Categories
काही आठवणीतले माझा कट्टा

वाढदिवस कि सोहळा?

काल एका वाढदिवसाला गेले होते. माझ्या मुलीची मैत्रीण तिचा १०वा वाढदिवस अगदी जोरदार साजरा करायचा असं त्या आई -वडिलांनी ठरवले होते . एका बड्या हॉटेल मध्ये हॉल बुक केला होता. तिथे कितीतरी फुगे लाऊन सजावट केली होती. अर्थात प्रिन्सेसची थिम होती! 

वाढदिवसाची तयारी सजावट आणि सगळा चकचकाट पाहता माझी मुलगी मला म्हणाली.

“माझा पुढचा वाढदिवस असाच आणि इथेच करायचा हं !” मी नुसतीच मान डोलावली आणि “उद्या बोलू त्यावर” असे म्हणाले. 

तिथले विविध खेळ, (tattoo, nail art, extensions – इत्यादी कॉउंटर्स वर माझी मुलगी मनसोक्त खेळली आणि निघताना एक रिटर्न गिफ्टचा पॅकेट घेऊन परत आलो . 

दुसरा दिवस 

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मुलगी निवांत उठली पण तो आदल्या दिवशीचा वाढदिवस तिच्या डोक्यात घोळत होता . 

मुलगी – “ तुम्ही कसे करायचा वाढदिवस ?” असा प्रश्ण तिने विचारला.

मी- “आमचा अगदी साधा घरच्या घरी व्हायचा वाढदिवस” मी म्हणाले 

मुलगी – “ मग तुला वाईट वाटायचं का ?”

मी- छे ग ! तेव्हा सगळ्यांचा तसाच व्हायचा . १ वर्ष  आणि ५ व वर्ष वाढदिवस त्यातल्या त्यात जोरात. बाकी सगळे घरीच!

मुलगी – म्हणजे आजी तुझ्या मैत्रिणींना पार्टीला बोलवत नव्हती,  special थिम ठरवत नव्हती? आणि cake चं काय? मुलीनी आश्चर्याने विचारले. 

मी- ( हसत ) अगं तेव्हा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी महत्वाचा दिवस होता, पण तो असा commercialize झाला नव्हता. 

मुलगी – तुला तुझे बर्थडे आठवतात ?

मी – हो ! तेव्हाच्या वाढदिवसात महागडे गिफ्ट नव्हते पण मनापासून दिलेले “ यशस्वी हो ! औक्षवंत हो!” अशी आपुलकीचे आशीर्वाद होते . तेव्हा cake कापला जायचा आणि सगळ्यांमध्ये वाटला हि जायचा पण जिभेवर चव रेंगाळायची ती म्हणजे आईने केलेल्या माझ्या आवडीच्या गोडाची !

मुलगी – मग आजी सगळ्यांना काय द्यायची खायला? Chineseकि चाट ?

मी – अगं तेव्हा पार्टी म्हणलं कि सगळ्यांच्या घरी ठरलेला मेनू असायचा – वेफर्स , cake आणि सामोसा किंवा ढोकळा. 

मुलगी  -( जोरजोरात हसत ) हा काही मेनू आहे! तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर का ठेवत नव्हता!

मी – कारण तो तेव्हा इतक्या सर्रास मिळतच न्हवते!

आता मात्र मुलगी चाट पडली 

मुलगी – तुम्ही नक्की वाढदिवसाला करायचा तरी काय ?

फार काही नाही . आमचा वाढदिवस आमच्या घरच्यांसाठी एक आनंददायी दिवस होता, पण त्याचा सोहोळा झाला नव्हता. दिवाळीत आई दोन ड्रेस घेत असे . त्यातला एक वाढदिवसाचा आणि एक दिवाळीचा. जर वाढदिवसाच्या दिवशी शाळा असेल तर शाळेत चांगला ड्रेस घालून जायचो. 

आई माझ्या आवडीचा स्वयंपाक करायची आणि मला आवडतो म्हणून खास हलवा ! मग संध्याकाळी आजू बाजूचे मित्र मैत्रीण बोलवायचे. मोजून ७-८ मुलं असत . तेव्हा हे रिटर्न गिफ्ट च काही फॅड नव्हतं. काही गिफ्ट मिळायची, नाहीतर सगळे मिळून एक काहीतरी उपयोगी वस्तू देत. 

मग संध्याकाळी cake कापला जायचा . तेव्हा आमचे cake हि साधे! कधी आई घरी करायची , कधी कोपऱ्यावरच्या बेकरी मधून मागवायची . Cake चे आकारही ठरलेले! चौकोनी, गोल किंवा फार फार तर बदाम आकाराचा . त्यावर गुलाब आणि काही फुलं पानं सोडली तर वेगळे काही फारसे नसत. 

सगळे आले, कि आई आधी औक्षण करायची . मग सगळ्यांच्या पाया पडायचे , देवाच्या पाया पडायचे आणि शेवटी cake कापायचा. तेव्हा आईला मदतीला म्हणून आपणहुन शेजारच्या काकू यायच्या. तेव्हा  स्मार्ट फोन नव्हते मग कोणीतरी त्या रीळवाल्या कॅमेरा तुन २-४ फोटो काढायचे कि झाला आमचा वाढदिवस. सुट्टीच्या दिवशी वाढदिवस असेल तर सकाळी देवळात जाऊन यायचो इतकंच.

वाढदिवस म्हणून आई-बाबा सुट्ट्या टाकून घरी बसत नव्हते किंवा वाढदिवस पुढे ढकलणे वगैरे प्रकार नव्हते. भल्या मोठ्या पार्ट्या नव्हत्या, त्यातून निर्माण होणार कचरा आणी अन्नाची नासाडीही नव्हती, कोणाला नको असलेले खेळांचे ढीग नव्हते कि अव्वाच्या सव्वा खर्च नव्हते. सगळं कसं सुटसुटीत .. short and simple but still sweet असं असायचं. आमचे वाढदिवस असे भव्य दिव्य नव्हते पण इतक्या वर्षांनंतर देखील त्या वाढदिवसाची आठवण मनाला सुखावा देते. 

इतका देखावा आणि ग्रँड सेलेब्रेशनची खरंच गरज आहे का? हा प्रश्ण आज आपण पालकांनी स्वतःला विचारणे गरजेचे आहे, नाही का?

Categories
काही आठवणीतले

सांगली, पूरानंतर १५ दिवस

सगळ्यांनीच सांगलीच्या पुराच्या बातम्या बघितल्या वाचल्या. त्याची छोटी झलक मी घेवून आले. मी गेले तोपर्यंत पूर ओसरला होता. पाणी ओसरले होते. सगळीकडे कोरडे झाले होते. पण लोकांच्या मनातुन अजूनही ती गोष्ट गेलेली नव्हती. पूर आणि पुरानंतर झालेले परिणाम भयानक होते.

