Categories
आरोग्य पाककृती प्रवास

मैसूर पाक, मैसूर डोसा, मैसूर इडली?

नोव्हेंबर २०१९ मध्ये फिरायला मैसूर ला गेलो होतो. फिरायला जाणं आणि तिथे मिळणार काहीतरी खास घेऊन येणे हे तर आलंच. त्यामुळे आपोआपच पावलं मिठाईच्या दुकानात कडे वळली, ती म्हैसूर पाक घ्यायला. त्यासाठी ड्रायव्हर काकांनी प्रसिद्ध गुरु स्वीट्स कडे गाडी घेतली व हे पण संगीतले की मैसूर पाक पहिल्यांदा बनवणारे आचारी दुसरे तिसरे कोणी नसून ह्या गुरू स्वीटस च्या मालकाचे पणजोबा होते. त्यानंतर  मैसुरपाक पहिल्यांदा कसा बनला त्याची गोष्ट सुद्धा सांगितली. त्याचं झालं असं की वडियार राजा ४ यांनी त्यांच्या आचाऱ्यास काका सुरा मडप्पा हे त्याचं नाव. त्यांना नवीन वेगळा गोड पदार्थ बनवण्यास सांगितला. मग काका सुरा ह्यांनी सहज म्हणून डाळीचे पीठ घेतले. त्याच्यात भरपूर तूप व साखर घालून एक पदार्थ बनवला. राजा वडियार यांना तो पदार्थ फारच आवडला. पदार्थ गोड म्हणून पाक व मैसूर मध्ये बनला म्हणून मैसूर पाक. ही गोष्ट ऐकून आम्हालाही राजा सारखीच लहर आली काहीतरी authentic खायची. त्यामुळे वृंदावन मधल्या रॉयल ऑर्किड ह्या हॉटेल मधल्या शेफ मंजुनाथ ह्यांची लगेच भेट घेतली आणि त्यांना विचारलं की मैसूर मधील special असं काही खायला मिळेल का?

उजवी कडे उभे शेफ मंजुनाथ व त्यांची टीम
उजवी कडे उभे शेफ मंजुनाथ व त्यांची टीम

त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर गरमागरम वाफाळलेली इडली व सांबार अहं.. इडली व त्याच्या बरोबर आगळीवेगळी उसळ समोर आली. त्याच उसळ इडलीची रेसिपी सांगत आहे.

या पाककृती तील इडली तर सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच त्याची कृती न सांगता सरळ त्यातील उसळ कशी बनवायची ते बघू.

मैसूर इडली साठी लागणारे समान :-

 1. तेल- ३ चमचे
 2. चिरलेला कांदा- १
 3. टोमॅटो – १
 4. आलं,लसून पेस्ट – १चमचा
 5. श्रावण घेवढ्याच्या ओल्या बिया – १५०ग्राम
 6. उकडलेला बटाटा – छोटे २
 7. मोहरी – १चमचा
 8. कडीपत्ता – ५ ते ६ पानं
 9. हळद – १/२ चमचा

वाटणं करण्यासाठी लागणारे साहित्य :-

खोवलेला नारळ – १ वाटी 

जिरं – १चमचा

कांदा, टोमॅटो – प्रत्येकी १

वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यावे व बाजूला ठेवावे.

मैसूर इडली कृती :-

 1. गरम तेलात मोहरी, कढीपत्ता व आलं-लसणाची पेस्ट घालावी.
 2. नंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो घाला व छान परतून घ्या. नंतर लगेचच घेवड्याच्या बिया व एक कप पाणी घालून 20 मिनिटे शिजवून घ्यावे.
 3. त्यानंतर वरील तयार वाटणं, मीठ (चवीनुसार) व उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून झाकण ठेवून एकदा वाफ काढावी.
 4. पातळ हवे असल्यास लागेल तसे पाणी घालावे.

तर अशी ह्याची शेफ मंजुनाथ ह्यांनी लिहून दिलेली कृती. म्हैसूर मधील स्पेशल गोष्टींमध्ये मैसुरपाक, म्हैसूर डोसा हे जसं आपण ऐकलं आहे. त्याचप्रमाणे या इडलीला आता आपण म्हैसूर इडली असं म्हणूयात का?

म्हैसूर इडली - उसळ इडलीची रेसिपी सांगत आहे.
इडली बरोबर ची उसळ

Food for thought :-

वरील बनवायचा कृती नंतर या पदार्थाची शरीरावर होणारी कृती बघुयात.

 1. उसळ खा आणि कृती थेट हाडांवर बघा. म्हणजेच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम व फॉस्फरस घेवड्याच्या बियांमधून मिळतं.
 2. इडलीची महती तर सर्वांना माहीतच आहे. उडीद डाळ व तांदूळ मसल्स वाढवण्याचा हा योग्य उपाय. शिवाय कार्बोहाइड्रेट, मिनरल्स, विटामिन हे तर आलंच. शिवाय oil free.

एवढं सगळं ह्याच्यातून मिळतंय म्हणजे तुमच्या लक्षात येतं का? हे तर असं झालं की एक डिश बनवा व संपूर्ण पोषक मूल्य मिळवा.

जाता जाता एक भन्नाट डायट टीप तुम्हाला देऊन जाते.

 • इडली साठी तांदूळ व उडीद डाळ भिजत घालताना त्याच्यामध्ये सात ते आठ मेथीचे दाणे घालावेत. त्यामुळे चव सुद्धा चांगली येते शिवाय फायदे तर इतके की आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असे होते. तर मेथ्यानं चे फायदे असे की यामुळे पचनाला मदत होते, भरपूर प्रमाणात फायबर, शरीरातील वात कमी करतो, अतिसार (diarrhoea) कमी होतो, खोकल्यासाठी गुणकारी, रक्तातील साखर कायम ठेवण्यास मदत होते, शिवाय रक्तातील cholesterol level कमी करण्यास सुद्धा मेथ्या मदत करतात.
Categories
प्रवास

पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे

पुणे हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. याची तुलना दिल्लीच्या ऐतिहासिक वास्तूंशी करता येत नसली तरी पुण्याला एक विशेष स्थान आहे.

चला पुण्यातील काही अतिशय महत्वाची ऐतिहासिक ठिकाणे आणि त्यामागील कथा जाणून घेऊया.

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे - पुणे lal mahal

लाल महाल

पुण्यातील हे पहिले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. लाल महाल इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले. जिजामाता (त्याची आई) आणि दादोजी कोंडदेव यांच्याबरोबर तारुण्यातील शिवाजी महाराज इथे राहत आणि प्रशिक्षण घेत असे. मूळ महाल शहाजी महाराज (शिवबांचे वडील) यांनी शिवाजी आणि जिजाबाईन साठी बांधला होता, पण तो राजवाडा काळाच्या ओघाने कोसळला. सध्याचा लाल महाल प्रतीकात्मक असून तो पीएमसीने बांधला आहे. शिवाजी महाराजांनी जिथे शाईस्ताखानाची बोटे कापली ती जागा म्हणजे लाल महाल. शिवाजी महाराजांच्या काळातील चित्रे आणि प्रतिकृती असलेल्या मिनी संग्रहालयात आज लाल महालचे रुपांतर झाले आहे.

शनिवारवाडा

पेशव्यांच्या काळात शनिवारवाडा बांधला गेला आणि त्याला महत्त्व प्राप्त झाले. लाल महालाच्या जवळच असलेले, शनिवारवाडा हे सत्तेचे स्थान होते आणि येथे बरेच महत्वाचे निर्णय घेण्यातआले होते. सत्तेच्या हव्यासासाठी काका व काकूंनी ठार मारलेल्या तरुण नारायणराव पेशवे ह्यांच्या भुताने पछाडल्याची ख्याती शनिवारवाड्याला आहे. आज जरी तो वाडा मोडलेल्या अवस्थेत असला तरी तिथे एक ‘साऊंड अँड लाईट शो’ असतो जो बघण्या सारखा आहे . 

