Categories
Uncategorized प्रवास

सिंगापुर अथवा सिंगापुरा – द लायन सिटी

शाळेला सुट्टी पडली कि मुलांना लागतात vacation ला जायचे वेध. हल्ली पूर्वी सारखं मामाच्या गावाला जाऊन भागत नाही,तर हट्ट असतो कुठेतरी नवीन आणि इंटरेस्टिंग जागी जाण्याचा. त्यात नेमका कुठलातरी मित्र किंवा मैत्रीण ऍब्रॉड जाऊन आले असतात आणि मग सुरु होते आपण या वर्षी कुठे जायचं याचं प्लँनिंग. भरपूर टूर्सच्या जाहिराती आणि भारत/भारताबाहेरचे विविध ऑपशन्स बघून अखेरीस सिंगापुर हे ठिकाण नक्की केलं.

कोणत्याही वयोगटाच्या लोकांना आवडेल असं सिंगापूर. टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे भरपूर ऑपशन्स मिळतात. काही बजेट मध्ये असतात पण आवडत नाहीत तर काही बजेटच्या बाहेर. अश्यावेळी मी स्वतः ट्रिप प्लॅन करायचं ठरवलं. तिथे जाऊन आलेले मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून माहिती गोळा केली आणि फॉर एव्हरीथिंग एल्स, google आहेच आपलं.

सिंगापुर हा आधुनिक आणि पर्यटकांना अनुकूल असा देश आहे. इथल्या पर्यटन स्थळांची माहिती जागोजागीचे  नकाशे आणि  माहिती पुस्तिकाद्वारे पर्यटकांसाठी उपलब्ध असते. इंग्रजी भाषेचा जास्त वापर आणि उत्तम वाहतूक व्यवस्था असल्यामुळे पर्यटकांची चांगली सोय होते. भारतीयांची लोकसंख्या खूप प्रमाणात आहे(तामिळ ही सिंगापुरची चार अधिकृत भाषांपैकी एक), यामुळे इंडियन आणि खासकरून शाकाहारी  जेवणाचे भरपूर उपहारगृह आहेत.

चला तर बघूया सिंगापुरमध्ये काय करावे, कुठे राहावे, कसे फिरावे?

युनिव्हर्सल स्टुडिओज 

लहान मुलांना आणि युनिव्हर्सल स्टुडिओजच्या चित्रपटांच्या चाहत्यांना आवडेल असं ठिकाण. ट्रान्सफॉर्मर्स, इजिप्शन मम्मी, जुर्रासीक पार्क, श्रेक, मदगास्कर इत्यादी अश्या विविध राइड्स आहेत. ४डी शोज, परेड्स, थीम रेस्टॉरंट्स आणि टॉय शॉप्स यांनी परिपूर्ण असं हे ठिकाण फिरायला किमान एक दिवस लागतो.

सेंटोसा आयलँड

हे स्थळ खासकरून पर्यटनासाठी विकसित केलेले आहे. सिंगापुर मधील सर्वात मोठा मरलायनचा पुतळा इथेच आहे. सुप्रसिद्ध एस. इ. ए मत्स्यालय आणि म्युसियम, विविध आकर्षणं, राइड्स, कॅसिनो, रेस्टॉरंट्स आणि बीचेस इथे आहेत. विंग्स ऑफ टाइम नामक लेजर शो दर सायंकाळी इथे आयोजित केला जातो.

सिंगापुर प्राणीसंग्रहालय, रिव्हर आणि नाईट सफारी व जुरॉन्ग बर्ड पार्क

सिंगापुरचे प्राणीसंग्रहालय जगात सर्वोत्तम असल्याचे म्हणतात व खुले प्राणिसंग्रहालय हा अनोखी संकल्पना इथे आपल्याला अनुभवायला मिळतो. विविध प्रकारचे प्राणी, सरीसृप, कीटक इथे पाहायला मिळतात. सिलायन, बर्ड आणि एलिफंट शो इथे होतात. रिव्हर आणि नाईट सफारी पण एकाच परिसरात आहे आणि हे तिन्ही पार्क एका दिवसात फिरून होतात. जुरॉन्ग बर्ड पार्क हे इथून लांब असल्यामुळे इथे जायला वेगळा दिवस लागतो. साधारण ४-५ तासात हे पार्क बघून होतं.

