म्हणून फार आनंद झाला. 

माली आणि म्हाद्या दोघेही नवीन घरी राहायला गेले आणि पुन्हा नव्याने नवीन स्वप्नं रंगवू लागले.

खरंतर माणसाची गरज असते किती…खूप कमी ..राहायला घर आणि पोटा पाण्यासाठी काम … बरेच लोक मात्र नश्वर सुखाच्या मागे धावताना दिसून येतात.. आता पुन्हा एकदा हे प्रकर्षानं जाणवतं.

Categories
आरोग्य कथा-लघु कथा पाककृती

अमृततुल्य, शक्तिवर्धक सुधारस

सध्या कोरोना व्हायरस नी नुसता धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे lockdown, शहरांच्या हद्दी बंद, कर्फ्यू हेच शब्द कानावर येतात. एकदाचा हा कोरोना जगाच्या हद्दीतून कधी हद्दपार होतोय असं झालंय.

एका बाजूला हे सगळं चालू असताना, दुसऱ्या बाजूला डी डी चैनल वर आपल्या सगळ्यांना जुन्या सिरीयल बघायला मिळत आहे. परवाच महाभारताच्या सिरीयल मध्ये भीमाची गोष्ट बघितली. दुर्योधनाने कपट करून काळकूट नावाचे जहाल विष खिरी मध्ये मिसळले. ते पिऊन भीम बेशुद्ध झाला. तश्या अवस्थेत दुर्योधनाने त्याला नदीत फेकून दिले. त्यानंतर तो नागलोकात पोहोचला. तिथे त्याला खुप साप चावले. पण काट्याने काटा काढण्या सारखे झाले आणि भिमाच्या पोटात गेलेले विष उतरले. भीम शुद्धीवर आला. नंतर तो नागराज वासुकी यांना भेटला. नागराज वासुकी यांनी भीमाला अमृततुल्य, शक्तिवर्धक सुधारस नावाचं पेय प्यायला दिलं व ते म्हणाले, “हे पेय तू जितकं अधिक घेशील तितकी अधिक शक्ती तुला मिळेल. एक भांडे भरून हे पेय प्यायलं तर दहा हत्तींचे बळ येतं.“(पुस्तक -महाभारत, लेखक- श्री. मंगेश पाडगांवकर) मग काय! बघता बघता भीमाने आठ भांडी सुधारस प्यायला. यानंतर भीमाची शक्ती तर सर्व प्रचलितच आहे.

अशाच शक्तीची सध्या आपल्याला गरज आहे. तरच ह्या काळकुट नामक कोरोना ला आपण हरवु शकू. त्यासाठी आपली आंतरिक शक्ती वाढायला हवी म्हणजेच, प्रतिकार शक्ती. हीच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वरील गोष्टीप्रमाणे आपल्याकडे पण एक पेय आहे. जे अगदी पूर्वीपासून चालत आलेलं आहे.माझी आज्जी सुद्धा हे पेय बनवायची. ज्याच्या मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. योगायोगाने त्या पेयाच नाव सुद्धा सुधारस च आहे.ह्या सगळ्या आपल्या जुन्या पद्धती व पक्वान्न आपण विसरलो होतो. त्या पुन्हा करून बघुयात. त्याच सुधारस पेयाची अगदी सोपी व सहज कृती खालीलप्रमाणे.

साहित्य :-

लिंबाचा रस :- १ छोटी वाटी

साखर :- ३ वाट्या

सोललेले वेलदोडे :- ५ ते ६

पाणी :- अर्धी / पाऊण 

( जी वाटि लिंबाच्या रसाला माप म्हणून वापराल, त्याच वाटीचे माप बाकीच्या साहित्यासाठी वापरावे.)

अमृततुल्य, शक्तिवर्धक  सुधारस - Photo credit Royalchef.info
अमृततुल्य शक्तिवर्धक सुधारस

कृती :-

  • प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन मधोमध चिरून दोन भाग करून घ्यावे. नंतर गाळणीचा वापर करून लिंबाचा रस पिळून घ्यावा म्हणजे बियांचा त्रास होणार नाही. आता हा काढलेला लिंबाचा रस बाजूला ठेवून द्या.
  • वरील सांगितलेल्या मापा प्रमाणे साखर घेऊन त्यात पाणी मिसळावे. नंतर गॅसवर ठेवून गोळी बंद पाक तयार करावा.( गोळी बंद पाक बनवण्याची सोपी पद्धत:- एका पेल्यात थोडंसं पाणी घ्या. पाक तयार होत असताना त्यातला एक थेंब पाण्यात घालून बघा. पाण्यामध्ये त्या पाकाची घट्ट गोळी तयार झाल्यास समजावे आपला पाक तयार झाला. तयार नसेल तर पाक पाण्यात पसरतो.)
  • पाक तयार झाल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्यावा.
  • आता या थंड पाकामध्ये आधी बाजूला काढून ठेवलेला लिंबाचा रस घालून मिश्रण नीट एकत्र करावे. या पद्धतीमुळे लिंबातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात.
  • शेवटी त्याच्यात आपल्या आवडीनुसार वेलदोड्याची पूड घालावी तुमचा शक्तिवर्धक, अमृततुल्य सुधारस तयार आहे.

Food for thought :-

नैसर्गिक लिंबू रस म्हटलं की चांगल्या गुणधर्मांची धावपट्टी सुरू होते. आधी vitamin C आठवते. मग iron absorption व त्याच्यामुळे वाढणार Hb, wound healing, heart disease वर गुणकारी. त्याच्यापाठोपाठ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत. हीच ती आंतरिक शक्ती आता एकदा हीच शक्ती वाढली की कितीतरी आजारांचे prevention होणार हो किनई. हुश्श! गुणधर्म सांगून दमले आता.

Categories
कथा-लघु कथा

प्रेम म्हणजे ….

“अरे! तुमची कसली लगबग चालू आहे?” राहुल  लॅपटॉप बाजूला ठेवून म्हणाला.