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे - पुणे shanivarwada

केसरीवाडा

केसरीवाडा हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला महत्वाचा भाग आहे. लोकमान्य बालगंगाधर टिळक यांचे ते निवासस्थान होते. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्त्वाचे उपक्रम येथे घडले. टिळकांनी इथं मराठीत केसरी आणि इंग्रजीत मराठा ही वर्तमानपत्रं सुरू केली. वाड्यात वर्तमानपत्र कार्यालय ठेवले. स्वराज्य आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी बरीच चर्चा येथे झाली. सार्वजनीक गणेश उत्सवाची कल्पना व अंमलबजावणीही केसरीवाड्याने पाहिली. केसरीवाड्यात आज वृत्तपत्र केसरी चे कार्यालय, लेखन डेस्क आणि टिळकांचे मूळ पत्रे याविषयी म्युरल्स आहेत. वाड्यात मॅडम कामाने फडकावलेला पहिला भारतीय राष्ट्रीय ध्वज देखील बघायला मिळतो. 

आगा खान पॅलेस

१८९२ मध्ये आगा खान पॅलेस सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा याने बांधला होता. आजूबाजूच्या गावांतील दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी हा महाल बनवला. ह्यामुळे तब्बल १००० लोकांना रोजगार मिळाला. भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तूरबा गांधी आणि त्यांचे सचिव महादेव देसाई यांना येथे नजरकैदेत ठेवण्यात आले तेव्हा राजवाड्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली.

महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधी दोघांचा याच काळात मृत्यू झाला आणि त्यांची समाधी इथे आहे. आगा खान पॅलेस मध्ये एक छोटेसे संग्रहालय देखील आहे, ज्यात त्या काळातील  काही फर्निचर, पत्रे, छायाचित्रे आणि गांधींनी निवास करत असताना वापरल्या गेलेल्या काही घरगुती वस्तूंचा ही समावेश आहे.

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे- Aga khan palace पुणे

फर्ग्युसन महाविद्यालयाची खोली क्रमांक 17

मुलांच्या वसतिगृहाच्या ब्लॉक १ मधील फर्ग्युसन महाविद्यालयाची खोली क्रमांक १७ बाहेरून इतर खोल्यांच्या भागासारखी दिसते, तथापि वरच्या बाजूस एक लहान संगमरवरी फलक लोकांना माहिती देतो की १९०२ -०५ दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या खोलीत राहत होते. अंदमानमधील तुरुंगवासा बद्दल अनेकांना माहिती आहे पण पुण्यात असतानाच त्यांची राष्ट्रवादाची कल्पना मजबूत झाली हे माहित नाही. ते युवा नेते होते आणि त्यांनी अभिनव भारत सोसायटी सुरू केली. त्याची आठवण खोलीत आहे. स्वातंत्रवीर विनायक सावरकरांचा अर्धपुतळा ( दिवाळे )असून त्यांच्या जन्म व मृत्यू वर्धापन दिनानिमित्त ही जागा सार्वजनिक आहे.

सिंहगड किल्ला

या किल्ल्याचे नाव यापूर्वी कोंढाणा असे होते. शिवाजी महाराजांचा  शूर सेनापती तान्हाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकला, पण लढताना आपले प्राण गमवले. ह्या प्रसंगी शिवाजी महाराज प्रसिद्धपणे म्हणाले, “गड आला पण सिंह गेला” नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले गेले.

ह्या कहाणीला आता भारतभर प्रचीती लाभली ते म्हणजे ‘तान्हाजी ‘ ह्या चित्रपटामुळे. आज सिंहगडावर नरवीर तान्हाजी मालुसरे ह्यांची समाधी आहे आणि गडाविषयी माहिती व इतिहास सांगणारे छोटेसे माहिती केंद्र सुद्धा आहे.

 पुण्यातील ७ ऐतिहासिक स्थळे - sinhagad पुणे

कसबा गणपती

कसबा गणपती मंदिर जिजामाता (शिवरायांची आई) यांनी बांधायचा आदेश दिला असे मानले जाते. कथा अशी आहे की जेव्हा जिजाबाई, छोट्या शिवाजीसमवेत पुण्याला आल्या आणि पुण्याचे प्रशासक दादोजी कोंडदेव यांना शहराची पुनर्बांधणी करायला सांगितली तेव्हा काम चालू असताना एक गणेश मूर्ती सापडली. त्यांनी ह्याला एक शुभ संकेत समजून तिथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. तेव्हापासून कसबा गणपती ला पुण्याचा ग्राम देवता ही मानले जाऊ लागले . 

जर आपण पुण्यात असाल तर आपल्या मुलांना या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी नेण्यास विसरू नका. पुस्तकात वाचण्यापेक्षा अश्या ऐतिहासीक ठिकाणी जाऊन तिथली माहिती मिळवणे मनाला  जास्त भावणारे आहे नाही का ? 


Categories
प्रवास

कच्छच्या रण ला भेट देताना लक्षात ठेवायच्या 10 महत्वाच्या गोष्टी

म्हणता म्हणता २०१९ सरेल आता! २०२० हाक देऊ लागलं आहे. आता डिसेंबर म्हटलं की नाताळ ची सुट्टी आली. नवीन वर्ष कुठे साजरे करूया असा प्रश्न आला, नाही का? तुमचं नवीन वर्ष कुठे साजरे करायचे ठरले का? नसेल ठरले तर ह्या वर्षी रण ऑफ कच्छ चा विचार करा. 

कच्छ चा रण म्हंटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती अमिताभ बच्चन ची उंच प्रतिमा, त्याच्या गहिऱ्या आवाजात “ रण नही देखा तोह कुछ नही देखा” असं निमंत्रण करत असलेली छवी आणि मागे दूरवर पसरलेला पांढरा वाळवंट! तसा वर्षभर कठोर अश्या हवामान आणि तुरळक लोकसंख्या असलेला कच्छ नोव्हेंबर ते जानेवारी च्या दरम्यान रंगांनी, लोककलेनी नटतो – रण उत्सव च्या माध्यमातून. खरंच डोळे दिपून टाकणारे आहे रण उत्सव.

Rann of Kutch in marathi

कच्छच्या रण ला भेट देताना लक्षात ठेवायच्या 10 महत्वाच्या गोष्टी
Photo Credit – Nikhil Tambe

आम्ही 2012 च्या डिसेंबर महिन्यात रण उत्सव ला गेलो होतो. तेव्हा कच्छ रण उत्सव पंधराच दिवसांचा असायचा. तिकिटे मिळणे ही अवघड होते. पण तिथे पोहोचल्या नंतर जाणवल की हा रण उत्सव साकार करण्या साठी खूप लोकांची शक्ती आणि जिद्द लागत असेल! आता एकतर हा उत्सव दोन महिने चालतो, त्या मुळे बुकिंग सहज मिळते. दुसरे कारण म्हणजे तिथे आता काही रिसॉर्ट ही आले आहेत. ज्यामुळे वर्षभर कच्छचा रण ला पर्यटकांची येजा असते.

कच्छचा रण हे जगातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट आहे. खरं तर हा एक नैसर्गिक चमत्कारच म्हणा ना! त्याची खरी सुंदरता पौर्णिमेच्या रात्री उजळून येते. स्वच्छ आकाशात सुंदर पूर्ण चंद्र त्याची चंदेरी किरणे पसरतो आणि त्या किरणांनी कच्छच्या रण मधील मिठाचे वाळवंट लखलखते.