मी गेले तोपर्यंत बरीचशी स्वच्छता झाली होती. पण संपूर्ण सांगलीवर त्याचा परिणाम खूप जास्त झाला आहे. काहींच्या घरात ५ foot पाणी होते तर काहींची दुकाने पूर्ण १००%पाण्यात होती आणि हि अशी स्थिती ७ दिवस होती. दुकानदारांच खूप नुकसान झाले. ज्यांनी वेळेत सामान हलवले त्यांचा माल तरी वाचला. पण ज्यांना वेगवेगळया कारणांमुळे ते शक्य नव्हते त्यांच काय? अन्नधान्य तर खराब झालंच ,पण कपडे, कापड, electronics एक न अनेक. बरं पाणी तरी काय ते स्वच्छ थोडच होतं. भयानक खराब पाण्यात सगळे सामान ७-८ दिवस राहिल्याने पूर ओसरल्यावर सगळीकडे घाण, वास पसरला. मी गेले तेव्हा पूर ओसरून १५ दिवस झाले होते. दुकानदारांनी जे sealed सामान आहे ते बाहेर काढून कसे आहे काय ते बघायला सुरु केलेच होते. पण त्याबरोबर सगळ्यांना नवीन furniture करायला लागणार होतं. मुख्य माल जरी हलवला तरी कपाटे खुर्च्या काय काय हलवणार. ज्यांची आर्थिक परिथिती ठीक आहे त्यांनी हि सगळी कामे करायला सुरुवात लगेच केली. पण त्यासाठी लागणार सामान पण पाण्यात. मग मिरज किंवा आजूबाजूच्या गावातून सगळे सामान आणायला सुरु झाली. दुरुस्तीच्या कामासाठी लागणारी लोक कमी आणि त्यांच्याकडे असणारी कामं जास्त. ह्यावरून आता त्यांचे पण नखरे सुरु आहेत. ती लोक तरी काय करणार आणि कुठे कुठे पुरे पडणार.

Photo credit- Maharashtra Times.

काही दुकानदारांनी आता सेल लावले आहेत. निम्म्या किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीत विक्री चालू आहे. त्यातून सुद्धा लोकांचा नवीन व्यवसाय चालू आहे. असे कपडे आणायचे आणि घरी आणून धुवून स्वच्छ करून परत दुसरीकडे जास्त किमतीत विकायचे. हि गम्मत सोडता. बाकी सांगली मध्ये, दुरुस्ती करणाऱ्या लोकांची गरज आहे. गरीब दुकानदारांना किवा ज्यांच हातावरचं पोट आहे. त्यांना पैश्यापेक्षा अश्या गोष्टींच्या मदतीची जास्त गरज आहे.

पण तरीही एकंदरीत सांगली सावरली आहे. सगळे धडाडीने कामाला लागले आहेत.

Categories
काही आठवणीतले

माझ्या आठवणीतला पाऊस

आज पाऊसाचा जोर पाहून मुलांना शाळेत सुट्टी जाहीर झाली. हे ऐकुन एकीकडे सकाळी उठुन डब्ब्याची गडबड नाही म्हणूनसुटकेचा निःश्वास सोडला पण दुसरीकडे आता ह्यांना घरी व्यस्त कसे ठेवावे? हा ही प्रश्न पडला. मग वाटलं आमच्या लहानपणी आमच्या आई वडीलांना सुद्धा असे प्रश्न पडत होते का?

पाऊस म्हटलं की सगळ्यांच्या आठवणी ताज्या होतात. पावसाळा एक असा ऋतु आहे जो सगळ्यांना हवाहवासा वाटतो आणि सगळ्यांच्याच काही खूप जवळच्या अश्या आठवणी ह्या ऋतुशी जोडलेल्या आहेत. 

पाऊसाच्या सरी खिडकीत पडायला लागल्या की मी माझ्या आठवणीच्या दुनियेत हरवते. तेव्हा मी अगदी माझ्या बालपणात रंगते. 

पाऊसाची पहिली सर जुन महिन्यात आली की आठवतो शाळेचा पहिला दिवस. ‘ अग रेनकोट घेतलास ना? नाहीतर नक्की भिजून येशील अशी आईची हाक ‘ आणि खरंच जर रेनकोट विसरला तर चिंब भिजून आलेली मी! तेव्हाचा पाऊस तसा शहाणा होता. १० तारखेला गजर लावल्या सारखा पडायचा. 

सायकल वर शाळेत जाताना खड्डे वाचवत शाळेत पोहोचायच आणि येताना त्याच खड्या मधून जोरात सायकल चालवत सगळीकडे पाणी उडवायच. शनिवारी अर्धा दिवस शाळा असायची. त्या दिवशी जर शाळेतून येताना पाऊस पडला तर मात्र हमखास भिजत घरी यायचं आणि वाटेत गरम गरम वडा पाव खायचा!
घनदाट झाडे बहरलेली असायची . त्या झाडाखाली आम्ही पाऊसा पासून थोडीशी उसंत मिळावी म्हणून थांबायचो, पाऊस पडून गेल्यावर फांदी हलवून पुन्हा पावसाची मज्जा घ्यायची. झाडाला झोके बांधायचे आणि सुट्टी असली कि पावसात भरपूर भिजायचं. 

पुढे मोठी झाल्यावर कॉलेज मध्ये वेगळीच मज्जा होती. Bus ची वाट बघत असताना धो धो पाऊस येणे , ती बस नेमकी अर्ध्या वाटेत बंद पडण आणि मग त्या पाऊसात मी चालत घरी येणे हे ठरलेला प्रसंग. एक समोसा किंवा भजी प्लेट ३ मैत्रिणी मध्ये वाटून खायचो .तेव्हा कॅन्टीन मध्ये मसाला चहा पीत गप्पा रंगायच्या. 

भिजून ओले चिंब घरी आले कि आई वैतागायची आणि ‘ सरळ बाथरूम मध्ये जाऊन सगळे कपडे बदल आता ‘ म्हणून रागवायची पण टॉवेल नी डोके पुसत बाहेर येताच हातात गरम गरम आलं घातलेला चहा ही ठेवायची.

नोकरी करायला लागल्यावर पाऊस अला म्हटलं की सुट्टीच्या दिवशी मित्र मैत्रीणी बरोबर long drives ला जायचो . एखाद्या रविवारी असा मस्त पाऊस बाहेर, घरात मी मऊ पांघरुणात बसून एक छान पुस्तक वाचत गरम चहाचा घोट घेत असले की कसा दिवस सार्थकी लागला असा वाटायचं!

ह्या सगळ्या काळात मी कधी पाऊसाच रौद्र रूप बघितलेले मला आठवत नाही. म्हटलं ना तेव्हा बहुतेक पाऊस आणि आपण, हे दोघे ही थोडे शहाणे होतो.