“सॉरी बर का! तुला डिस्टर्ब करायचा हेतू नव्हता माझा, मी फक्त माझे नी कॅप शोधत होतो”

“ सॉरी काय त्यात आबा!” तुमचे गुडघे दुखतायत का? थांबा आई कडून तेल घेऊन येतो आणि चोळून देतो,” असं म्हणत राहुल स्वयंपाक घराच्या दिशेने निघाला.

“नको नको!, अरे थांब, मला काही होत नाही. आम्ही पेंशनर्स क्लब चे सगळे उद्या पिकनिक ला जाणार आहोत ना” म्हणून म्हंटलं नी कॅप जवळ ठेवावी!

अरे वाह! मजा आहे तुमची! कुठे निघालात? राहुल नी विचारलं?

पाचगणी ला! 

मस्तच! पण उद्या खूप गर्दी असेल आबा! तुम्हाला माहित नसेल, पण उद्या ‘वॅलेंटाईन डे’ आहे!

“ मला माहित नसायला काय झालं? म्हणूनच तर आम्ही सगळे चाललोय, स पत्नी ‘वॅलेंटाईन डे’ सेलेब्रेट करायला” आबा मिश्किल पणे हसत म्हणाले!

काहीही हा आबा! राहुल आश्चर्याने म्हणाला.

काहीही काय? खर तेच सांगतोय! विचार आजीला.

‘वॅलेंटाईन डे’ म्हणजे नक्की काय रे? प्रेम व्यक्त करायचा एक दिवस हो ना? मग प्रेमाला वयाचा बंधन कुठे असत?

हम्म ते बरोबर आहे, पण रागावू नका, पण तुमच्या वयाच्या लोकांच जनरल मत असत कि “ही पाश्चिमात्य संस्कृती आहे, थिल्लर वागण्याचा दिवस आहे वगैरे! “

आता इथे तू गडबड करत आहेस! “पाश्चिमात्य संस्कृती चा बाऊ करणारे लोक सगळे कुठल्या तरी सुप्त उद्देशासाठी कांगावा करत असतात असं माझं मत आहे! आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तरच ते थिल्लर होते. मुलींची छेड काढणे, वॅलेंटाईन डे च्या नावावर व्हाययाद पणे वागणे आणि पार्टीच्या नावाखाली पैसे उकळणे मला मान्य नाही”

प्रेम  म्हणजे

प्रेम म्हणजे नक्की काय ?

पण आता बघ आमच्या काळी ‘वॅलेंटाईन डे’ असं काही नव्हते. मला आणि तुझ्या आजीला एक दुसऱ्याला जाणून घ्यायला, समजून घ्यायला खूप काळ गेला आणि हे होई पर्यंत संसार चक्र सुरु झालं होतं! तो काळही वेगळा होता म्हणा! तेव्हा माझ्याच बायकोला गजरा आणून द्यायची चोरी! तिला फिरायला घेऊन जाणे, किंवा तिच्या आवडीची गोष्ट आणणे तर लांबच राहील!

 उमेदीच्या काळात कधी वेळ नव्हता, तर कधी पैसे! संसाराचा गाडा ओढताना आम्ही आजी आबा कधी झालो हे कळलंच नाही.

तसेच तुझ्या बाबाचंही झालं आहे आता. काळ बदलला असला तरी तुझे आई- बाबा नोकरी करतात. टेन्शन, भविष्याची काळजी, तुम्हा मुलाच्या भविष्यासाठी करावी लागणारी जमवा जमव, आम्हा म्हाताऱ्यांचे आजारपण ह्या सगळ्यामध्ये त्यांचा संवाद हरवलाय!

आता उद्या अनायसे वीकेंड आहे. तुझे काहीतरी प्लॅन असतीलच हे मला माहित आहे. आम्ही पण निघालो पिकनिकला, म्हणजे तुझ्या आई-बाबांना मस्त निवांत वेळ मिळेल का नाही एक दुसऱ्यासाठी?

आबा तुम्ही कसले सॉलिड आहात! आमच्या कॉलेज मध्ये फेस्ट आहे, म्हणून मी तर तिथेच असणार आहे. ग्रेट आयडिया आबा!

“आता प्रेम व्यक्त करण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची गरज नाही अश्या मताचा मी पण आहे, पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जर एक दुसर्याशी बोलायला किंवा व्यक्त व्हायला वेळ मिळत नसेल तर एखादा राखीव दिवस असण्यात काय वाईट आहे?” 

“शेवटी पाडगावकरांनी म्हंटलंच आहे “ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं….तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं” फक्त काळ बदलतो, भावना नाही,” आबा हसत म्हणाले. 

आबा हे काय म्हणालात आता? 

अरे तुला पाडगावकरांची हि कविता माहित नाही? उघड ते youtube ! आज तुला ती कविता ऐकवतो… 

Categories
कथा-लघु कथा

म्हाद्या! भाग २

म्हाद्या या कथा मालिकेमध्ये …मागच्या म्हाद्या भाग १ मध्ये आपण माली आणि म्हाद्याची प्रेम कहाणी कशी सुरू झाली आणि ती त्यांच्या लग्नापर्यंत सुफळ संपूर्ण झाली ते वाचले ..आज त्याचा पुढचा भाग वाचूया..

म्हाद्या - a short story in marathi
चित्रकार – उमा लवंदे

आता लग्न झालं म्हणून दिवसाकाठी काही पैसे शिल्लक असावेत या हेतूने म्हाद्याने गावातल्या सरपंचाच्या घरात घरगडी म्हणून काम बघायचं ठरवलं, तेवढीच कामाची कायमची सोय होईल अशा विचाराने सरपंचाचे घर गाठलं. सरपंच पांढरा स्वच्छ कुर्ता-पायजमा, डोक्यावर घट्ट फेटा बांधून बसलेले, म्हाद्याने बाहेरुनच विचारलं,” धनाजी साईब, येऊ का घरला? घरात हाईसा का”? 

सरपंच:” आर कोन हाय रं, सक्काळ सक्काळ? 