कच्छच्या रण च्या ट्रीप साठीची महत्वाची माहिती 

१. जरी  कच्छ ला वर्षभर जाता येत असले तरी तिथली  खरी मजा रण उत्सव मधेच आहे . रण उत्सव साठी मिठाच्या वाळवंटा जवळ, धोरडो ह्या जागेत एक मोठी टेन्ट सिटी बांधलली जाते. सगळ्या सुख सुविधांनी सज्ज अशी हि टेन्ट सिटी, इथे राहण्याची उत्तम सोय होऊ शकते . 

२. टेन्ट सिटी मध्ये वेग वेगळ्या प्रकारचे टेन्ट असतात . Non A/C Tent, A/C Tent, Premium Tent असे त्याचे प्रकार आहेत.

tent city in Kutch- marathi blog
photo Credit – Nikhil Tambe

3. टेन्ट मध्ये राहणे पसंद नसल्यास तिथे काही रिसॉर्ट आहेत ज्याच्या मध्ये कच्छ मधील पारंपरिक घरे म्हणजे ‘भुंगा’ ह्या मध्ये राहण्याची सोय करतात. कच्छी भुंगा म्हणजे गोल मातीची घरे. 

4. रण उत्सव हे गुजरात पर्यटन द्वारा आयोजित केले जाते. ह्याचे बुकिंग तुम्ही online किंवा ठराविक agent कडून करता येते. गुजरात पर्यटन कडून भुज पासून धोरडो ला जाण्याची सोय केली जाते. भूज पर्यंत येण्याची आपण आपली सोय केली पाहिजे.

5. आम्ही पुणे – अहमदाबाद विमान आणि मग अहमदाबाद – भूज बस असा प्रवास केला होता. मुंबई हुन थेट भूज पर्यंत ट्रेन ची सोय आहे. 

6. भूज पासून धोरडो ला पोहोचायला जवळ जवळ दोन तास लागतात. धोरडो ला पोहोचल्या नंतर तुम्हाला तुमचा टेन्ट दिला जातो आणि मग तुम्ही टेन्ट सिटी मध्ये फिरायला मोकळे असता. तिथे जेवणाचे मोठे A/C दालने आहेत, जिथे सगळ्या वेळेचे जेवण, नाश्ता आणि चहा इत्यादी ची सोय केली जाते.

7. टेन्ट सिटी मध्ये लोक कला, संगीत, शॉपिंग अश्या अनेक करमणुकीची साधने असतात. आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे ह्या सगळ्या बरोबरच ढोलावीरा, ह्या हरप्पन काळातील स्थळाचे exhibition होते. त्याच बरोबर एके रात्री नक्षत्र माहिती ( स्टार पार्टी) चे आयोजन ही केले होते. 

8. टेन्ट सिटी ही कच्छी कला नी नटलेली असते. तेथील भिंतींवर सुद्धा आरश्या च्या तुकड्यांनी तयार केलेले सुबक असे चित्र आणि म्युरल्स पहिला मिळतात. ते सोडून धोराडो जवळील कलाग्राम मध्ये कच्छी भरतकाम, चित्रकला आणि विविध हस्तकला चे नमुने पाहायला आणि विकत घ्यायला मिळतात. अहो, तिथे उंटाच्या चामड्या नी तयार केलेल्या मोजडी वर सुद्धा रंगीत भरतकाम केले होते !

Embroidery and art work in Kutch village

9. टेन्ट सिटी च्या जवळ पास असलेली प्रेक्षणीय स्थळे  म्हणजे – काला डुंगर, मांढवी नदी, विजय विलास महाल. कच्छ मध्ये दिवसा गरम आणि रात्री खूप थंडी असे हवामान असते, म्हणून त्या प्रकारे कपडे न्यावेत. 

10. मिठाचा वाळवंट बघायला तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास किंवा सूर्योदय च्या सुमारास जा. अतिशय सुंदर आणि रमणीय असे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे तुम्ही बस, jeep , अथवा पारंपरिक प्रकारे सजवलेल्या उंटांवर बसून जाऊ शकता.

तुम्ही कच्छ च्या रण ला भेट दिली आहे का? कसा होता तुमचा अनुभव? तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर जरूर comments मध्ये कळवा. मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.

Categories
काही आठवणीतले प्रवास

सुधा कार्स म्यूझिअम

सुधा कार्स म्युझियम हे भारतातील हैद्राबाद येथे असणारे एक special ऑटोमोबाइल संग्रहालय आहे . संग्रहालयामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आकाराच्या cars कनिबॉयना सुधाकर (के. सुधाकर किंवा के. सुधाकर यादव) यांनी बनवल्या आहेत. गंमत म्हणजे त्यांनी आपले शालेय दिवसांत त्यांचा छंद म्हणून गाड्या बनवण्यास सुरुवात केली आणि 2010 मध्ये हे संग्रहालय उघडले. नावातच त्यांच्या cars बद्दलचे प्रेम दिसून येते.

संग्रहालयात जगातील सर्वात लहान दुहेरी डेकर बस आहे जी 10 लोकांना सामावून घेण्यास सक्षम आहे. लहान आकाराचे 12 वेगवेगल्या मोटर सायकली आहेत. ज्यात सर्वात कमी 33 सेंटिमीटर (13 इंच) उंचीचे आहेत आणि 30 किलोमीटर प्रति तास (19 मील प्रति तास) वेगाने चालविले जाऊ शकतात.

वेगवेगळ्या आकाराच्या गाड्या जसे lipstick, purse, high heel shoe, पतंगाची रेल्वे, लाडू, सॉफासेट, पलंग, पेन, पेन्सिल, eraser, कंडोम, खंजीरआणि खूप काही.. या सगळ्या कार बरोबरच इथे काही unique models पण ठेवलेली आहेत. त्यातलेच एक म्हणजे foldable motorcycle जी मुख्यत्वे paratroopers सैनिकांसाठी १ल्या आणि 2ऱ्या महायुदधात वापरली गेली होती. ही बाईक 1 फुटापेक्षा कमी उंचीची 30 kmph ने चालवता येत असे आणि फोल्ड करून इतर ठिकाणी नेता येत असे. तिथे काही old vintage cars पण ठेवलेल्या आहेत ex.Old Rolls Royce, Ford, Ambassador models. गम्मत म्हणजे तिथे जुने Advertising Posters लावलेले होते ज्यात गाड्यांबद्दल माहिती दिलेली होती. त्या काळच्या जाहिराती!!👌यावरून पूर्वी गाड्यांची निर्मिती आणि विक्री कशी व्हायची याची झलक बघायला मिळाली. इथे काही Multiseater Cyclesचे मॉडेल्स बघितले जे इतर देशांमध्ये वापरले जातात.

मोटारींच्या उत्पादनासाठी बरेच खर्च होतात पण या गाड्या विक्रीसाठी नाहीत. गाड्या वर्षातून एक दोनदा रोड शोसाठी संग्रहालयातून बाहेर काढल्या जातात जेथे लोक त्यांना चालवताना पाहू शकतात .तसे फोटो सुद्धा तिथे लावले आहेत. जगावेगळे काही करण्याच्या ध्यासात, K Sudhakar यांच्यासारख्या अवलीयांंनी निर्माण केलेल्या या गाड्या आणि हे आगळेवेगळे संग्रहालय …आवर्जून भेट द्यावे असेच आहे…यातूनच पुढे आविष्कार निर्माण होतात हे मात्र नक्की!!

यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही हैैैद्राबादला गेलो तेव्हा या अनोख्या संग्रहालयाला भेटण्याचा योग आला. सोहम बरोबरच आम्हीही खूप एन्जॉय केले. सालारजंग museum आणि इतर प्रेक्षणीय स्थळांबरोबरच आवर्जून बघावे असे एक आगळे वेगळे Wacky Car Museum of hand made cars!! ज्याची Guiness book of records ने नोंद केली आहे ते अगदी जरूर बघावे👌

सुज्ञा

Categories
प्रवास

अंदमान पर्यटन साठी महत्वाची माहिती

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी अंदमान सहल आणि तिथे मी अनुभवलेले Underwater sea walk ह्या संबंधित एक पोस्ट लिहिली होती. त्या नंतर मला काही वाचकांनी प्रश्न विचारले, की तिथे कसे जावे? कधी जावे? इत्यादी. मग विचार केला, आम्ही आखलेली सहल आणि काही टिप्स असा एक वेगळाच पोस्ट लिहावा म्हणजे ह्या पुढे सुद्धा जर कोणाला असे प्रश्न असतील तर त्याची उत्तरे त्यांना सहज मिळू शकतील. 

तर थोडी माहिती अंदमान निकोबार विषयी : 

अंदमान निकोबार हा जवळ जवळ ६०० द्वीपांचा समूह आहे.  पण गंम्मत अशी की त्यातील फक्त 36 बेटांवर मनुष्य वस्ती आहे. बाकी सगळे निर्जन पण निसर्गाने नटलेले असे आहे.

अंदमान निकोबारमधली सर्व ३६ बेटं ही प्रवाश्यांसाठी खुली नाहीत. इथे काही अश्या जमाती राहतात ज्यांना बाहेरच्या जगाशी संबंध ठेवायला आवडत नाही. काही अगदी लुप्त होऊ आलेल्या जमाती हि आहेत. त्या मुळे इथे सहसा परमिट शिवाय कोणालाच प्रवेश नाही. त्यात सुद्धा research संबंधित लोकांनाच परमिट्स मिळतात.

cellular_jail_andaman
cellular jail – Andaman

अंदमान पर्यटना संबंधी महत्वाची माहिती

अंदमानला जाण्यासाठी चेन्नई हुन थेट विमान आहे. आम्ही मुंबई – चेन्नई आणि मग चेन्नई- पोर्टब्लेअर असा 1  स्टॉप प्रवास केला होता. सगळ्या मोठ्या शहरातून चेन्नई ला काँनेकटिंग विमाने आहेत, म्हणून डायरेक्ट बुकिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही.

हे द्वीप समूह बे ऑफ बंगाल मध्ये असल्या कारणाने इथे लौकर सकाळ होते, तसेच सूर्यास्त हि लौकर होतो. सायंकाळी पाच च्या पुढे अंधार व्हायला सुरुवात होते.

इथे बंगाली भाषा जास्त प्रचलित आहे. त्याच बरोबर इंग्लिश, हिंदी या भाषादेखील इथे लोकांना समजतात म्हणून भाषेची विशेष अडचण येत नाही.

आमच्या सहलीत आम्ही – पोर्ट ब्लेअर, रॉस आयलँड, नील आयलँड, हॅवलॉक अशी ठिकाणे केली. हे सोडून चिडिया टापू, भारतांग आणि रंगत बेट प्रवाश्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

पोर्ट ब्लेअरवर आवर्जून जाण्याचे ठिकाण म्हणजे Cellular Jail . इथे नेहमीच गर्दी असते, म्हणून आधी तिकीट काढून ठेवा. Cellular Jail संध्याकाळी बघायला जा कारण तिथला sound and light शो! ते आणि अमर ज्योती, स्मारक हे पाहण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य!

रॉस आयलंड वर कोण्या काळी ब्रिटिशांचे वास्तव्य असलेली कॉलनी चे अवशेष आहेत. ते सध्या navy च्या देखरेखीत आहे. इथे बरेच वन्य जीव आहेत जसे की ससा, हरीण, मोर. त्यांचा मुक्त वावर तिथे बघायला मिळतो.

सगळ्या बेटांवर जाण्यासाठी लहान मोठ्या प्रकारची फेरी घ्यावी लागतात. त्यामुळे जर कोणाला समुद्र प्रवास किंवा बोटीचा त्रास होत असेल तर आवश्यक ती औषधे जवळ ठेवावी.

इथे सगळ्या बेटांवर चांगले रिसॉर्ट आहेत, पण सगळं लिमिटेड असतं, म्हणून आधी पासून बुकिंग करून जाणे उत्तम.

जर एखादे ठिकाण बघून लगेच परत येण्याचा विचार असेल तर फेरी चे तिकीट काढताना शेवटची फेरी ची वेळ आणि हवामानाचा अंदाज घ्यायला विसरू नका.

20 rupees च्या नोटांवर दिसणारा lighthouse!

सहसा ऑक्टोबर नंतर अंदमान ला जाणे योग्य. जानेवारी – मे हे अंदमान ला जाण्यासाठी अगदी चांगले महिने. ऑक्टोबर – डिसेम्बर च्या दरम्यान वादळ येण्याची शक्यता जास्त असते. मे अखेर पावसाळा सुरु होतो, मग water – sports बंद असण्याची शक्यता वाढते.

इथे बीच वर खाण्यासाठी  तुरळक गोष्टी मिळतात जसा की – नारळ पाणी, शाहाळ, किंवा चिरलेली फळे आणि चहा. 

बऱ्याच बीच  वर लोकांनी त्यांच्या घरात कपडे बदलण्याची सोय केली आहे किव्हा public changing रूम्स देखील आहेत, त्या मुळे swimsuits घालणे किंवा कपडे बदलणे या बेसिक सोयी तिथे आहेत. . 

अंदमान मध्ये मासेमारी वर बंदी आहे. इथे बऱ्याच गोष्टी दुसऱ्या राज्यातून फेरी ने येतात – अगदी मासे सुद्धा! ह्याच कारणामुळे काही गोष्टी जस की भाज्या, दूध लिमिटेड प्रमाणात असतं. त्यामुळे जर मासे खाण्यासाठी तुम्ही जाणार असाल तर परत विचार करा! अर्थात पोर्ट ब्लेअर वर हि कमी जाणवणार नाही, पण तुम्ही पोर्ट ब्लेअर सोडून दुसऱ्या कुठल्या बेटावर असाल तर हा तुटवडा तुम्हाला जाणवू शकेल. या कारणामुळे तुम्ही तुमच्याबरोबर काही खाण्याचे पदार्थ घेऊन गेलात तर ते जास्त सोयीचे होऊ शकते.

आशा आहे की ह्या छोट्या पण महत्वाच्या अश्या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्हाला अंदमान प्रवास करताना मदत होईल. हे बेट म्हणजे आपल्या देशातील निसर्गाचा खजिना आहे आणि त्याला तुम्ही जरूर भेट द्या.  

Categories
प्रवास

समुद्राखालील आगळे वेगळे जग – अंदमान भटकंती

अंदमान – नुसतं नाव काढले तरी डोळ्यासमोर उभे राहते ते पांढर्‍या वाळूचा आणि निळ्या-हिरव्या महासागराचे नयन मनोहर दृश्य. अंदमानचे नैसर्गिक सौंदर्य विपुल आहे. निळे समुद्र आणि अंदमान निकोबारची ती बेटं, निळ्या रेशीमवर विखुरलेल्या पाचूसारखी दिसतात.