आता मात्र पाऊस म्हटलं की मनात धस्स होते. ह्या वेळी कुठे पुर येऊ नये असं मनात पटकन येते. पावसाळा सुरु झाला की बातम्या येतात त्या म्हणजे इकडे पाणी भरले, तो रस्ता वाहून गेला, तिकडे पूर आला वगैरे. रस्त्यावर खड्डे, नाल्या चे पाणी रस्त्यावर आणि बरंच काही. ह्या सगळ्यात आता काही नाविन्य उरलच नाही. निसर्ग रम्य ठिकाणी जायच्या आधी १० वेळा सुरक्षिततेचा विचार मनात येऊन जातो. नदी कधी रौद्र रूप घेईल ह्याची खात्री नसते. विसावा घ्यायला झाडे नाहीत आणी मदद मिळेल ह्याची खात्री नाही.

 कुठे तरी काहीतरी चुकतंय असा नाही का वाटत तुम्हाला? पाऊसाची मजा कुठेतरी हरवली आणि तो चिंतेचा विषय झाला ह्याला आपणच कुठे तरी जबाबदार आहोत का?

Categories
काही आठवणीतले

तेथे कर माझे जुळती

राज्य –मध्य प्रदेश

 तालुका- दमोह 

पोस्ट – बकायन 

लोकसंख्या – २०००+

मराठी घरे – १   

ह्या माहिती वरुन  तुम्हाला वाटेल त्यात विशेष ते काय ? अशी लाख्खो गावं भारतात असतील. पण अश्या २००० लोकसंख्येच्या गावी १२५ वर्षा पासून सतत संगीत समारोह दर वर्षी साजरा केला जात आहे असे कळले तर आश्चर्य वाटेल  की नाहीं ? 

Music festival in a small village from the past 125 years

बकायन येथे मृदंगाचार्य नानासाहेब पानसे स्मृति गुरु पूर्णिमा संगीत समारोहाचे हे १२५ सावे  वर्ष आहे. जबलपुरला वृत्तपत्रात ही बातमी वाचून आम्ही दोघांनी बकायन ला जायचे ठरवले. जबलपुर पासून दमोह हे १२० की.मी व पुढे बकायन ८ की.मी. आहे. इथे आल्यावर सर्व कार्यक्रम समजला. सतत ४८ तासाच्या दोन  दिवसाच्या कार्यक्रमात दोन निशारागिनी असणार होत्या. 

   बकयानला पळणीतकरांचे एकच मराठी कुटुंब आहे. चौकशी करता कळले की बुंदेलखंड चे छत्रसाल राजांनी बाजीराव (प्रथम )पेशवें यांच्याकडे मोगलांच्या आक्रमणापासून सुरक्षितते साठी मदत मागितली. तेंव्हा छ्त्रसाल यांनी, त्यांच्या राज्यातील १/३ भाग पेशव्यांना दिला. त्यात दमोह, सागर बुन्देलखंडी भाग देण्यात आला. पेशव्यांनी प्रबंधानासाठी मराठी माणसं इथे वसवली. कोकणातली पळनीटकर कुटुंबाला बकायनची जागीर मिळाली. ह्याच कुटुंबातील एक बलवंतराव अत्यंत संगीत प्रेमी व सन्यस्त वृत्तीचे. इंग्रजांच्या राज्यात काही विशिष्ट परिस्थितीत त्यांना वेश व नाव बदलून (बलवंत राव टोपीवाले ) बकायन सोडावे लागले. त्यांना पखावज प्रसिद्ध नाना साहेब पानसे ऐकून माहित असल्याने ते इन्दुरला  आले व अनेक क्लुप्त्या करून ते नानासाहेबांच्या मर्जीस उतरले. त्यांच्या जवळ बलवंत रावांनी जवळजवळ १२ वर्ष शिक्षण घेतले व पुढे गावातील व कुटुंबाची व्यवस्था बघायला ते बकायनला परत आले. जहागीरीकड़े लक्ष्य देताना त्यांनी आपली संगीताची आवड जपली व ते आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही संगीताचे शिक्षण देवू लागले. दर गुरुपुर्णिमेला त्यांचे शिष्य एकत्र येत व रात्र भर संगीत चाले. पुढे त्यांनी ह्याला एक व्यवस्थित रूप दिले व १८९४ मधे आपले गुरु नानासाहेब पानसे ह्यांच्या चित्रा समोर त्यांच्याच नावाचा हा उत्सव सुरु केला आणि हाच उत्सव आजतागायत चालू आहे.

इथे आल्यावर ‘सोहळा’ ह्या शब्दाचा  अर्थ मला समजला. मला हे वातावरण खूप भावले. इथे वावरायला खूपच  आवडत होते. दिवसाची वेळ बघून त्या प्रमाणे गायलेले शास्त्रीय गायन ऐकतानाची मजाच कांही और. शास्त्रीय वाद्य संगीतात वायलिन, सितार, बासरी, सरोद ऐकून कान  तृप्त झाले. शास्त्रीय न्रुत्यात कत्थक, ओडिसी, व मणिपुरी नृत्य पाहून डोळे तृप्त झाले व ताल संगीतात तबला व पखावज ऐकण्यात कान, मन व डोळे सर्व आनंदात न्हाऊन निघाले. 

कलाकारांना श्रोता नसला तर त्यांची कला पेश करण्यात सुध्दा मजा येत  नाहीं. इथे पहिल्या रात्री कमीतकमी ३ ते ४ हजार श्रोते होते . गावातील बायका ‘घूंघट’ काढून आल्या होत्या. साध्या, सरळ आरामात जमीनीवर बसून ऐकता ऐकता झोपी ही जात होत्या. लहान मुलं खेळत होती. बुधादित्य तर म्हणाले सुध्दा ‘यहाँ के श्रोता अलग ही हैं.’ (पुण्याच्या श्रोत्याच्या एकदम उलट ). पण तरीही तो फार रसिक आहे, अनोखा आहे आणि ह्याचा पुरावा म्हणजे सर्व  प्रकारच्या वाद्यात समेवर तो बरोब्बर मन डोलावतो, पखवाज मधे मात्रा मोजत असतो आणि गाण्यात बरोब्बर ‘वाह वाह’ करत असतो.

 ह्या २००० वस्तीच्या गावी ४००० पर्यंत प्रेक्षक कसे? ह्याचे उत्तर म्हणजे अरूण पळणीतकर, पूर्व निदेशक, उस्ताद अलाउद्दीन खां संगीत एवं कला अकादमी, भोपाळ. यांनी आसपासच्या जवळ जवळ ५० गावातून जाऊन स्वतः गाव आमंत्रण देवून आले होते. ते तीन वर्षा पूर्वी सेवानिवृत्त झाले असून स्वतः उत्तम सितार वादन करतात. ते व त्यांचे बंधू ह्यांचा, हा कार्यक्रम कसा जास्तीतजास्त आनंद लोकांना देईल ह्यावर जोर असतो व  म्हणूनच सर्व पळनीटकर कुटुंब सतत, सौहार्द्र तेने, सढळ हाताने हा उत्सव घडवून आणतात. गावकऱ्यांचा इतका सहयोग ह्या कुटुंबाच्या सज्जनतेचाच जणू पुरावा आहे. 