घरातल्याच एका गड्याकडे  हात दाखवून… ” ए, जा.. शिरप्या ..कोन हाय.. ते बघून ये”.

घरगडी बघून येतो,” साईब ते …तो म्हाद्या हाय”.

सरपंच: “आर कोन म्हाद्या? त्याचं काय काम माज्याकडं”? वैतागून सरपांचान त्याला आत पाठवायला सांगितलं.

शिरप्या: “म्हाद्या सरपंचांनी बोलीवल हाय” असा निरोप देत.. शिरप्या म्हाद्या ला घेऊन येतो… “साईब हा म्हाद्या”. 

मळकट कपडे घातलेला म्हाद्या खूर मांडी घालून हात जोडून सरपंचाच्या समोर जमिनीवर येऊन बसला…”काय रं, तुझं काय काम हाय माज्याकड”? मोठे डोळे करत आणि कपाळाला आठ्या पाडत सरपंचाने त्याला विचारलं. “साईब त्ये, थोड, बोलाईचं व्हत, म्हनजी.. म्या लगीन केलया “आता…

म्हाद्याचं बोलणं पूर्ण होतं तोवरच ” अरे वा, लगीन तुला कोनी मुलगी दिली रं, का पळवून आणलीस कोनाची?” जरा दरडावून सरपंचन विचारलं, “न्हाई न्हाई, तसं काय नाय बघा साईब.. ते लगीन झालं नाय का, म.. आता जरा जास्ती पैक लागत्याल ना म्हणान.. तुमच्या वाड्यात काही काम असशील ना तर मला ठेवशीला का कामावर? असं ईचारायचं व्हत” पैक तुम्ही द्याल तेवढं चालत्याल”. सरपंच विचार करत “बरं तुला काम हवय? काय काम करशीला, बागेत काम कराया जमाल का? बागेची साफसफाई झाड कापायची जमाल का? चोरी करायचा इचार पण मनात आणू नको जमणार असलं.. तर उद्यापसन ये कामाला?”

“व्हय, व्हय साईब करेन की  म्या.. येतो उद्यापासून”. असे म्हणत म्हाद्या सरपंचाच्या घरातून निघतो… तडक तो त्याच्या झोपडीवजा घरात पोहचतो,” ये माली.. म्या उद्यापासन सरपंचाच्या वाड्यावर जानार हाय कामासाठी जरा जास्तीच पैक मिळतील …”आर म्हाद्या पैक मिळत्याल पन किती मिळणार हाईत”? मालीन खूश होऊन त्याला विचारलं.

“तसं काय सरपंचन सांगितलं न्हाय, येक मईना येके ठिकाणी  काम तर मिळल… रोज कुठं नवीन काम शोधाया जाईच नव ..शिवाय सरपंचाचा वाडा म्हणजी.. उरलंसुरलं अन्न अस्सल… तर ते पन मिळाल न्हव आपल्याला”.. असा विचार करून दोघेही झोपले.

म्हाद्याचा कामावरचा पहिला दिवस….

दुसऱ्या दिवशी म्हाद्या भल्या पहाटे उठून धनाजीराव सरपंचाच्या वाड्यामध्ये कामासाठी म्हणून गेला..”साईब म्या आलो… सांगा काय काम करू”?
“आर जा ती बाग झाड सगळी… झाडाच्या फांद्या काप..सगळं काय आता म्याच सांगायचं  का? परत  ईचारायचं नाय ध्यानात आसू द्या” सरपंचाचा तोरा बघून म्हाद्या लागलीच बागेत पळाला.

“पर साईब..ते सामान लागल …बाग साफ कराया”.. असं विचारल्यावर सरपंच अजून चिडला “कुठून तरी घ्या.. आर..यांना प्रश्नच जास्त पडत्यात, आत जा इचार कुणालातरी, देतात सामान तुला कोनि तरी”.
सरपंच रागावून बोलला आणि बाहेर निघून गेला तसा म्हाद्या जरा  हिरमुसून  आत गेला आणि सामान घेऊन बाहेर आला आधी सगळी बाग स्वच्छ करून घेतली मग झाडाच्या फांद्या तोडल्या दुपारी थोडफार काहीतरी खाऊन, मग पुन्हा थोडं काम करून दमून तिथे बागेत एका झाडाखाली निजून गेला… थोड्यावेळाने तिथे सरपंच आला. त्याच्या कमरेत लाथ घालून ओरडला “काय रे झोपाया आला का तू हीथ? उठ कामाला लाग” तसा म्हाद्या खडबडून जागा झाला हात जोडून कळवळून म्हणाला ,”चुकलं साईब येक डाव माफी करा ..परत आस व्हायचं न्हाय”.असं म्हणून सरपंचसमोर उभा राहिला ..तसं सरपंचन त्याला घरी जायला सांगितलं. “साईब कामावरून काढू नका “? अशी विनवणी करत म्हाद्या तिथंच उभा राहिला.

आता यापुढे काय होईल? सरपंच त्याला कामावरून काढेल की नाही ?

ते तुम्हाला कळेल पुढच्या भागात! अर्थात म्हाद्या भाग ३ मध्ये .. तोपर्यंत वाचत रहा .. आणि गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा!

Categories
कथा-लघु कथा

आईला काळजी, पण नक्की कशाची ?…

आई you are no fun ! असा उद्रेक  करत रागात पाय आपटत पुर्वा निघून गेली आणि खोलीचे दार आपटले. मंजिरी हताश पणे त्या बंद दरवाज्याकडे बघत राहिली.

पुर्वा ही मंजिरीची 14 वर्षांची मुलगी. मंजिरी, पुर्वा आणि तिचा छोटा भाऊ अनिकेत असं त्याचं छोटंसं कुटुंब. मंजिरी चे पती navy मध्ये होते, त्यामुळे ते बरेचदा बोटीवर असायचे. घरची सगळी जबाबदारी मंजिरी वरच होती. 