 त्या ठिकाणाचा  विचार मला स्वप्नांच्या रम्य नगरीत घेऊन जातो. खरं तर जेव्हा आम्ही अंदमानला जाण्याचे ठरविले त्यावेळी माझी मुलगी लहान असल्याने मला थोडीफार काळजी वाटतं होती. परंतु मी  खूप चुकीचा विचार करत होते हे मला लवकरचं जाणवले.  

Andaman trip memories

आम्ही आजवर केलेल्या भटकंतीमध्ये, सर्वात आल्हाददायक ट्रिप हीच होती. ह्या प्रवासात आम्ही सुंदर समुद्र किनारे, तऱ्हेतऱ्हेचे वॉटर स्पोर्ट्स अनुभवलेच पण त्याच बरोबर सेल्ल्युलर जेल मध्ये भारताचा स्वतंत्रतेचा लढा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नक्की काय? हे ही समजून घेतले. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वेळी आम्ही समुद्राची एक सुंदर बाजू पाहिली, ती म्हणजे त्या पाण्याखाली असलेले पाण्यातील असंख्य जलचर प्राणी, वेली आणि इतर जीवजंतू. त्यांची एक अजब दुनियाचं त्या पाण्याखाली वसलेली आहे आणि ती मला अनुभवायला मिळाली underwater sea walk मुळे.

अंदमानच्या किनारपट्टीवरचे पाणी खरोखरच स्वच्छ आणि निर्मळ आहे. आम्ही हैवलॉक मध्ये असताना वॉटर स्पोर्ट्स साठी एलिफंट बीचवर गेलो. मला तेथे हत्ती दिसले नाहीत आणि अंदमान मध्ये हत्ती असतील ह्याची शंका सुद्धा आली पण मग ह्याला elephant beach का म्हणत असतील? हे मला माहित नाही. असो पण तो मुद्दा नाही!

आम्ही elephant island ला पोहोचल्या नंतर आम्हाला जाणवले कि एकत्र करण्यासारख्या फार ऍक्टिव्हिटीएस नाहीत .मुलगी लहान असल्यामुळे तिला फार खेळता येत नव्हते. मग ग्लास बॉटम होडीत बसून समुद्राची फेरी मारायचे असे आम्ही ठरवले. तिथे मी अजून एक पाटी पहिली ती म्हणजे underwater sea walk ची. कुतूहलाने आम्ही त्याबाबत चौकशी केली आणि लगेचच एक वेगळा अनुभव घेऊया असा विचार करून त्याचे तिकीट घेतले.

आम्ही पैसे दिल्यानंतर किनाऱ्यापासून काही अंतरावर anchor घातलेल्या एका लहान बोटीवर आम्हाला नेण्यात आले. आम्ही बोटीवर चढताच गोताखोरांनी आम्हाला त्यामध्ये बदलण्यासाठी डायव्हिंग पोशाख दिला. आम्हाला खरोखर काहीच कल्पना नव्हती की पुढे काय होणार पण तो अनुभव रोमांचक होता.

डाइव्हचा खराखुरा अनुभव

बोटीच्या अगदी शेवटी, दोन डायव्हर्स आमची वाट पहात होते. त्यांनी विचारले की आम्हाला हृदयविकार, क्लॉस्ट्रोफोबिया इत्यादी त्रास आहेत का? आम्ही एकदा नकारात उत्तर दिल्यावर त्यांनी आम्हाला दोन मोठे हेल्मेट घालण्यास दिले. हेल्मेटला मोठा पाईप जोडला होता, त्या पाइपमुळेच आम्हाला पाण्याखाली ऑक्सिजनचा पुरवठा होणार होता. हेल्मेट आणि त्या मोठ्या ऑक्सिजन पाइपमुळे मला क्षणभर अंतराळवीरांची आठवण आली!

त्यांनी आम्हाला काही सांकेतिक चिन्हे सांगितली जी ‘फाईन’, ‘फाइन नाही’ ‘पाण्यावर परत जाण्याची गरज’ इ. दर्शवितात. हेल्मेट तळापासून उघडे होते.त्यामुळे पाणी हेल्मेटच्या आत जाईल कि काय? अशी शंका मनात आल्याने डायव्हरला तसे विचारले असता तो म्हणाला,”हवेच्या दाबामुळे हेल्मेटमध्ये पाणी शिरु शकत नाही”.

हे वैज्ञानिकदृष्ट्या सर्व परिपूर्ण असले तरी मी त्वरीत प्रार्थना केली कारण मला खात्री होती की, जर पाणी शिरण्यास सुरूवात झाली तर घाबरुन आयत्या वेळी कोणतीही चिन्हे मला आठवणार नाहीत आणि कदाचित मला बघून त्या डायव्हरला स्वत: लाच भीती वाटेल 😛

Andaman trip memories- underwater sea walk

अंदमानमधील अंडरवॉटर वॉक अनुभव

आम्ही पाण्यात खाली उतरताच हेल्मेटमध्ये पाणी शिरले परंतु हनुवटीच्या पातळीच्या जवळच राहिले. आम्हाला ह्या अनुभवाचा पुरेपूर आनंद मिळावा म्हणून, गोताखोरांनी आम्हाला समुद्राच्या आत फिरायला नेले. आम्ही जिथे उतरलो तिथे समुद्राची पातळी जवळ जवळ १२ फूट खोल होती. 

हॉलिवूड मध्ये समुद्री जीवांवर भितीदायक चित्रपट नियमितपणे काढतात ते चित्रपट बघून मलाही असं वाटलं की आता समुद्रात गेल्यावर कोणी भयावह प्राणी आपल्यावर आक्रमण तर करणार नाही ना? चित्रपटांचा परिणाम कधी कधी मोठ्यांवरही होतो पण आम्ही ज्या भागात समुद्राखाली चालणार होतो ते ठिकाण बंदिस्त करण्यासाठी त्या जागेभोवती जाळी लावली होती, जी मला दिलासा देणारी होती!

असो! त्या निळ्या स्वच्छ पाण्यात, पायाखाली मऊ मऊ रेती आणि चहू बाजूने लगबगीने जाणारे रंगीबेरंगी मासे. एखादी मायानगरीच जणू! ते सोडून तिथे रंगीत कोरल होते, आजूबाजूला आलेल्या पाण्यातील वेली आणि छोटी झाडे देखील होती. एका दगडावर एक विशाल क्लाम पण होता.

या जलमय जीवनाचा इतक्या जवळून अनुभव घेणे म्हणजे स्वर्गीय आनंदच जणू . काचेच्या भिंती नाहीत, गर्दी नाही की कुठले अडथळे नाहीत. आम्ही त्यांना स्पर्श देखील करू शकत होतो! समुद्राखाली घालवलेले ते 45 मिनिटे अविस्मणीय होते.

समुद्राच्या अंतरंगातील हा प्रवास म्हणजे त्या जलचर प्राण्यांच्या राज्यातील माझ्यासाठी उघडलेली एक खिडकी होती आणि मी पुन्हा एकदा या प्रवासाच्या प्रेमात पडले.

Categories
प्रवास

भूतान एक छोटे निसर्ग रम्य राज्य

 तुम्ही जगातील सर्वात सुखी देश पहिला आहे का? कुठला हा देश? असं विचारताय? अहो हा देश म्हणजे भूतान! भूतान हा हिमालयाच्या कुशीत वसलेला एक निसर्गरम्य असा देश आहे. काही वर्षांपूर्वी मी ह्या सुंदर देशाला भेट दिली होती. माझे तिथले काही अनुभव इथे सांगत आहे.

भारताच्या तुलनेत भूतान एक छोटे राज्य आहे. सगळ्या बाजूने शक्तिशाली देशांनी घेरलेला असला तरी भूतान ने स्वतःची अशी एक ओळख निर्माण केली आहे. 