 आजच्या काळात ही पळनीटकर कुटुम्ब एक खेड्यात राहून ही शास्त्रीय गायन व त्याचा रसिक श्रोता जपून ठेवतात तेंव्हा फ़क्त म्हणावेसे वाटते ‘तेथे कर माझे जुळती’ 

Categories
काही आठवणीतले

हौशी वारकरी

२०१८ च्या वारीत गीतांजली व तिची मैत्रीण मीनल या दोघीनीं आळंदी ते पुणे एवढा २१ – २२ कि.मी चा वारीचा पहिला टप्पा पूर्ण केला. हे कळल्या पासून २०१९ च्या वारीला जाण्याचा निश्चय मी व माझ्या धाकट्या बहिणी ने केला व त्या प्रमाणे आम्ही दोन दिवस आधीच पुण्याला आलो, आळंदी ते पुणे व पुढे जमल्यास सासवड पर्यंत वारीची सोबत करण्याचा बेत होता. गीता ने बरेच आधी पूर्व तयारी केली होती. १५ – २० जणांचा ग्रुप तयार होईल असा प्रयत्न केला होता. हो – नाही करता – करता सरते शेवटी ७ जणांचा ग्रुप तयार झाला. त्यात ६ बाई माणूस व मी एकटाच गडी माणूस म्हणून ही नारी प्रधान दिंडी होती. आम्ही ६ जण ज्यात गीता, प्रीती (गीता ची मैत्रीण ), माझी बहीण आशा, गीता च्या मुलांची care taker आशालता व एक सोसायटीच्या आजी बाई शामिल होत्या. मीनल आळंदीला भेटणार होती. या दिंडीतले सर्व लोक वय वर्ष ४० ते ७४ च्या दरम्यानातील होते .

२६ तारखेला सकाळी ५- ५:३० च्या दरम्यान आम्ही आळंदी साठी निघालो. ट्रॅफिक बंदोबस्ता मुळे गाडी आळंदी पावेतो नेता आली नाही. आम्हाला चऱ्होली फाट्याच्या २ KM आधीच गाडी सोडावी लागली व वारीत सम्मिलित होण्यासाठी चालण्या ची सुरुवात झाली .

माउलींच्या आशीर्वादाने व आमचे नशीब थोर म्हणून, पालखी व आम्ही एकाच वेळी चऱ्होली फाट्याला पोहोचलो. पालखी चे दर्शन करून पहिल्याच दिंडी बरोबर पालखी सोबत चालण्याची सुरुवात झाली. पालखीच्या दर्शना साठी फाट्या वर सारे गाव जमले होते व त्या बरोबर आमच्या सारखे अनेक ” हौशी” व “गवशी ” वारकरी, “नवशी” वारकरयां मध्ये सम्मिलित झाले. २०० फुट रुंदीचा महामार्ग, बीआरटी व फूटपाथ सकट सर्व जागा विठ्ठलाच्या भक्तांनी भरून गेला होता. कोणीच एका जागी स्थिर नव्हते सर्व चालत धावत होते. अथांग जन सागर जणू दिंडीच्या लाटाच लाटा त्यात भजनांचा मधुर स्वर, एकमेकांशी स्पर्धा करीत पुढे पुढे धावत होत्या. काही गवशी वारकऱ्यांच्या लाटा सीमा ओलांडून वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या श्रद्धाळू लोकांनी, नवशी वारकऱ्यांसाठी लावलेल्या चहा, केळी , पोहे, बिस्कीट इत्यादींच्या स्टॉल वर उसळल्या .

नवशी वारकरी हे खरे वारकरी, त्यांचे ह्या स्टॉल्स कडे लक्ष्य सुद्धा जात नव्हते व वाटप करणाऱ्यांचे त्यांच्या पर्यंत काही पोहोचवण्याचे सर्व प्रयत्न अयशश्वी होत होते. वारकऱ्यांचा भक्ती-भाव व असीम श्रद्धा बघून मन भरून आले. इतक्या मोठ्या जन समुदायाला २० – २२ दिवस आपली इतर सर्व काम सोडून, फक्त माऊलीचेच नामस्मरण करण्या साठी, विठ्ठला शिवाय आणिक कोणतीच दुसरी शक्ति एकत्र करू शकत नाही ह्याची खात्री पटली. विठ्ठला आधी, मी वारकऱ्यांनाच मनातल्या मनात नमन केले व त्यांचा बरोबर भजन ऐकत, म्हणत पुढे वाट चाल करू लागलो. त्यांच्या वेगाने चालणे शक्य नव्हते. पालखीच्या दर्शनासाठी व नवशी प्रवाश्यांशी स्पर्धा कऱण्यात बरेच हॊशी, गवशी वारकरी धावत होते . किती तरी लोकांच्या पायातल्या चपला, जोडे मागे सुटत होत्या पण ते उचलून परत पायात घालण्याचे धाडस कोणीच करीत नव्हते. त्यांचा मागून येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटांचा धक्का लागून कोसळून पडण्या पेक्षा तळतळत्या उन्हात अनवाहणी चालत राहणेच जास्त श्रेयस्कर होते. गावतल्या लोकांना नंतर तिथे शेकडो जोडे चपला सापडले असतील. गीताची मैत्रीण मीनल अजून आम्हाला भेटली नव्हती, पण तिचा मोबाईल वर संपर्क झाला होता व आम्ही जवळपाससाच आहोंत असे समजले. एवढ्या मोठ्या जनसागरात तिला हुडकणे अशक्य होते पण प्रत्येक दिंडीला क्रमांक असल्याने व मोबाईल फोन जवळ असल्याने आमची भेट लवकरच झाली व आमचा कोरम पूर्ण झाला .मागील वर्षी आळंदी -पुणे वारी करणारी ती दुसरी अनुभवी होती. आम्ही ६ लोक बीआरटी मधून चालत होतो व मीनल ५ फूट कुंपणाच्या आतून. आम्ही बराच वेळ असेच चालत होतो, कारण कुंपण ओलांडून मीनलला बीआरटीत येणे शक्य नव्हते .

पावसाची वाट बघत-बघत तळपत्या उन्हात कधी सावलीत बसत, उठत, खात -पीत, कधी पालखी च्या पुढे कधी मागे, आम्ही चालत होतो. उन्हाचा त्रास सर्वानांच होत होता. सारेच जण थकले होते. पण एकआजीबाईनं शिवाय कबूल करायला कोणीच तयार नव्हते. पुढे पुणे – सासवड वारी करायची माझी पूर्ण तयारी होती, पण आमच्या नारी प्रधान दिंडी मधल्या ६ जणींनी माघार घेतल्या मुळे मी पण ते पुढच्या वर्षी वर ढकलले.

दुपारचे १२ वाजून गेले होते. आमचे चालणे सुरु होतेच. गर्दी वाढतच होती. त्यात माझी बहीण कुठे तरी मागे पुढे झाली व हरवली असे वाटले. शेवटी बरेच वेळा नंतर आम्हाला ती भेटली. अश्या प्रसंगी आपल्या ग्रुपच्या सर्वांचे मोबाइल नंबर सर्वांजवळ असणे फार आवश्यक आहे, याची खात्री पटली. हरवेल, पडेल, डिस्चार्ज होईल अशी अनेक कारणे सांगुन, शिवाय सर्वांजवळ मोबाइल आहेतच असे म्हणून मी माझा मोबाइल घरीच ठेवला होता.