मंजिरी ने पटकन डब्बे भरले आणि घरातील बाकीची कामे उरकू लागली. तिला आज मुलांना शाळेत  सोडून, ऑफिस ला जायच्या आधी तिच्या मैत्रिणींना भेटायचे होते . खरं तर तिचा आता मूडच नव्हता. तिने तसा message करण्यासाठी फोन हातात घेतला सुद्धा, पण तेवढ्यात अनिकेत नी बोलावले आणि message पाठवायचा राहीला. 

दोघांना शाळेच्या बस मध्ये बसवून देताना सुद्धा पुर्वा मंजिरीवर नाराजच दिसली पण मंजिरी काही बोलली नाही. ती मैत्रिणींना तिच्या ऑफिस जवळच्या एका हॉटेल मध्ये नाश्त्यासाठी भेटणार होती . ३-४ महिन्यातून एकदा ह्या कॉलेजपासूनच्या ४ मैत्रिणी वेळ काढून भेटायच्या. 

चौघी जमल्या आणि ऑर्डर दिल्यानंतर नीता ने मंजिरीला विचारले 

“ आज काय बिनसलं पुर्वा बरोबर ?”

“हं , तुला कस कळलं ?”

“ आपण इतके वर्ष ओळखतो एकमेकींना, मूड ऑफ आहे, हे ओळखणं काही अवघड नाही आणि आमच्या घरातही एक लौकरच सुजाण होणारी कन्यारत्न असल्यामुळे कोणाशी वाजलं असेल ह्याचा अंदाज बांधणं ही अवघड नाही”.

नीताच हे वाक्य ऐकून चौघी हसायला लागल्या . नीता, मंजिरी, प्रीती आणि संगीता ह्या चौघी कॉलेज पासूनच्या घट्ट मैत्रिणी. त्या नंतर नौकरी , लग्नं आणी मुले सुद्धा जवळ जवळ एकाच कालावधीत झाल्यामुळे त्यांची मुले, त्यांच्या संबंधित असलेल्या अडचणी आणि रुसवे फुगवे त्या एक मेकींबरोबर share करत असत. 

मंजिरी म्हणाली “ अग पुर्वा आजकाल अशक्य झाली आहे! काहीही सांगितलं तरी उलटं समजते! I just can’t handle her anymore! कालच ती माझ्या बरोबर भांडली कारण मी तिला 7 दिवसांच्या दिल्ली ट्रीपला पाठवायला परवानगी दिली नाही. अग ह्या अल्लड वयाच्या मुलींना काही कळतं का ? सगळ्या बाबतीत नुसती मजा आणि मस्ती.”

“ तुला नक्की काय खटकतंय?” नीता नी विचारले

“सगळंच ! ह्या शाळा आपल्या कडून आधीच सही करून घेतात “ तुमची मुलं तुम्ही स्वतःच्या जबाबदारी वर पाठवताय म्हणून. आता ७ दिवस दुसऱ्या शहरात मुलीला पाठवायची आणि ते कोणाच्या जबाबदारी वर ? उद्या काही झाल तर शाळा हात झटकणार, मग मी कोणाकडे पाहायच?

बर, आत्ताच्या जगात कोणावर विश्वास ठेवण्यासारखा आहे का ? काय, काय ऐकतो आजकाल! काळजी वाटते ग! उद्या लोक लगेच बोट दाखवायला कमी करणार नाहीत – वडील इथे नसतात आणि आईच काही लक्ष नाही म्हणून “ मंजिरी थोडी संतप्त अश्या स्वरात म्हणाली . 

तू तर अशी नव्हतीस ! नीता शांत पणे म्हणाली 

हे ऐकताच मंजिरी चपापली, “ म्हणजे ?”

अग, आपण कॉलेज मध्ये असताना माझे आई -वडील आपल्या ट्रिपला परवानगी देत नव्हते तेव्हा तूच त्यांची समजूत काढायला आली होतीस ना ? प्रीती म्हणाली 

आम्हाला तुमची काळजी कळते आणि आम्ही वचन देतो की आम्ही जवाबदारीने वागू , असच म्हणाली होतीस ना ? मग आज तूच काय अशी वागत आहेस ?

“ तो काळ वेगळा होता, आणि मी पण अल्लडच होते अस म्हणीन मी आता. माणूस जीवनात अनेक प्रसंगामधून शिकतो. तसेच मी शिकले असं म्हण हवं तर”

“अग पण पुर्वा ला पण शिकू दे की ” संगीता म्हणाली. 

“आपल्या कॉलेज ट्रिप च्या वेळी आपले आई -वडील हाच विचार करत असतील ना ? पण त्या वेळी त्यांनी  आपल्याशी बोलून , चर्चा करून मग निर्णय दिला होता” नीता म्हणाली 

“तुझी भीती मी समजू शकते पण पुर्वा ला आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर मजा करायचा हक्क आहेच की ?”

“मी सुचवेन कि तू शांत पणे एकदा तिच्याशी बोल. तुझी भीती, चिंता तिला सांग. आपण जग बदलू शकत नाही पण आपल्या मुलांना आपली काळजी सांगून, त्यांना जाणीव नक्कीच करून देऊ शकतो नाही का? “

प्रीती म्हणाली “आणि आपल्या मुलांवर आपण विश्वास नाही  दाखवणार तर कोण दाखवणार ? आपण आज पर्यंत त्यांना जे शिकवले , जे संस्कार त्यांच्यावर केले त्या मुळे ते स्वतःची काळजी नक्कीच घेऊ शकतील हो ना ?” आपल्या ट्रिप च्या वेळी जेव्हा बाबांनी तुला भेटल्या नंतर होकार दिला तेव्हा मला खूप वाईट वाटलं होता, हा विचार करून की त्यांना माझ्या वर विश्वास नाही. पण बाबा नंतर म्हणाले की, प्रश्न माझ्यावरचा विश्वासाचा कधीच नव्हता, त्यांना चिंता होती मी कोणाच्यासंगतीमध्ये आहे याची.. आणि तुम्हाला भेटल्यावर त्यांची चिंता दूर झाली.