भूतान बद्दलची काही महत्त्वाची माहिती

१. भूतानला जायला भारतीयांना व्हिसा लागत नाही. एवढेच न्हवे तर passport देखील लागत नाही. भारत सरकारनी जाहीर केलेले कुठलेही ओळख पत्र, भूतान मध्ये दाखल होण्यासाठी पुरेसे आहे. 

२. भारतातून तुम्ही विमान किंवा by road प्रवास करू शकता.

३. कोलकत्ता येथून road प्रवास सोपा आहे. कोलकात्या हुन जर विमानांनी जाणार असाल तर मात्र एव्हरेस्ट दिसत नाही ह्याची नोंद असावी. तसेच दिल्लीहुन सुद्धा विमान प्रवास करता येतो.

४. भूतान ‘nu’ आणि भारतीय रुपया चे exchange rate सारखेच आहे. तिथे भारतीय रुपये ही सहज स्वीकारले जातात.

५. भूतान मध्ये राजाचे राज्य आहे.

६. भूतान हा एक बौद्ध धर्म पाळणारा देश आहे. पण ह्यांच्या कडे तिबेटचा प्रभाव जास्त आढळून येतो.

७. इथेले आहार बऱ्यापैकी मांसाहारी असून मिरची, याक चे दूध वा फळांचा वापर अधिक आहे.

 ८. हा भारतापेक्षा कमी प्रगत असा देश असून, ते बऱ्याच गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे.

९. जर आपण भारतीय नाही तर,  एक permit भूतान सरकार कडून जाहीर केले जाते, जे व्हिसा सारखेच असते आणि आपण ते नेणे गरजेचे आहे. 

१०. इतर देशातील लोकांना रोजी २०० ते ३०० डॉलर जास्तीचा कर आकारला जातो.  तुमचा प्रवास व सर्व बुकिंगची कागदपत्रे भूतान मध्ये एन्ट्री च्या वेळी दाखवणे बंधनकारक आहे .

११. भूतान मध्ये तिथले local guide घेणे बंधनकारक आहे.

माझे भूतान अनुभव

भूतान प्रवास कसा ठरला ते काही मला आठवत नाही, पण भूतानला जायचे म्हणजे बरेच प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिले. हिमालयात जसे वर जाऊ तसे हव्याच्या कमी दाबामुळे लोकांना त्रास होतो असं ऐकून होते, त्यामुळे तसे त्रास भूतानला होतील का? माझी लहान मुलं हा प्रवास सहन करू शकतील का? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिले.

The winding roads in Bhutan - the Himalayan country.
भूतान मध्ये प्रवास करत असताना

ह्याबद्दल बरेच वाचन करून, माझ्या शंकांचे निरसन झल्यावर आम्ही बुकिंग ची सुरुवात केली. भूतान मध्ये स्वछ हवा असल्याने सहसा लोकांना त्रास होत नाही पण high अल्टीट्युड चा त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून आपली ट्रिप ठरवताना आपल्या फॅमिली डॉक्टर शी जरूर बोला. आम्ही मार्च महिन्यात गेलो होतो आणि तेव्हा माझ्या मुलांना कुठलाच त्रास झाला नाही. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे :-

१. इथे तसे बऱ्यापैकी चालावे लागते आणि ते ही उंचावर, म्हणून जायच्या १ महिन्या आधी पासून टेकड्या चढून थोडी सवय करून घ्यावी.

२. तिथे जाण्याचे चांगले महिने म्हणजे मार्च – मे किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर . त्यानंतर थंडी वाढते.

३. Tiger’s Nest हे भूतान मधील एक प्रसिद्ध बौद्ध मंदिर आहे. डोंगर कोरून त्यात हे मंदिर बनवले आहे. इथे चढून जाणार असाल तर लौकर निघा. नाहीतर अर्ध्या वाटेपर्यंत घोडा घ्या. हा चढ जवळ जवळ  तीन तासाचा तरी आहे. अर्ध्या वाटे नंतर इथे बरेच पायऱ्या आहेत जे उतरताना गुढघ्यांना त्रासदायी होऊ शकते म्हणून नीकॅप जवळ ठेवा.

४. इथे अंधार लौकर होतो, म्हणून संध्याकाळी उशिरा पर्यंतचे काही कार्यक्रम आखू नका. 

आम्ही विमानाने भूतानला गेलो आणि ज्या कोणाला भूतान प्रवास करायचा आहे, त्यांना मी विमान प्रवास सुचवीन कारण विमना मधून दिसणारे हिमालयाचे ते नेत्रदीपक दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर तरळतात. एव्हरेस्टचे गगनचुंबी शिखर अगदी हात लावता येईल इतके जवळ दिसते.

भूतान चे मुख्य पर्यटन क्षेत्र म्हणजे तिमफु, पूनाखा आणि पारो. तिमफु ही भूतानची राजधानी देखील आहे. डोंगरांच्या मध्ये वाट काढत इथे बघण्यासारखे बरेच आहे. त्यांचे बौद्ध मंदिरे, museum, निसर्ग रम्य परिसर, शांत वातावरण, कष्टाळू पण समाधानी अशी लोकं. तिथे आम्ही फिरत असताना बरेच भारतीय दिसले. ही ठिकाण सोडून, भूतान च्या उत्तरेकडे बरेच लोक ट्रेकिंग ला ही जातात. 

भूतानची लोक पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर राहावे ह्यासाठी बराच प्रयत्न करत असतात. चालता चालता जर कचरा दिसला तर तो उचलून टाकायला हे पुढे मागे बघत नाहीत. तिथले हॉटेल मध्ये खूप जेवण बनवून मग वाया घातले जात नाही. प्रवाश्यांना थोडा उशीर होईल अशी कल्पना दिली जाते, पण जेवण हे ताजे बनवले जाते.  

अश्या ह्या साध्या आणि सुंदर भूतान कडून शिकण्या सारखे बरेच आहे. एक शांत, निसर्गरम्य ठिकाणच्या शोधात तुम्ही असाल तर जरूर अनुभवा भूतान.

Categories
प्रवास

पुणे मुंबई पुणे

एक्सप्रेस प्रवास, वातानुकूलित, स्लीपर आणि तिकीट नसेल मिळालं तर जनरल, काही जण विनातिकीट, हो……अर्थात मी बोलतोय ते रेल्वे प्रवासाबद्दल.

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच गाड्यांना पुणे ते लोणावळा मधल्या स्टेशनची इतकी ऍलर्जी आहे की त्या कधी चुकूनही सिग्नलला म्हणून थांबत नाहीत, त्यामुळे पिंपरी चिंचवड आकुर्डी पासून ते लोणावळा पर्यंत सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाचा योग मिळतो, या प्रवासात खासगी व सरकारी चाकरमानी, भाजीवाले, शेतकरी, अनपेक्षित आणि अपेक्षितपणे येणारे नातेवाईक, दूधवाले ही मंडळी…

या प्रवासात बरेचदा रोज भेटणारी मंडळी असल्याने त्यांचे अनेक छोटे छोटे ग्रुप असतात, भेटल्यावर नमस्कार! राम राम! होतातच आणि गप्पांमध्ये, मार्केटमद्धे नवीन आलेल्या फोनपासून गावाकडच्या भाच्याला नोकरीचा वशीला, असे वेगवेगळे अनेक विषय येतात, लोणावळा आला की लोणावळ्याला जाणारी मंडळी लोणावळा उतरतात, आणि मुंबईला जाणारी जागा मिळेल तशी बाकड्यांवर किंवा उभ्याने एक्सप्रेसच स्वागत करण्यास तयार असतात, कोणी सकाळचं ८ वाजताच ऊन खात असत तर काहीजण फलाटावर सकाळचा मॉर्निंग वॉक किंवा व्यायामही करून घेतात, कुठे इंजिन जोडणी – काढणीची काम चालू असतात, इंजिनचे – प्रवाश्याचे आवाज असतात, मग अचानक वडा -इडलीवाले, वडापाववाले आणि प्रवाश्याचे आवाज, गाडी आली रे! अशी ओरड चालू होते, सर्व प्रवासी अलर्ट होऊन ते बोगीच्या एका उघड्या दरवाज्यामधून गाडी सुटायच्या वेळेआधी आत जायची आणि रिकाम्या जागा पकडायची कसरत चालू होते, त्यात रोजच्या ओळखी कामात येतात, तर कधी रोजचा प्रवास करणारा मित्र किंवा नातेवाईकही उपयोगी पडून जातो.