“बैलांसाठी विसावा स्थळ ” अशी समोर भली मोठी पाटी लागलेली असताना ह्या पाच बाया /मुली अचानक तिथे थांबल्या. ती पाटी वाचता येऊ नये अशा फक्त एक आजी बाईचं होत्या. मी व मीनल पुढे चालत होतो . त्या थांबायचं कारण. “गायींसाठी विसावा स्थळ ” अशी पाटी दिसते का हे बघण्यासाठी थांबल्या असाव्यात कदाचित, असे मी मीनलला म्हणालो पण नंतर कळले कि माउलींचे इतक्या जवळून दर्शन घेऊन पालखी सोबत सेल्फी काढण्यासाठी त्या थांबल्या होत्या. ” नवशी” व “हवशी” वारकऱ्यांमध्ये जो फरक असतो तो हाच!

शेवटी दिंडी क्रमांक ५१ रथचा पुढे ; दिंडी क्रमांक २०१ रथचा मागे असे अनेक फळे वाचत वाचत व सर्व दिंड्यांना बघत बघत व त्यांचं कौतुक करत आम्ही ३ वाजताच्या सुमारास शिवाजी नगरला पोहोचलो व पालखीला निरोप दिला. पालखी पुण्याकडे निघाली आणि आम्ही आमच्या घराकडे! स्वेछेने एकत्र झालेला एवढा मोठा जन सागर एकदा तरी बघावा व वारकर्यांनबरोबर कमीत कमी चार पाऊले चालावी हि इच्छा पूर्ण झाली होती.

Categories
काही आठवणीतले

माऊली

वारीला जायचं तर ठरलं होतं. पण कसे.. कधी? आळंदी -पुणे करायची कि पुणे -सासवड. माझं मन सांगत होतं पुणे ते सासवड कर. पण सर्व ज्येष्ठांनी मला ओरडून पुणे- सासवडचा नाद सोडायला सांगितला. मग मी परत आळंदी ते पुणे अशी वारी करायची ठरवलं. गीतांजली होतीच बरोबर. आम्ही ह्यावेळी आपण आळंदीला भेटू असे ठरवले.

राहुल तर मला विचारत होता,” तुला वारी का करायची आहे”? त्याला म्हणाले,” मला माहित नाही. पण मला तीव्र इच्छा होतेय वारीला जायची. जणू काही माऊली सांगत आहेत ये वारीला”. प्रश्न होता आळंदी पर्यंत कसे पोचायचा? ह्याचा. राहुल सोडायला तयार होता. पण मुलींची शाळा असल्याने ते रद्द केले. शेवटी सोमनाथ म्हणजे १८ travels ला सांगून त्याने गाडीची सोय केली. त्याला म्हणाले, “मला आळंदी रोड पर्यंत कुठेही सोड. मी पुढे बघेन काय करायचे ते”. खरं तर मला आळंदी पुणे चालणे खूप hectic होईल असे वाटतं होते, पण बरोबर हि खात्री होती कि आपण करू शकू. आधीचे १० दिवस अतिशय धावपळीत गेले होते. ट्रेनिंग, ऑफिस, घरकाम, २ प्रोजेक्ट संपवायचं काम खूप जास्ती होते. पण तरीही मन सांगत होते तू जा.

सकाळी सर्व आवरून डब्बा बनवून निघाले. निघायला जरा उशीर झाला होता. गाडी वेळेत होती. पण पालखी निघाली होती. आळंदी रोड पर्यंत पोचले. खरे तर आळंदी फाटा खूप लांब होता. पण पुढे गाडी जावू शकत नव्हती. आता ह्यापुढे आपल्या पायी जायचं असा मनाचा हिय्या करून निघाले. GPS च्या मदतीमुळे खुप सोयीचं झालं. गीतांजली आणि माझी भेट अजून झाली नाही. आम्ही whatsapp live location चा फायदा घेतला. ती २ चौक मागे होती. मग मी थांबले. नशीब मात्र जोरात होते. मी थांबले तर…. “समोर पालखी. काय छान वाटले. शांतपणे पालखीकडे बघत होते. आजूबाजूला माणसांचा समुद्र होता. चक्क समुद्र. किती माणसे होती. लहान… मोठी, तरुण… वयस्कर. सर्व जण पालखीसाठी, पालखीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांच्या मागून दिंडी चालत होत्या. दिंडीची शिस्त खूप असते”.

दिंडी मध्ये एक म्होरक्या{दिंडी प्रमुख }असतो. त्याच्या मागेच सगळ्यांनी चालायचं. काहींच्या हातात झेंडे होते, तर काहींच्या हातात टाळ. काही बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तर काहींच्या डोक्यावर चक्क विठूमाऊलींची मूर्ती. सर्वांनी एका रांगेत चालायचं. पुढे सर्व पुरुष, मागे सर्व बायका. त्या बायकांच्या मागे दिंडी मधील काही मुख्य पुरुष. शाळेतले marching आठवते का? एका रांगेत चालायचे तर किती आटापिटा करायला लागायचा. बर, रांगेत पुढच्या माणसाच्या बरोबर मागे चालायचे, आणि डाव्या उजव्या बाजूच्या माणसांच्या रेषेत पण बरोबरीने चालायचे. त्यासाठी, सगळ्यांचा एकचं वेग हवा. सगळ्यांच्या बरोबर जाता यायला हवे. आपल्याला वाटते तेवढे सोप्पे नाही. आपल्याला दिंडी बरोबर जायचं तर आधीपासून खूप तयारी करायला लागेल. त्यांच्या वेगाने, त्यांच्या बरोबरीने, एवढे अंतर रोज पार करणे. आपल्यासाठी नक्कीच ते एक आव्हान. त्यासाठी शारीरिक दृष्ट्या किती तंदुरुस्त पाहिजे माणूस. पण फक्त शारीरिक तंदुरुस्ती हवी का? का मानसिक पण हवी? कारण जरी शरीर थकले, आणि मनाने सांगितले कि तू हे करायचं कि शरीर करतेच. त्यामुळे मन, मनाची ताकद पण समजून येते. तर एकूण काय शारीरिक तंदुरुस्ती, आणि मानसिक तंदुरुस्ती, दोन्ही महत्वाचं.