“अग पूर्वा तर black belt आहे ना ? मला तिची नाही तर तिला त्रास देऊ पाहणार्यांची काळजी जास्त वाटेल ” संगीता म्हणाली. तोच चौघी मैत्रिणीच्या चेहऱ्यावर हसू आले आणि गरमा गरम चहा घेत घेत त्यांच्या गप्पा रंगल्या. 

Categories
कथा-लघु कथा

म्हाद्या ! भाग १

म्हाद्या  हा एका छोट्याश्या गावात राहणारा.. गावा मध्येच पडेल ते काम करून पोट भरणारा. आई वडील लहानपणीच गेल्यानं, लहानपणा पासून गावात राहून मिळेल ते काम करून पैसे कमवून दिवसाकाठी अर्ध पोटी झोपणारा. 

फाटलेला, मळलेला झब्बा आणि धोतर ..डोक्याला रंग ओळखूही  येणार नाही, इतपत मळलेला एक पंचा ..उन्हात काम करताना डोक्याला बांधायलाही तोच आणि  घाम टिपायलाही तोच!

म्हाद्या - ची कथा

असा हा म्हाद्या साधारण ३० वर्षाचा. प्रामाणिक आणि कष्टाळू. एक दिवस असाच गावात फिरताना त्याला एका घराच्या कुंपणाशी एक मुलगी दिसली. अंगानी अगदी बारीक.. रंगानी गव्हाळ ..नाकी -डोळी  देखणी…आणि कमरे पर्यंत लांब केस.. आणि अंगात त्यातल्या त्यात बरी असेल, अशी रंग गेलेली ..पण कुठेही न फाटलेली अशी साडी नेसलेली .. असा काहीसा तिचा वेष.

ती त्या कुंपणाच्या बाहेर उभी राहून…आत असलेल्या एका गुलाबाच्या झाडावरचे एक फुल तोडायचा प्रयत्न करत होती. कोणी आपल्याला बघत तर नाही ना… कोणी त्या घरातून बाहेर तर येत नाही ना ते ती अधून मधून बघत होती. म्हाद्या हे सगळं बघत होता… आपल्याकडे याला  चोरी म्हणतात, पण गावात त्याला एखाद्याची गोष्ट न विचारता घेणे एवढंच म्हणतात. कितीदा तिला कुंपणा वरची तार लागली, कुठे पायाला थोडे खरचटले पण काही केल्या त्या मुलीला ते फुल तोडायला काही जमत नव्हतं. म्हाद्या शेवटी तिथे गेलाच .. त्यांनी स्वतःकडे एक आणि फुलाकडे एक बोट दाखवत, खुणेनेच तिला..मी काढून देऊ का? एवढंच विचारलं, तिनं होकारार्थी मान हलवल्यावर त्याने लगेचच तिला … ते गुलाबाचं फुल काढून दिलं. दबक्या आवाजात “येक पुरं का”? असं तिला विचारलं. तिनं त्याला नुसतं एक स्माईल दिलं आणि लगेच ते फुल स्वतःच्या केसात माळलं. दोघेही आपापल्या वाटेनं निघून गेले. 

दुसऱ्या दिवशी म्हाद्याने परत तेच बघितलं, यावेळी त्यानं तिला न विचारताच, फुल काढून दिलं. म्हाद्यानं तिला विचारलं, “ह्ये, आस ..तू .. रोज रोज फुल का नीतीस ”? 

ती म्हणाली, “त्ये .. आसच .. केसात माळायला … आमाला ना चांगली कापडं, ना बाकी काय ..म्हणून आपलं ह्ये फुल घालते. तेव्हडंच आपलं रोज नवीन काहीतरी घेतल्या परीस वाटतं  नव्ह”.  

म्हाद्यानं ‘व्हंय’ म्हणतं मान हलवली. 

तेवढ्यात तिनं विचारलं, “तुमी कोन”? 

तो म्हणाला , “म्या म्हाद्या, हिकडं या रस्त्याच्या पलीकडं त्यो मोठ्ठा वाडा हाय नव्ह …त्याच्या मागल्या रस्त्यावर एक वस्ती हाय, तिथ म्या राहुतोया”, “तुमी कोन”?

त्यावर ती म्हणाली, “म्या माली, लहानपनापासनं, म्या ह्याच गावात हाय, रोज कुनाच्या तरी परसातलं फुल घ्यायचं  नी केसात माळायचं ..म्हणान गावातले लोक माका माली म्हणाय लागे”. म्या, गावा मधी एकटीच राते हाय, माझे, मायबाप, माका लहानपणीच सोडून गेले”. तवापासून मी या गावातच राहिली हाय, या गावातच मी कुना कुनाच्या  घरामंदी काम करते, कुनाची फरशी पुसते, कुनाची भांडी घासते. असं काय बाय काम करत असते.. ” तुमी काय काम करता? मालीने म्हाद्याला विचारले.

म्हाद्या म्हणाला,” म्या, कुनाच्या घरी काय पडाल ते काम करतू, कुनाची विहीर साफ करतू, कुनाच्या  बाग साफ करतू, नारळाच्या झाडावर चढतू, नारळ काढतू, कुठं कुनाला… काय मदत पायजे असलं  आणि मला चार पैक मिळणार असतंल, तर तिथं म्या काम करतू”.

दोघांमध्ये एवढं संभाषण होऊन .. मग एक जण काम शोधायला आणि एक जण काम करायला असे ते दोघेही..  आपापल्या वाटेने निघाले. त्यांनी तिला फुल काढून द्यायचा आणि तिने ते फूल केसात माळायचा हा सिलसिला बरेच महिने पुढेही अविरतपणे चालूच  होता. दोघेही रोज एकमेकांशी बोलायचे आणि नकळतपणे दोघेही एकमेकांना समजून घेऊ लागले. दोघांची परिस्थिती सारखीच आहे हेही दोघांनाही आतापर्यंत कळून चुकले होते. दोघांनाही म्हणावा तसा कोणाचाच आधार नव्हता. 

