Categories
पाककृती

भाजणीचे थालीपीठ

अखेर महाराष्ट्रावर वरूण राजाची कृपा झाली. सगळीकडे कशी छान हिरवळ पसरली आहे. मातीला तो छान ओला गंध आला आहे. शेतकरी पेरणीच्या लगबगीत आहेत. पर्यटक पावसाळी सहलीचे प्लॅंनिंग करत आहेत. काही तुमच्या आमच्या सारखे खवैय्ये, आता मस्त चमचमीत काय काय खाता येईल ह्या विचारात असतील. फार तेलकट खाऊन होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार पण येऊन जातो.

अश्या वेळेस , आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांमधला हुकुमाचा एक्का, पौष्टिक आणि रुचकर म्हणजे ‘थालीपीठ‘.


आता थालिपीठाचे बरेच प्रकार करता येतात. ते मी माझ्या पुढील काही लेखांमध्ये नक्की सांगेन. आता आपण सुरुवात आपल्या पारंपरिक भाजणीच्या थालिपीठापासून करूया…..

दुर्गा बाई भागवत आपल्या एका पुस्तकात म्हणतात, द्रौपदीला जी थाळी मिळाली होती, त्यावरून ‘ स्थाली पाक’ हा शब्द आला. म्हणजे एक खोलगट थाळीत पीठ थापून जो पदार्थ शिजवतात तो थालीपीठ. आता ही खोलगट थाळी म्हणजे तव्याचाच एक प्रकार असला पाहिजे. म्हणजे हा एक पारंपरिक प्रकारचं आहे.
त्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि बऱ्याचश्या डाळी, धणे आणि जिरे ह्यांचे मिश्रण आहे. त्यामुळे आजकालच्या नवीनच स्वयंपाक शिकलेल्या किंवा करणाऱ्या मुलींच्या भाषेत सांगायचे तर ‘ Multigrain, gluten free, low fat pancakes’. असं म्हंटलं की डिश एकदम हिट!!

आता मुख्य मुद्द्याकडे येऊया, थालिपीठाचे साहित्य आणि कृती. थालिपीठ करायला माझ्या सासूबाईंनी शिकवलं, त्या खूप सुंदर भाजणी करायच्या. त्यांच्या हाताची सर नाही पण त्यांनी दिलेल्या प्रमाणात अगदी खमंग होते हे नक्की.


साहित्य

भाजणी करिता
ज्वारी -५00 ग्रॅम
बाजरी – ५00 ग्रॅम
तांदूळ – ५०० ग्रॅम
हरभऱ्याची डाळ -५०० ग्रॅम
उडीद डाळ -५०० ग्रॅम
गहू -१२५ ग्रॅम
धने – १२५ ग्रॅम
जिरे -१२५ ग्रॅम


थालिपीठाकरिता,
भाजणी – २ कप
कांदा -१ मध्यम
टोमॅटो -१ मध्यम
कोथिंबीर – ५-६ काड्या
तीळ – १ टेबल स्पून
ओवा – १/२ टी स्पून
तिखट – १ टी स्पून
मीठ चवीनुसार ( मी १ टी स्पून घेते)
तेल – ३-४ टेबलस्पूनकृती,

भाजणीसाठी

सर्व दिलेले साहित्य एक एक करून वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या. भाजताना तेलाचा अजिबात वापर अजिबात नकोच. सगळ्या जिन्नसांचा एक सुंदर सुगंध येतो. थंड करून सगळं एकत्र करा आणि दळून आणा. थोडं जाडसर दळलेलं छान वाटतं. ही झाली आपली भाजणी तयार. आता ही हवा बंद डब्ब्यात ठेवा 2 महिने अगदी छान राहते.

थालिपीठासाठी

कांदा, टोमॅटो, आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घ्या.
आता त्यात भाजणी, तिखट, मीठ, ओवा, तीळ असे सर्व पदार्थ घाला. पाणी घालून छान मऊ पीठ भिजवून घ्या. पोळीला भिजवतो त्यापेक्षा थोडं मऊ असावं. आता तवा किंवा फ्रायपॅन वर 1 टेबल स्पून तेल घ्यावे. पिठाचा एक गोळा घेऊन तो तेलावर छान थापून घ्यावा. (थापयच्या आधी हाताला जरा पाणी लावून घ्यावे)आणि त्यावर बोटाने 5 होल करावे. त्यात थोडे तेल घालावे म्हणजे थालीपीठ आतून छान शिजते .आता स्टोव्ह चालू करावा. २मिनीटे झाकण ठेवून शिजवावे. नंतर थालीपीठ पलटवून 2 मिनिटे खरपुस भाजावे.
आता खुसखुशीत थालीपीठ तय्यार….
हे थालीपीठ मस्त लोणी, चटणी, लोणचं किंवा दही कशाबरोबरही खा. नाही मस्त ताव मारा.😋

Categories
खाऊगिरी

खाद्य संस्कृती गुढीपाडव्याची

परवा असंच मी आणि माझ्या काही मैत्रिणी भेटलो. सगळ्या काही महाराष्ट्रीयन नाही. आंध्र प्रदेशातल्या, कानडी, उडपी कडच्या काहीजणी, तर काहीजणी गोव्याकडच्या! स्वयंपाक हा स्त्रियांचा आवडता विषय असल्याने, चारजणी भेटल्यावर रेसिपीसचा विषय निघणार नाही, असं नाही होणार. प्रत्यक्ष घरी गेल्यावर त्यातल्या निम्म्या पेक्षाही कमी रेसिपीज करून बघितल्या जातात पण असो! त्यामुळे चार रेसिपीस माहित तरी होतात.