दिंडीमधील सर्व लोक कष्टकरी. शेतकरी. कुठून कुठून वारीला आलेली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येतात. काय उद्देश, काय साधता येते ह्याने, देवदर्शन. देवाच्या चरणी आपले १५-२० दिवस अर्पण करायचे. काही तर १ महिन्यासाठी येतात. ह्याबाजूचे सर्व देवदर्शन करून वारीला येतात. मग पंढरपूर वरून घरी परत. दिंडी मध्ये त्यांची व्यवस्था पण चांगली करतात. नाश्ता, जेवणखाण, नेमाने सगळ्यांना मिळते. अर्थात त्यासाठी त्यांनी आधी पैसे पण घेतलेले असतात. खरेतर वारीला येताना त्यांच्या तश्या अपेक्षा पण खूप जास्त नसतात. आपल्याला २ वेळचे जेवण मिळावे, आणि आपण नामस्मरणात वेळ घालवावा. अमुक प्रकारचा जेवणं पाहिजे आणि तमुक प्रकार पाहिजे. असे काही नाही. जे मिळेल ते खावे. आणि हरी हरी करावे. अर्थात सगळी लोकं अशी नसतात.

असे म्हणतात वारीला तीन प्रकारची लोक येतात. हौशी, गवशी , नवशी. आधी वर्णन केलेले लोक नवशी. आमच्या सारखे हौस म्हणून येणारे हौशी. तर तिसरा प्रकार गवशी. थोडक्यात जे गवसेल ते घ्या आणि पिशवीत भरा. चोर वगैरे पण असतील. पण दोन्हीही वारीत आम्हाला चोरांचा अनुभव नाही आला. वारीच्या पूर्ण रस्त्यावर खूप दान देत असतात. काहीजण केळी देतात, काही बिस्कीट पुडे, पाणी, चहा, जेवण. सगळे काही वारीत मिळते. आपल्याला जेव्हा जे हवे ते आपण घेवू शकतो लोकांकडून. आम्ही प्रसाद म्हणून एकेक केळे घेतले एका माणसाकडून. पण बाकी गरजूंना मिळो असे म्हणत सगळे नाकारले. काही लोक गरज नसताना पण घेत होती, पिशव्या भरून भरून घेत होती. ते बघून मात्र वाईट वाटत होते. सगळ्यात चीड येत होती, ती म्हणजे जो माणूस देतोय त्याच्याकडून हिसकावून घेणाऱ्या लोकांची. एवढी गरज आहे का?असे वागायची गरज आहे का? हा प्रश्न त्यांना विचारावासा वाटत होता. पुढे एका दिंडीबरोबर आम्ही पण विश्रांती घेत होतो. त्यातील एक बाई म्हणत होती,”काय मी मी म्हणून घेतात. दिंडी मालकाने सगळी सोय केलेली असते. काही गरज नसते”, पण म्हणतात न,” व्यक्ती तितक्या प्रकृती”! वारीमधील चांगले अनुभव लक्षात ठेवावे आणि काही नको असलेले अनुभव विसरून जावे.

दिंडी मध्ये पांढरा वेषात असतात पुरुष मंडळी. डोक्यावर गांधी टोपी. किती मोहक हे दृश्य दिंडीचे. सगळे विठू माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या नामस्मरणात मग्न. एकामागून एक चालत आहेत. वेगवेगळे अभंग म्हणणे चालूआहे. झांजा वाजत आहेत. काही तर एवढ्या अप्रतिम आवाजात अभंग गातात कि, ऐकत राहावे.

तर GPS मुळे आणि फोन मुळे गीतांजली आणि माझी भेट झाली. मागील वर्षी आमच्या बरोबर बरीच लोक असली तरी खूप वेळ आम्ही दोघीच दोघी होतो. ह्यावेळी आमची दिंडी जरा मोठी होती.  गीतांजलीचे बाबा, आत्या, प्रीती नावाची मैत्रीण आणि तिच्याकडे काम करणाऱ्या एक आजी आणि एक आमच्या वयाची मुलगी. हो आम्ही सगळ्या मुलीच. आमची दिंडी जरा वेगळी होती. पंजाबी ड्रेस मध्ये ४ बायका, एक नऊवारीतील आज्जी, एक साडी नेसलेली बाई. तर एक shirt pant मधील बाबा. सगळ्यांच्या पाठीला छोट्या sack आणि डोक्याला टोप्या. वयाप्रमाणे बघायला गेलो तर ७० च्या पुढील ३ आणि ४० च्या गटातील ४ असे होतो सगळे. सगळ्यांनी ठरवले होते पूर्ण चालायचं. आज्जीबाईंचा पाय जरा दुखत होता. तरी चालत होत्या आमच्या बरोबरीने. मधेच गर्दीत आत्या हरवल्या. आम्हाला वाटले त्या पुढे गेल्या. म्हणून आम्ही पुढे चालत आलो. गीतांजली चा फोन आत्याच्या कडे. कसेतरी संपर्क होवून परत भेटलो. फोन हा ,आपल्यासाठी केवढं मोठ उपयोगी असं साधन आहे. ह्यावर बोलत पुढे वारी चालू केली. ह्या वेळी आमच्या नशिबाने, निम्म्या अंतरापर्यंत पालखी आमच्या पुढे मागे होती. कधी आम्ही पुढे असायचो कधी पालखी. ह्याला कारण म्हणजे कधी आमची दिंडी थांबायची, कधी पालखी. गीतांजलीच्या बाबा आणि आत्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आमच्या बरोबरीने नाही, तर आमच्या पुढे ते चालत होते. दमले का? विचारले तर अजिबात कबूल करत नव्हते, “आम्ही दमलो म्हणून”. सगळ्यांबरोबर मजा येत होती. गप्पा, कधी दिंडीतील भजन ऐकत कधी थांबून पाणी पी, काहीतरी तोंडात टाक असे करत आम्ही पुढे पुढे चालत होतो. एकदा जेवणासाठी थांबलो. कुठे, कसे, काही विचारायचे नाही. जिथे जागा मिळेल तिथे बसलो आणि खावून पुढे निघालो. ह्यावेळी आम्हाला अजिबात पाऊस लागला नाही. नुसतं ऊन, घामाच्या धारा. ढग आले कि बरे वाटत होते, पण आम्हाला ह्यावेळी पाऊस काही लागला नाही. जो खरा तर हवा होता. सगळीकडे खूप उकडत होते. पण आमच्या नशिबात पाऊस नव्हता वारी मध्ये. काकांनी तर खरेदी केली होती, पावसापासून वाचायची. पण खरेदी नंतर कधीतरी उपयोगी पडेल त्यांना. Raincoat काही त्या दिवशी लागला नाही. माझ्या दृष्टीने bombay sapper पर्यंत मी आरामात चालू शकले. त्यानंतर मला जरा पायाने त्रास दिला. वारीचं ठरलेलं अंतर पूर्ण करायचे होते. त्या नंतर मात्र आम्ही जरा जास्त वेळा थांबलो. सगळ्यांनाच हवा असलेल्या विश्रांतीनंतर आम्ही संचेती पूल वर आलो. संचेती हॉस्पिटलच्या पाटीने अतिशय आनंद झाला. सगळ्यांना आपण ठरवलेले अंतर पूर्ण केल्याचा आनंद झाला. अंदाजे २२ km चाललो. प्रीतीच्या म्हणण्याप्रमाणे वारी पूर्ण चालणारी लोक पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघून खुश का होत असतील ते जाणवले.