मरिना बे, गार्डन्स बाय द बे, सिंगापुर फ्लायर, बोटॅनिकल गार्डन्स इत्यादी पर्यटक ठिकाणं मुख्य शहरात आहेत आणि एक दिवसात बघून होतील. साधारणपाने सिंगापुर फिरण्याकरता ४-५ दिवस पुरेसे आहेत.

अंतर्गत प्रवास, फूड आणि शॉपिंग

सिंगापुर मध्ये अंतर्गत प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सर्वात उत्तम पर्याय आहे. इझी लिंक टुरिस्ट पास द्वारे बसेस व ट्रेन्स मध्ये प्रवास करणे अगदी सोपे आहे. जर आपण शाकाहारी असाल तर लिटिल इंडिया, फेरेर पार्क परिसरात राहण्याचे हॉटेल निवडा. इथे भारतीय रेस्टॉरंट्स जास्त असल्यामुळे जेवणाचे बरेच पर्याय मिळतील. मांसाहारी लोकांनी इथले लोकल स्ट्रीट फूड व हॉकर  स्ट्रीट्सना नक्की भेट द्यावी. इथले सिंगापुर चिली क्रॅब खूप प्रसिद्ध आहे.

शॉपिंग साठी ऑर्चर्ड रोड, बुगीज, चायना टाऊन  येथे हाय एन्ड ब्रॅण्ड्स पासून सोवेनियर्स पर्यंत सर्व मिळतं.

ट्रॅव्हल टीप:
  • एस. इ. ए मत्स्यालय, युनिव्हर्सल स्टुडिओज, प्राणीसंग्रहालय, रिव्हर आणि नाईट सफारी व जुरॉन्ग बर्ड पार्क इत्यादींच्या कॉम्बो तिकिट ऑफर्स उपलब्ध असतात व त्यांची व्हॅलिडिटी सात दिवसांची असते. हे तिकिट स्वतंत्र तिकिटांपेक्षा  स्वस्त असतात त्याच बरोबर पर्यटकांना काही फ्री कुपनही  दिली जातात.
  • युनिव्हर्सल स्टुडिओज सेंटोसा मध्येच असल्यामुळे तिथे जाण्यास एकच मार्ग आहे. MRTचा (ट्रेन) वापर करणार्यांनी हार्बर सिटी स्टेशन वर उतरून विवो सिटी मॉल कडे जावे. तिथून सेंटोसा साठी खास ट्रेन आहे. सेंटोसा ब्रॉडवॉक वरून चालतही  जाता येतं.
  • युनिव्हर्सल स्टुडिओज मध्ये प्रत्येक राईड साठी वेटिंग असते, त्यामुळे लवकर जाऊन कोणत्या राइड्स आपल्याला नक्की करायच्या आहेत हे ठरवून त्या आधी करणे सोयीस्कर. फास्ट ट्रॅक पास पण उपलब्ध असतो.
  • सिंगापूर उष्ण देश असल्याने फिरताना कॉटनचे कपडे, आरामदायक शूज, गॉगल,सन्स्क्रीन लोशन, हॅट, पाण्याची बाटली इत्यादी आपल्या जवळ ठेवा.
  • अंतर्गत प्रवासासाठी लागणार इझी लिंक कार्ड आणि मोबाईल कॉलिंग कार्ड एअरपोर्ट वर उपलब्ध असतात.
  • विदेशी करन्सी भारतात एक्सचेंज करावी.

हैप्पी ट्रॅव्हलिंग!

मरलायन
Categories
प्रवास

Test-travel