असंच एक दिवस

म्हाद्याने झाडावरचे छान टवटवीत, गुलाबाचे फुल झाडावरून तोडले आणि आज त्यांनी तो गुलाब मालीच्या हातात न देता, तो थेट तिच्या केसात माळला. तसं माली त्याच्याकडे , काहीशी आश्चर्याने, काही गोंधळल्यासारखी आणि काहीशी आनंदी होऊन बघू  लागली. तसं वेळ न जाता म्हाद्याने मालीला वेळ न घालवता विचारले,”आपन लगीन करायचं का? तसं काहीसं लाजून आणि काहीच खुश होऊन, मालीन ‘हो’ म्हणून मान हलवून त्याला होकार दिला. तसं म्हाद्या खुश होऊन गावभर पळत सुटला. दुसऱ्या दिवशी म्हाद्या आणि मालीन गावातल्या देवळात जाऊन लग्न करायचं ठरवलं..आता ह्या दोघांनी कुठल्याश्या देवळात जाऊन एकमेकांशी लग्न केलं, आता त्यांचं लग्न म्हणजे काय फार मोठा सोहळा नाही. ते दोघे आणि देवळातला देव ,हे एवढेच ! दोघांनी  देवाच्या साक्षीने एकमेकांना छोटे छोटे हार घातले. त्यांनी तिच्या गळ्यात काळं डोरलं बांधलं ..झालं दोघांचं लग्नं. बाकी काही नसलं तरी दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं.

आता दोघांचं लग्न झालं खरं.. पण आता यापुढे काय होईल, कसा असेल या दोघांचा प्रवास ? जाणून घेण्यासाठी लवकरच भेटू पुढच्या भागात !

Categories
कथा-लघु कथा

रक्तगटाच्या शोध मोहिमेची गोष्ट

आपल्या या जगात कितीतरी प्रश्न असे आहेत ज्याची उत्तरे आत्ता खूप सहज सोपी वाटतात. आता हेच बघा ना पहिल्या महायुद्धात किती लोकांचे जीव गेले. रक्ताचे पाट वाहिले, पण विचार करा कि ज्या वैद्यकीय सुविधा आज आहेत. तशा तेव्हा असल्या असत्या तर किती लोकांचे प्राण वाचले असते? पण त्याकाळी एक शोध असा लागला होता की ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले होते. त्या शोधाचा उपयोग आजच्या काळात आपण सर्रास करतो. साध हेच बघा ना गरज पडली तर आपण एकाच रक्त सहज दुसऱ्याला देतो म्हणजेच रक्तदान (Blood donation). पण काय हो!रक्त, त्याचे गट, रक्तदान याच्या बद्दल आपल्याला प्रश्न पडतच नाहीत. कारण सगळ्यांनाच याची माहिती आहे. ही तर काय सगळी सोपी उत्तरे, पण या प्रश्नांचा प्रवास कसा सुरू झाला? एवढे सोपे वाटणारे उत्तर पहिल्यांदा कोणी शोधून काढलं असेल? तेव्हा ते सोपे असेल का? बापरे किती हे प्रश्न? पण उत्तरे कुठे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ह्या गोष्टीतून. 

गोष्ट सुरू होते मानवी रक्ताभिसरण संस्थे (Blood circulation) पासून. आपल्या शरीरात रक्त असते आणि ते शरीरभर फिरत असते. हा शोध तर आधीच लागला होता. पण तेव्हाही काही समस्या अशा होत्या की रक्त कमी पडून माणसे मृत्युमुखी पडत होती. त्यामुळे त्या बाबतीत प्रयोग करणं सुरू झालं. जसे पहिल्यांदा माणसाचं रक्त कुत्र्याला दिलं पण तो प्रयोग फसला. मग गंमत अशी झाली की दुसऱ्या प्रयोगात प्राण्याचे रक्त माणसाला दिले. ई…. ऐकायला कसेतरीच वाटते हो ना! हाही प्रयोग फसला. आता हे सगळं झाल्यानंतर तब्बल २०० वर्ष काहीच झालं नाही. मग त्याच्या नंतर पहिल्यांदाच माणसाचं रक्त माणसाला दिलं गेलं आणि काही अंशी हे प्रयोग यशस्वी झाले. पण काही मात्र अगदीच फसले. त्याचं असं झालं की काही माणसांचे रक्त दुसर्यांच्या अंगात अगदी स्वतः चेच रक्त मिसळावे तसे मिसळले पण काही माणसांच्या बाबतीत तर असे झाले की ती माणसे  दणकट होती पण त्यांना थोडसं रक्त बाहेरून दिल्यावर ती तडकाफडकी मेली. आता काय करायचं? परत सगळे घाबरले आणि अजून ५० वर्ष या प्रयोगांमध्ये काहीच प्रगती झाली नाही.

याच काळात एक अतिशय मेहनती व संशोधनाची प्रचंड आवड असणारा तरुण व्हिएन्ना विद्यापीठातून वैद्यकशास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडला. त्या तरुणाने शिकत असतानाच आहार व रक्त या विषयावर उत्कृष्ट संशोधन केले होते. तसेच रक्तावर संशोधन करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. अशा या कष्टाळू तरुणाचे नाव कार्ल लँडस्टायनर होते. पुढे डॉक्टर झाल्यावर पाच वर्ष ते रसायनशास्त्र शिकले. या रसायनशास्त्राची मदत घेऊन व पाठीमागच्या रक्तदानाच्या प्रयोगातील इतिहास जाणून घेता घेता. त्यांना एक विलक्षण प्रश्न पडला आणि हाच प्रश्न त्यांना पुढच्या अद्वितीय शोधाच्या कामी आला. प्रश्न असा होता की दोन माणसांचा रक्त मिसळल्यावर कधी कधी त्यात गुठळ्या का होतात? आता मात्र झालीच प्रयोगाला सुरुवात. त्यांनी रक्ताचे अनेक नमुने एकमेकांत मिसळून त्यांची सूक्ष्म निरीक्षण केली. त्याच्या शास्त्रशुद्ध नोंदी ठेवल्या आणि १९०१ साली अथक प्रयत्नानंतर मिळालं ना! उत्तर. हेच की सर्व माणसांचं रक्त सारखं नसतं. त्यामुळे भिन्न प्रकारचे रक्त एकत्र आलं की त्याच्या गुठळ्या बनतात.