वारीत जावून काय मिळते असा विचार केला तर खरचं काय मिळाले. आपण एवढे चालू शकलो ह्याचा अभिमान! नाही. तो तर कधीच गळून पडला. खरचं! वारीमध्ये एवढी गर्दी असते आणि त्यात आपण ह्या पूर्ण जगात एक शुल्लक व्यक्ती. आपल्यामुळे काहीही होत नसते. सगळ्याचा कर्ता करविता धनी कोणी वेगळाच असतो. माऊलींची इच्छा होती म्हणून एवढे मी करू शकले. लोकांची भक्ती बघून आपल्याला आनंद मिळतो. त्यासर्व भक्तिभावात आपण कुठेतरी काहीतरी केले ह्याचं समाधान. त्यांच्यामुळे आपल्या तोंडात चार वेळा माऊलींचे नाव आले. चार वेगळ्या लोकांना भेटलो. अनंत लोकांना बघितले. अनंत लोकांमध्ये चाललो ह्याचा समाधान. वारी तुम्हाला जगाची जाणीव करून देते. कधीतरी हवेत चालत असाल तर जमिनीवर आणायला मदत करते. स्वतःशी बोलायला खूप जास्त संधी देते. जी रोजच्या पळापळीमध्ये तुम्हाला नाही मिळत. अशी संधी तुम्हाला बाकी ठिकाणी पण मिळतेच. पण हा अनुभव खूप वेगळा. मी काही खूप धार्मिक नाही ना खूप देवाचे करणारी आहे. रोज देवाला नमस्कार पण करत नाही. तरीही वारी मला अनंत कारणांनी आकर्षित करते. शिवाजीनगर वरून निघताना आता पुढील वर्षी वारीतील एक टप्पा वाढवू असा विचार करत सर्वांना टाटा करत मी घरच्या मार्गाला लागले.

Categories
काही आठवणीतले

माझ्या आठवणीतली उन्हाळ्याची सुट्टी

आली आली उन्हाळ्याची सुट्टी आली! आई -बाबांची गडबड सुरु झाली. कशी काय बुआ? अहो आता उन्हाळ्याचे शिबीर शोधा, मग मुलांना तिथे सोडा आणि आणा, एखाद्या खेळाचे कोचिंग क्लास शोधा, जमल्यास मुलांना सायकल, किंवा स्विमिंग असे काहीतरी शिकवा … एक ना दोन!

मीही त्यातलीच. शाळा संपायच्या मार्गावर होती आणि मी चौकशी सुरु केली. असाच विचार करत, हातात चहा चा कप घेऊन मी बाल्कनीत बसले होते, तोच माझा धाकटा मुलगा झोक्यात येऊन बसला. त्याला सहज विचारला तुला कुठल्या क्लासला जायच आहे? तोच त्याने मला साफ नकार दिला . मी काही करणार नाही असा म्हणाला आणि निघून गेला.

त्याच्या अश्या उत्तराने मी थोडी चकित झाले पण त्याच बरोबर तिथे चहा पिता पिता मी माझ्या उन्हाळयाच्या सुट्ट्यांच्या आठवणीत रमले.

आम्ही लहान होतो तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट बघायचो. सुट्टी खऱ्या अर्थाने निवांत आणि अनियोजित होती. सुट्टी लागली कि निवांत उठायचं, घरात काय थोडी कामं असतील ती करायची आणि खेळायला जायचं. तेव्हा काही ऊन लागायच नाही आणि मित्र मैत्रिणी एकत्र असले की तहान भूक ही लागायची नाही.

मग सूर्य डोक्यावर आला की प्रत्येकाच्या घरून हाक यायला सुरु व्ह्यायची. “अरे जेवायला येताय ना का डबा ऐसपैस खेळून पोट भरणार आहात?” अशी टिप्पणी आली की मात्र सगळे पसार व्हायचे! सुट्टीत आईचा ओरडा कशाला खा!

friends together in summer vacation

जेवण झालं की कलाकुसर किंवा वाचनाला ऊत यायचा. घरातले जुने पेपर, चिंध्या, गेल्या वर्षीची पुस्तके, जुनी मासिके, तुटलेले आभूषण, काचा, कवड्या हे सगळं आमचा खजिनाचं असायचा. ह्यातून काहीतरी नवीन बनवायचे एखादा किंवा नवीन खेळ तयार करायचा. ह्यात कुठेही घरातील मोठ्यांचा सहभाग होत नसे. एखादी शोभेची वस्तू किंवा उपयोगी वस्तू तयार झाली की केवढा तो आनंद व्हायचा!

गोष्टीचे पुस्तक, कादंबरी वाचायची वेगळीच गंमत होती. माझ्या बाबांना वाचनाची खूप आवड होती. ते माझ्यासाठी जवळच्या लायब्ररीमध्ये खाते उघडून द्यायचे. मला कुठल्या कादंबऱ्या आवडतील हे हि त्यांना माहित असायचं. ते लेखकांची नावे सुचवत. ते सोडून फूटपाथ वर सेकंड हॅन्ड पुस्तक मिळत, तिथे आम्ही तासंतास हिंडत राहायचो आणि एखादे चांगले पुस्तक मिळाले की भरून पावल्यासारख वाटायचं.

अजून एक उन्हाळ्याची गंमत म्हणजे, उन्हाळ्यात करण्यात येणारे पापड, कुर्डया. माझी आई ह्याचा फार काही घाट घालत नसे. ती आम्हाला घेऊन बटाट्याचा कीस आणि थोड्या कुर्डया करायची, पण त्यात सुद्धा अख्ख कुटुंब कामाला लागायचं. सकाळी उठून गच्चीत चादर, प्लास्टिक घालणे, बटाटे सोलणे, किस करणे, मग त्या सगळ्यावर नजर ठेवणे आणि संध्याकाळी खाली आणणे ह्या सगळ्यात आम्हा मुलांचा हातभार असायचा.

रात्र झाली कि रस्त्यावरची वाहने कमी व्हायची आणी मग तोच रास्ता आमच बॅडमिंटन कोर्ट व्हायचं. रात्री उशिरापर्यंत कधी बॅडमिंटन तर कधी पत्ते असा डाव रंगायचा. सोसायटी मध्ये सगळे एकाच आर्थिक आणि सांस्कृतिक श्रेणी मधले, म्हणून सगळ्यांच्या घरी एकसारख वातावरण. मग कोणाला चांगले मार्क मिळाले किंवा कोणाचा वाढदिवस असला कि आमची वडापाव आणि आइसक्रीमची पार्टी रंगायची.

Summer vacation travel plans.

ह्या सगळ्यात मग कट्ट्यावर बसून कधी सहलीचे बेत आखले जायचे, तर कधी चांदणी भोजनाचे, कधी सोसायटी फन फेअर ठरवायचो तर कधी चित्रकला स्पर्धा.