Photo credit -http://khaugiri.blogspot.com/
पुरण पोळी ,दुध आणि साजूक तूप – P.C प्रीती बिनीवाले 

तर अश्याच आम्ही चार-पाच जणी. सहज गप्पा मारताना गुढीपाडव्याचा विषय निघाला. श्रीखंड-पुरी हा बेत कुणाला आवडणार नाही? पुरणपोळी हा प्रकार खाल्ला नाही, माहित नाही किंवा आवडत नाही, अशी व्यक्ती मला तरी आजपर्यंत भेटली नाही.

“तुम्ही काय-काय करता गुढीपाडव्याला?” असं मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं. ती आंध्र प्रदेशातली आहे. मग तिला महाराष्ट्रातली गुढीपाडव्याची माहिती दिली. श्रीखंड-पुरीचा बेत कसा करतो तेही सांगितलं. मग त्याचबरोबर ओघानेच पुरण पोळी, शेवयांची खीर याचीही चर्चा झाली. गरम चहाच्या एक-एक घोटा सहित आता आमच्या गप्पा सुद्धा रंगू लागल्या. प्रत्येक चौका-चौकाला भाषा आणि खाद्य संस्कृती बदलते असं मानलं जातं.

मग उमा मला म्हणाली, “अगं, आम्हीही गोव्याला गुढी उभी करतो. आम्ही इडली सारखाच एक प्रकार करतो, खवलेल्या नारळाच्या गोड रसाबरोबर खातो. त्यात गुळ,वेलची पुड, थोडंसं मीठ पण घालतो. त्यात अजून वेगळाच प्रकार आम्ही करतो. त्याला आम्ही हिट रोस असं म्हणतो. नारळ, गुळ, ड्राय फ्रुटस असं घालून मिश्रण करतो. फणसाच्या पानाच्या द्रोण तयार करून त्यात खालचा एक थर इडलीच्या पिठाचा. त्यावर मग नारळाचं सारण आणि मग परत एक इडलीच्या पिठाचा थर, असे लेअर लावून आम्ही ते उकडून घेतो. नारळाच्या गोड रसाबरोबर ते इतकं मस्त लागत ना! मला तर हे ऐकून लगोलग करून बघावं असं वाटलं.

रूपा उडपी मध्ये राहणारी, ती म्हणाली, “आमच्याकडेही इडली करतो. त्याचबरोबर कैरी चिरून त्याला मोहरी, मिरची, हिंग, कडीलिंब याची फोडणी देऊन चटणी करतो त्याला पचडी म्हणतो. मग काजूचे पहिले बी घालून केलेली तोंडलीची भाजी. पनाक म्हणजे गुळ, वेलची पूड, मिरपूड, सुंठ आणि मीठ हे घालून केलेलं लिंबाचं सरबत!”  म्हणलं, वाह! क्या बात हैं।

त्रिपुरा म्हणाली, “आम्हीही पचडी करतो पण आमची आंध्राकडची पचडी म्हणजे, चिंचेचा कोळ, ओल्या नारळाचे तुकडे, पिकलेले केळं, कडुलिंबाची फुलं, गुळ, कापलेल्या कैरीचे तुकडे आणि थोडंसं मीठ अशी असते. ही पचडी म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सर्व चांगल्या वाईट अनुभवांचे प्रतिक असं आम्ही समजतो.

गप्पांच्या ओघामध्ये महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश सगळं फिरून आल्यासारखं वाटलं! मग घड्याळाकडे लक्ष गेले. बघता बघता दोन तास कसे निघून गेले कळलं देखील नाही.मला आपलं असं वाटतं, पिझ्झा आणि बर्गरमध्ये जेवढी व्हरायटी मिळेल त्यापेक्षा कैकपटीने जास्त व्हरायटी फक्त आपल्या भारतामध्ये मिळेल. परदेशी जाऊन घरी आल्यावर, घरात शिजवलेला गरम वाफाळणारा वरण-भात, त्यावर मीठ आणि लिंबू आणि वर साजूक तुपाची धार! तळलेला पापड, लोणचे, शेंगदाण्याची चटणी हे एवढंच जरी खाल्लं तरी प्रवासाचा शीण गेल्यासारखं वाटतो! एक वेगळचं सुख असतं त्यात.

आता पुढच्या पॉटलकला काय मेनू करायचा? हा प्रश्नचं नव्हता. मेनू तयार होता, श्रीखंड-पुरी, इडली, तोंडलीची भाजी, पचडी आणि पनाक! तारीख आणि वेळ मात्र अजून ठरायची आहे.