डॉ. कार्ल लँडस्टायनर

त्याकाळी गंमत अशी होती की सगळ्या शास्त्रज्ञांचा असा ठाम समज होता की सगळ्या माणसाचं रक्त सारखंच असतं. त्यामुळे डॉ. कार्ल यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, पण डॉ. कार्ल थांबले नाहीत. त्यांनी पुढचा शोध चालूच ठेवला. ह्या नंतर त्यांनी रक्तातील वेगवेगळी रसायने (chemicals) शोधून काढली. त्यातूनच जन्म झाला ऐ, बी, ऐबी आणि ओ रक्त गटांचा.

या रक्तगटाच्या शोधा नंतरच सर्व शास्त्रज्ञांचं आणि लोकांचं या संशोधनाकडे लक्ष गेलं. हाच तो शोध होता. ज्याच्यामुळे पहिल्या महायुद्धात हजारो सैनिकांचे प्राण रक्तदानामुळे वाचले होते. रक्त गटांच्या या क्रांतिकारी शोधामुळे मानवजातीला जो फायदा झाला. त्याबद्दल 1930 सालचं नोबेल पारितोषिक देऊन डॉ. लँडस्टायनर यांना गौरवण्यात आलं.

एवढे मोठे पारितोषिक मिळवून सुद्धा डॉक्टर साहेब काही थांबले नाहीत. चिकाटीने आणि जिद्दीने त्यांनी पुढे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन उपगट शोधून काढले.

 प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे  या म्हणीला साजेसं काम डॉक्टर कार्ल यांनी करून दाखवलं. हीच ती आपली रक्तगटाच्या शोध मोहिमेची गोष्ट.

Categories
कथा-लघु कथा भावसंग्रह

मनात घर करणारी पाहुणी

कोण जातंय स्टेशनला? असं काहीसं वहिनी स्वयंपाक घरातून विचारत असतानाच.. मी घरात प्रवेश केला. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी गेले होते. सहज जवळच राहत असलेल्या चुलत दादा वहिनी कडे डोकावून, मुलांना आणलेले खेळ आणि खाऊ देऊन जावे असा विचार करून मी त्यांच्या घरी शिरले होते.

कोण येतयं ग वहिनी? असं मी विचारल तेव्हा वहिनी म्हणाली “अग ताई आत्या येणार आहे. खूप दिवसांनी येत आहेत त्या. वय झालं ना आता, म्हणून विचारत होते, तुझे दादा जाणार का? नाहीतर मीच जाऊन घेऊन आले असते त्यांना.”

आता ह्या ताई आत्या बरेचं वर्ष आमच्या घरी यायच्या. इतर नातेवाईकांकडे त्यांचं येणं जाणं होतं. आल्या की १५ दिवस वेगैरे राहायच्या, पण गंमत म्हणजे त्यांचं आणि आमचं नक्की नातं काय, हे कोणालाच नीटस माहीत नव्हतं.

एकदा आईला मी विचारलं होत की ह्या आपल्या नक्की कोण? तेव्हा आई म्हणाली मला नातं फारसं नीट माहीत नाही, पण आजीला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे. 

आजच्या युगात जिथे रक्ताच्या नात्यानंमध्ये सुद्धा एवढे सख्य आणि एवढा ओलावा नसतो, तिथे ज्यांच नातंच माहीत नाही, अश्या बाईसाठी एवढी लगबग! तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना! तसंच मलाही वाटलं आणि वहिनीला ते मी म्हणून दाखवले. त्यावर ती म्हणाली. “अगं ताई आत्या आल्या ना की कोणी मैत्रीण आल्यासारखचं वाटतं.” 

त्या माझ्या आजीच्या वयाच्या आहेत. वय वर्षे ८० तर सहज पार केलेल्या अश्या ह्या ताई आत्या. माझी आजी आता ह्या जगात नाही, पण तरीही ताई आत्याला नेहमी आग्रहाचं निमंत्रण असतं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे ताई आत्यांनी सगळ्यांबरोबर आपलसं अस वेगळं नातं निर्माण केलं होतं.

Someones behavior can make them closer than blood relations.

ताई आत्या अतिशय कष्टाळू पण खूप हौशी. त्यांची परिस्थिती तशी बेताची. नवरा लवकर गेला. गावी त्यांची थोडी जमीन होती आणि एक छोटेसे घर होते. एकुलता एक मुलगा होता. ताई आत्यानी कष्ट करून मुलाला शिकवलं, शेती केली आणि आपलं जीवन चालवले. ह्या सगळ्या मधून तिला जमेल तशी ती कोणाची तरी मदत करत असे. अश्याच एका शिबिरात तिची आणि माझ्या आजीची ओळख झाली. 

कुठले तरी नाते लागते हे कळल्यावर आजीने तिला घरी ४ दिवस राहायला बोलावले. ह्या नंतर ताई आत्या इतक्या घरातल्या झाल्या की तिची वर्षातून एक तरी चक्कर आमच्याकडे व्हायची. ताई आत्या कमालीची स्वाभिमानी सुद्धा; तिच्या कडे तिकिटाचे पैसे असतील तरच ती यायची. येताना सगळ्यांसाठी काहीतरी बनवून आणायची. 

आल्यानंतर सुद्धा ती स्वस्थ बसणाऱ्यातील नव्हती. गप्पा मारत ती काकूला देव घरात लागणारे वाती, वस्त्र वगैरे ची मदत करायची. बाबांना पापड आवडतात म्हणून ती आईला वेगवेगळ्या प्रकारचे पापड करून द्यायची. लहान मुलांना खूप रंगवून गोष्टी सांगायची. लहान बाळांसाठी उबदार sweater हातांनी विणून द्यायची. आजीला बागेची आवड होती, महणून ती आजीसाठी, एखादं नवीन रोप आणायची, किंवा खत आणायची. काहीही  करून ह्या घरच्यांना आपली मदत कशी होईल हे ती बघायची.