यात तुम्ही किती सोशल आहात यावर तुमचा प्रवास सुखकर का खडतर डिपेंड असतो, यातच जागा पकडणार्या माणसाच्या मनात तुमचे स्थान कितवे हे देखील कधी कधी समजून जाते, पण इथे जुगाडू माणसांची नेहमीच चलती असते. बसणारे प्रवासी आणि उभे प्रवासी यांचं सिलेक्शन झाल्यावर जनता थोडी स्थिरस्थावर होते.

मग गाडी हलली की डेलीवाल्याचे जेवन्याच डब्बे उघडतात, अमुक अमुक “साहेब या जेवायला …” अशी आग्रहाची आमंत्रणही कानावर पडतात, त्यानंतर डबे उघडतात, आणि सर्व काकूंनी पहाटे पहाटे केलेल्या स्वयंपाकाचा सुगंध दरवळतो, डबे शेअरिंग झाल्यावर स्वीट बाहेर निघते, हे सर्व बघून tempt झालेली लोक उडीद वडा आणि इडली वर आपली भूक भागवतात, वर्तमानपत्रांची अदलाबदल होते. काहीजण रात्रीची झालेली जागरण भरून काढण्याच्या कामी लागतात, त्यात काही जणांना सूर सापडतो, तो कल्याणचा सिग्नल लागोस्तोपर्यंत तसाच! त्यात काहीजण फुगवलेली उशी किंवा फुगवायची कॉलर वापरतात तर काहीजण शेजारच्यांचा खांदा! सीटवर जागा पकडण्यासाठी ठेवलेले पेपर किंवा बस्कर असतातच!

travel tales from a mumbai -pune express train

यात अनेकजण वेगवेगळ्या पोसिशनमद्धे असते, कोणी आख्या सीटावर पूर्ण पहुडलेले असते तर काहीजण पोटात पाय घेऊन झोपतात, तर कोणी सामान ठेवायच्या जागेवर झोप काढतात. यात काही जणांची प्रवचने चालू होतात तर काही ठिकाणी गप्पा चालू होतात, काही ठिकाणी माहितीची आदानप्रदान होते, कधीकधी यातूनच चांगले सोर्सही सापडुन जातात.

लोकतर सर्व निराळीच असतात, कुणी शांत कुणी खूप अशांत! घरी गृहलक्ष्मी बोलू देत नाही म्हणून संपूर्ण प्रवासात त्यांची टकळी नॉनस्टॉप चालू असते, तर काही घरी नाहीतर नाही इथे तरी शांतता मिळावी म्हणून एखादे पुस्तक काढून वाचत बसतात. विचित्र किंवा विशेष केशरचना असलेली व्यक्ती म्हणून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. डोक्यावर लावलेला टिळा, जाड काड्यांचा चष्मा, रोज लावलेले हेडफोन, घातलेलं सोनं, कृश- स्थूल देहयष्टी प्रत्येक माणसाचे वेगळे कॅरेक्टर बनवत असते.

विशेष म्हणजे जागेसाठी जागेजागेवर भांडणारी ही लोकं दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्री, वाढदिवस, सेंन्डऑफ खूप छानपणे साजरा करतात.आपल्या आजूबाजूला कचरा नको, म्हणून अनेकांना कचरा खिडकीबाहेर टाकण्याची सवय असते, पण हे न करता, ते एक कौतुक काम करतात ते कचरा व्यवस्थापनाचे! प्यायलेल्या चहा कॉफीचे कप, इडली वड्याचे बाउल चमचे खिडकी बाहेर न टाकता ही लोकं कचरापेटीत टाकतात, तर आळशी मंडळी सीटाखाली ठेवतात, पण यामुळे पुणे ते मुंबई मध्ये निसर्गाची हानी आणि निसर्गाचा कचरा न होण्यास खारीचा वाटा यांच्याकडून होतो, तेंव्हा सर्वांनीच हीच सवय अंगीकारून खिडकीबाहेर कचरा टाकणे टाळले पाहिजे.

Categories
प्रवास

फिनलंडची कचराकुंडी

सध्या माझे वास्तव्य फिनलंड मध्ये आहे. युरोपियन युनियन मध्ये हा देश येतो. हा एक प्रगत देश आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी ह्याने रशियापासून स्वातंत्र्य मिळवले. १९१६ मध्ये हा स्वतंत्र झाला. जागतिक सुखी माणसांच्या क्रमवारीत फिनलंड नंबर एक च्या स्थानावर येतो. सुखी माणसांचा सदरा फिनलंड मध्येच मिळतो.

हे असे का या प्रश्नाचे उत्तर फिन्निश माणसाच्या जीवनसारात मिळते. – २५ ते -३५ ते २० डिग्री पर्यंत तापमान असणाऱ्या देशात बर्फाच्या राशीच राशी असतात. तरीही “There is no bad weather, there are just bad clothes.” असे म्हणत ते दैनंदिन व्यवहार चालू ठेवतात. बालवाडीतल्या लहान मुलांनाही -१० डिग्री बर्फावर दोन तास खेळवले जाते. निसर्गाबरोबर राहायला शिकवले जाते.

माझे लक्ष वेधणारे व कुतूहल जागे करणारे हे छोटेखानी घर. हे प्रत्यक्षात घर नसून एक कचराकुंडी आहे. तिला कुलूप असते. घराचे कुलूप व कचराकुंडी एकाच चावीने उघडतात. साधारणपणे तीन इमारतींना मिळून एक कचराकुंडी असते. स्वतःचा कचरा प्रत्येकाने नुसता ओला सुका वेगळा न करता पेपर व पॅकिंग सामान वेगळे, काच वेगळी, डब्बे वेगळे, इत्यादी वर्गीकरण करून टाकायचा असतो. आंतरबाह्य स्वच्छ कचराकुंडी, रंग पांढरा, व तिला चक्क कुलूप? हे पाहून मी अचंभित झाले.

नंतर कळले ही शिस्त जीवनाचा एक भाग बनून गेल्यावर जीवन सुखद होते.

कचराकुंडीचे दृश्य.
Categories
प्रवास

उन्हाळ्यात घ्या गुलाबी थंडीचा अनुभव!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणलं की, धमाल, मस्ती, मजा आणि प्रवास. पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मामाच्या गावाला किंवा आजोळी जाण्याची प्रथा असायची. आपल्या चुलत, मावस भाऊ-
बहिणींबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा संपायचा हे कळायचंही नाही.

पण आता बदलती कुटुंब व्यवस्था, परदेशी स्थायिक असलेले भावंड किंवा विसंगत उन्हाळ्याच्या सुट्ट्या, अशा बर्‍याच कारणांमुळे सगळे एकाच वेळी आजोळी भेटतील किंवा सगळे दरवर्षी भेटतीलच ह्याचा नेम नाही.

अशावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी काय करावे हा एक मोठा प्रश्न असतो. आमच्या कुटुंबात सगळ्यांनाच प्रवासाची आवड आहे. प्रवास करण्यातून मुलं बरेच काही शिकतात असं माझं स्वतःचं मत आहे. ते स्वावलंबी होतात, त्यांना वेगवेगळ्या संस्कृतींची माहिती मिळते, बऱ्याच प्रसंगांना कसे सामोरे जावे हे कळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत लोकं किती आनंदी आणि किती स्वच्छंदी राहतात याची जाणीव होते.

आज मी तुमच्यासाठी भारतातील काही प्रमुख ठिकाणांची माहिती देत आहे. जिथे उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही आपल्या मुलांना घेऊन एक सुंदर सुट्टी आणि प्रवास अनुभवू शकता.

मी ह्या लेखासाठी दक्षिण भारतातील
५ ठिकाणांची निवड केली आहे.

ऊटी- कुन्नूर

वायनाड बाणासुर धारण च्या आजू बाजूचे ठिकाण

ऊटी तसे बरेच प्रसिद्ध ठिकाण आहे. तामिळनाडू मध्ये असलेले ऊटी हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून बरच नावाजलेला आहे पण त्याच्याच बाजूला असलेलं कुन्नूर हे इतकंस प्रसिद्ध नाही. हि दोन्ही ठिकाणं तशी बऱ्यापैकी एकमेकांच्या जवळ आणि अतिशय सुंदर अशी आहेत. ऊटी ते कुन्नूर अशी एक टॉय ट्रेन खूप प्रसिद्ध आहे. निलगिरी माऊंटन रेल्वे अस त्या  टॉय ट्रेनचे नाव. ऊटी हे अगदी निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे तेथील रोज गार्डन बॉटनिकल पार्क हे नक्की भेट देण्यासारखे आहेत. ऊटी लेक बोट हाऊस जवळ एक थ्रेड गार्डन म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे दोऱ्यांनी बनवलेली सुंदर फुले-पाने आणि झाडं प्रदर्शनात ठेवलेली आहेत. एप्रिल-मेच्या उन्हाच्या चटक्यांनपासून लांब अशा थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेन मधून सुंदर हिरव्या डोंगरांच्या मधून जाण्याचा प्रवास निराळाचं आहे. मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडणारे असे ऊटी आणि कुन्नूर, एका आठवड्यात पाहून होऊ शकते. काही अविस्मरणीय अनुभव म्हणजे ऊटी लेकमध्ये बोटिंग चॉकलेट्स जे होममेड चॉकलेट म्हणून फेमस आहेत आणि तिथले छोटे गाजर.

कूनुर आणि त्याच्या जवळपास असणारे म्हणजे दोड्डाबेट्टा, लॅम्बस रॉक, सीम्स पार्क , कॅथरीन फॉल्स. कुन्नूर आणि ऊटी मध्ये एकंदरीत ठिकाणांच्या नावांपासून ते तिथले बोर्डींग स्कूल्स वगैरेपर्यंत युरोपियन छाप बरीच दिसते. पुढचे ठिकाण हे तिथे जवळ असलेलं म्हणजे म्हैसूर बंगलोर.

मैसूर बेंगलोर

कर्नाटकातले एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणजे मैसूर आणि बेंगलोर. बेंगलोर हे कर्नाटकची राजधानी आहे आणि मैसूर प्राचीन राजधानी आहे. वडियार हे कर्नाटकचे राजा होते. म्हैसूर ही त्यांची राजधानी आणि मैसूर पॅलेस जे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आता आहे तो त्यांचा बालेकिल्ला होता. मैसूर बेंगलोर हे चार ते पाच दिवसात सहज करण्यासारखे ठिकाण आहे. तिथे कनेक्टिव्हिटी चा प्रॉब्लेम नाहीये म्हणजेच तुम्ही विमान रेल्वे किंवा बस यापैकी कुठल्याही प्रकारे प्रवास करू शकता. तिथले हवामान, मोठ्या मोठ्या बागा, हिरवळ हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य.

मैसूर पॅलेस हे दसऱ्याच्या सुमारास अतिशय बघण्यासारखे असते. कारण तिथे दहा दिवसांचा मोठा दसरा उत्सव साजरा केला जातो. इतरवेळीही म्हैसूर पॅलेस मध्ये आत जाता येतं. त्यामुळे तो पॅलेस बघणं आणि त्याचबरोबर संध्याकाळी तिथे रोषणाई केली जाते, ते बघायला भरपूर लोकांची तिथे गर्दी असते. मैसूरमधले प्राणी संग्रहालय अतिशय प्रसिद्ध आहे. बंगलोरहुन ऊटीला जाणार असाल तर प्रवास दिवसा आणि स्वतःच्या गाडीने करा म्हणजे बंडीपूर अभयारण्यामधून जाताना काही प्राणी दिसू शकतील.

बेंगलोर मध्येही बेंगलोर पॅलेस, बन्नेरघट्टा नॅशनल पार्क, विश्वेश्वरय्या सायन्स म्युजिअम, म्युझिकल फाउंटन, कब्बन पार्क, लालबाग अशी प्रसिद्ध ठिकाण आहेत.

कोडाईकॅनाल

आता येणार आहे तामिळनाडूमधील अजून एक सुंदर आणि प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण, म्हणजेच कोडाईकॅनाल. कोडाई मध्ये कॉक्रस वॉक, पिल्लर रॉक, सिल्वर कॅस्कॅड वॉटर फॉल,डॉल्फिन नोज हे काही अगदी आठवणीत राहणारी ठिकाणे आहेत. आम्ही ऐन उन्हाळ्यात कोडाईकॅनलला गेले असताना सुद्धा तिथली गुलाबी थंडी अनुभवत तिथे काढलेले तीन दिवस आठवणीत अगदी स्पष्ट आहेत. कोडाईकॅनाल मध्ये एक मोठा एक्स आकाराचे तळे आहे. त्या तळ्यांमध्ये बोटिंग करावे, तेथील निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवावे म्हणजे जीवनातला सगळा क्षीण निघून जातो.

वायनाड

वायनाड हे केरळ मधील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. वायनाड इथले हिरवा गार डोंगर मनाला भुरळ पाडतात. इथे बऱ्याच ठिकाणी फार्म stay असते. नारळ आणि सुपारीच्या बागेच्या सानिध्यात एक टुमदार घर सहज मिळू शकते. आम्ही पण अश्याच एका ठिकाणी राहिलो होतो आणि आमची कौलारू घरात राहायची हौस भागवली होती. वायनाडमध्ये बनसुरा सागर बांध, पुकोट तलाव, सुचीपरा फॉल्स हे बघण्या सारखे आहेत.

मुन्नार

मुन्नार केरळ मधलं एक थंड हवेचा प्रदेश आहे. इथल्या चहाच्या मळ्यांनी भरलेले डोंगर हे बघण्यासारखे आहे. सुंदर हवा, सगळीकडे हिरवळ आणि बऱ्यापैकी शांतता आणि निसर्गरम्य प्रदेश असं मुन्नार.

मुन्नार येथे चहाचे मळे, चहाची फॅक्टरी ह्या बरोबरच मट्टूपेट्टीधरण, Eravikulam national park बघण्यासारखे आहे. मुन्नारमध्ये असताना केरळ आयुर्वेदिक मसाज ही नक्की अनुभवा.

ही आहेत माझ्या काही महितीतली उन्हाळ्यात जाण्यासारखी ठिकाणे. तुम्हाला आवडली असतील तर जरूर कळवा.