तिच्या तोंडून मी कोणाबद्दल कधी काही वाईट ऐकलं नाही. सर्वांशी मिळून मिसळून राहायची आणि सगळ्यांकडे तिच्याबद्दलची अशीच आठवण होती.

माझी आठवण म्हणजे, एकदा ती आली तेव्हा तिने सगळ्यांसाठी घवल्यांची खीर केली होती. ते घवले इतके बारीक आणि सुबक होते की मला ते खूप आवडले. मी तिला म्हणाले मला शिकावशील का? तिने लगेचच दुसऱ्या दिवशी मला शिकवायला घेतले आणि जाताना एक डब्बा भर घवले माझ्यासाठी बनवून गेली. दर वर्षी माझ्यासाठी ती घवले करुन आणायची.

अशी ही ताई आत्या, जिने आयुष्यात खूप पैसे कमावले नाहीत पण खूप नाती जोडली. आज वयाच्या ८० वर्षाला सुद्धा तिला अगत्याने घरी बोलवणारी आमच्यासारखी अजून बरीच घरे होती.

Categories
कथा-लघु कथा भावसंग्रह

दान देगा देवा …

आज १ जानेवारी होती. माझ्या दरवर्षीच्या नेमा प्रमाणे मी जवळच्या पण अतिशय नावाजलेल्या अश्या गणपतीच्या देवळात गेले. पोहचायला थोडा उशीर झाला आणि लक्षात आलं कि निम्म्या पुण्यानी माझ्या सारखाच चंग बांधला होता. बरं, १ जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस मग तर गर्दी बद्दल बोलायची सोयच नाही.

मी जवळच्या एका फुलवालीकडे चप्पल सोडली आणि दहा रुपयांची फुलं घेऊन रांगेत लागले. रांगेत वेगवेगळ्या प्रकारची लोकं उभी होती. एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलं होतं, तर त्यांच्याच पुढे दोन अतिशय कंटाळलेली पण निरागस अशी लहान मुलं घेऊन एक दाम्पत्य उभे होतं. थोड्या अंतरावर एक खाष्ट अशी दिसणारी आज्जी तिच्या उद्योगी नातवाला घेऊन बसली होती. तिने तिथल्या शिपायाला खुर्ची द्यायची ऑर्डर सोडली आणि कशी आजकालची पिढी वयस्करांना मान देत नाही ह्यावर भाष्य केल. काही युगुल प्रेमी देखील रांगेत उभे होते. एक तशी शांत पण डोळ्यात कसली तरी खंत घेऊन एक तरुण मुलगी उभी होती. तिच्या पुढचं जोडपं बहुदा कुठलातरी नवस फेडायला आलं असावं असा माझा अंदाज होता.

हे सगळे प्रकारचे लोक पाहत पाहत आमची रांग हळू हळू पुढे सरकत होती. लांबुन मला बाप्पाचे दर्शन झाले. मनो मनी मी बाप्पाला हात जोडले . तेवढ्यात डोक्यात एक विचार आला. मनातच मी म्हंटलं “ काय रे देवा तुझी व्यथा. दिवस रात्र लोकांचे दुःख आणि तक्रारी ऐकून तुला किती कंटाळा येत असेल! सगळे नुसते तू कस त्यांना काहीतरी दिलं नाहीस ह्यावरून तक्रार करणार किंवा मला हे मिळू दे अशी आशा करणार ” तोच माझ्या कानात एक आवाज ऐकू आला “हो ना, कधी कधी कंटाळा येतो खरा, पण शेवटी माझीच लेकरं आहेत ना हि, मग  समजून घेतो मी त्यांना.

What should we ask God? Strength or money? Material gifts or peace? A short story

मी तर उडालेच हे ऐकून. कोण बोललं? अस मी हळूच विचारले आणि कावर्या बावर्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागले. मागे उभे असलेल्या लोकांना मी ठार वेडी असल्याची खात्री पटली होती बहुदा, ते आपलं एक हाताचं अंतर ठेवून माझ्याकडे बघत होते. मला भास होतायत अस मी माझ्या मनाची समजूत काढून परत नीट उभी राहिले, तोच परत तोच आवाज “ अगं मला वाटलं नव्हतं तू इतकी चकित होशील असं ! माझ्याबद्दल अशी काळजी इथे फारस कोणी व्यक्त करत नाही म्हणून पटकन तोंडून आले. आता तुझ्या लक्ष्यात आलंच असेल मी कोण आहे ते.

“कसं आहे, इथे काही लोक माझ्यावर टीका करायला येतात, तर काही लोक दुकानात गेल्या सारखे वागतात. माझं हे काम कर मी तुला सोन्याचा मुकुट देईन. म्हणजे त्यांच्या मनासारखे झाले तर मला सोन्याने मढवतील आणि नाही झाले तर माझे असणे हि नाकारतील. अश्या लोकांच्या गर्दी मध्येच असे लोकही येतात जे आव्हानांना घाबरून न्हवे तर त्यांना सामोरे जाण्याचे बळ मागायला आले असतात. काही लोक त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या क्षणांसाठी आभार व्यक्त करायला आले असतात. काही असे असतात कि जे जीवनातील आव्हाने पेलता पेलता थकून व हताश होऊन गेलेले असतात. त्यांना माझ्या कुशीत काही क्षण विसावा हवा असतो. पुन्हा जोमाने काम करण्यासाठी उमेद हवी असते आणि मनशांती हवी असते. माझ्या अश्या लाडक्या भक्तांना मी कसा सोडू?

तू पण नव्या वर्षात माझी कृपा तुझ्या कुटुंबावर अशीच राहू दे हे मागायला आली आहेस ना? डोळ्यात पाणी तरळत होत आणि तोंडून आपसूक निघालं ‘ गणपती बाप्पा मोरया’.