उन्हाळ्याच्या सुट्टीतच आजोळीही जाणं व्हायचं. तिथे सगळे आत्ते मामे भावंडं जमली कि गप्पा आणि मस्तीला ऊत यायचा.  झाडवरील बोरा, चिंचा आणि कैऱ्या तोडायला, पोटभर आंबे आणि फणस खाण्याची वेगळीच मजा असायची. ह्या सगळ्या मध्ये २ महिने कसे निघून जायचे कळायचं हि नाही.

“आई दूध दे, खेळायला जायचंय, “अशी हाक कानावर आली आणि मी वास्तव्यात आले. मी मनात हसले आणि लक्षात आलं अशी मुक्त आणि स्वछंदी उन्हाळ्याची सुट्टी घालवणार असेल तर नाही केला कुठला क्लास ह्या वर्षी तरी चालेल नाही का ?

Categories
काही आठवणीतले

गोष्ट तशी छोटीशी पण …

माझी दहावीची बोर्डाची परीक्षा नुकतीच संपली होती. सुट्टीचे पहिले काही दिवस मी खूप धमाल केली. पण मी ठरवले होते की या सुट्टीचा जेवढा सदुपयोग आपल्याला करता येईल तेवढा करायचा. माझ्या बाबांनी मला रोज सकाळी उठून व्यायाम करायचा सल्ला दिला. आम्ही दोघांनी रोज सकाळी व्यायाम करायला सुरुवात केली. आमच्या घराजवळचेच एक मोठे ग्राउंड आमच्या व्यायामाचे ठिकाण झाले.

मी काय कोणी व्यायामपटू नव्हतो, म्हणूनच सुरुवातीचे काही दिवस मला त्रास व्हायचा. जसा मी घरी परत यायचो तसा मी लगेचच एक ग्लासभर दूध प्यायचो. गार वा गरम, दूध प्यायल्यावर खूप बरे वाटायचे. आमच्याकडे रोज एक दादा दूध घेऊन यायचा. महिन्याच्या शेवटच्या तारखेला आम्ही त्याला पूर्ण महिन्याचे पैसे द्यायचो. त्याचे नाव वैभव. नावाच्या विपरीत त्याची आर्थिक स्थिती होती. फक्त आम्हालाच दूध द्यायला तो आमच्या बिल्डींगमध्ये यायचा तरीपण या गोष्टीचा राग किंवा कंटाळा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नसे. आमचे बोलणे जरी दोन एक मिनिटांचे असायचे तरी मला त्याच्याबद्दल आपुलकी वाटायची. मला त्याची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचा हसतमुख चेहरा. त्याच्याकडचे दूध तर मला आवडायचेच पण त्याच्याशीही माझी चांगली मैत्री झाली होती. व्यायामाला जायला लागल्यापासून आमच्या भेटी कमी झाल्या होत्या.

व्यायाम सुरू करण्याआधी आम्ही ग्राउंडवर चालण्याचा व धावण्याचा सराव करायचो. ग्राउंड सर्व बाजूंनी सपाट नसल्यामुळे काही ठिकाणी खड्डे तयार झाले होते. रोजच्या प्रमाणे धावत असताना माझा पाय अशाच एका खड्ड्यात गेला आणि मी अडखळलो. माझा पाय मुरगळला अचानक पाय मुरगळून झालेल्या वेदनेने मी कळवळलो. त्या दिवसाचा आमचा व्यायाम थांबला.

बाबांच्या आधाराने मी घरी यायला निघालो. प्रत्येक पावलागणिक मला असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या. कधी एकदाचे घरी पोहचतोय असे मला झाले होते. मी कसाबसा बिल्डिंगपर्यंत  पोहचलो. बिल्डिंगला लिफ्ट असल्याने सुदैवानें मला पायऱ्या चढायला लागणार नव्हत्या. आम्ही लिफ्टजवळ पोहचणार, तेवढयातच कुणीतरी लिफ्टचे दार लावून वर जाण्याच्या तयारीत होते. लगेच आम्ही त्याला थांबा असे म्हणून थांबण्याचा संकेत दिला. जसे आम्ही लिफ्टच्या समोर आलो तसे बघतो तर काय, ती व्यक्ती म्हणजे आमचा वैभवदादाच होता. आम्ही एकमेकांकडे बघून हसलो. घाईत असणारा तो दुधाच्या पिशव्या आमच्याकडे सुपुर्द करून निघून गेला. त्याला बाय बाय करून त्याच हाताने मी लिफ्टचे दार लावले आणि आम्ही वर आलो. जसे आम्ही आमच्या घराच्या मजल्यापर्यंत पोहचलो आणि लिफ्टच्या बाहेर आलो, लिफ्टचे दार लावले तेवढ्यात अचानक लाईट गेले. आता काही वेळासाठी लिफ्ट निकामी होणार होती. जर वैभवदादा आम्हाला न बघताच वर गेला असता तर कदाचित आम्हाला लिफ्ट वापरता आली नसती, त्यामुळे माझ्यासमोर दुखऱ्या पायाने सत्तर पायऱ्या चढण्याचे आव्हान उभे ठाकले असते. हातात दुधाच्या पिशव्या असल्यामुळे मी मनातल्या मनातच मनापासून देवाचे आभार मानले. वैभवदादा मला त्यावेळेस एका देवदूतापेक्षा कमी नव्हता. त्याने फक्त माझ्या कळवळत्या जीवाचे श्रमच नव्हते वाचवले तर शक्ती देणारे दूधही माझ्याकडे सुपूर्द केले होते. गमतीने मी त्याला देवदूत नव्हे तर देवदूध ही उपमा देतो.

Categories
काही आठवणीतले

बालपणीचा काळ सुखाचा

काय सांगू तुम्हाला मंगळवेढ्याची पोर मी. सिरसीशी नातं जोडलं आणि पार बदलून गेले.
सिरसीत येऊन २७ वर्ष उलटली भाषा बदलली, राहणीमान बदलले पण अजूनही मंगळवेढ्याची ओढ कमी झाली नाही.

काय आहे त्या खेडेगावात? असं बाहेरच्या लोकांना नेहमी वाटतं पण माझ्या गावाची शानच न्यारी. इथला मऊ शार हुरडा, दर्जेदार ज्वारी आणि जोरदार उन्हाळा, थंडगार हिवाळा तसेच इथली संतांची परंपरा. ह्या गोष्टी जगामध्ये कुठेही मिळणार नाहीत. मंगळवेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सामाजिक ऐक्यता. कधीही दंगा, मारामारी, इथे पहायला मिळत नाही. राजकीय मैदानात एक बाजूला टाकलेले गाव. पण तरीही कुणाबद्दल कशाचीही तक्रार न करता गुण्या गोविंदाने एकत्र नांदणारी माझ्या गावची साधीसुधी माणसं.
ह्या टुमदार गावामध्ये मी लहानाची मोठी झाले.

किल्ला भागात नेने वाडा हे माझ आजोळ. तिथे आजी, आजोबा, मामा, मामी ह्यांच्या सोबत आई आणि आम्ही तिघे भावंडं रहायचो. बाबा माझ्या लहानपणीच गेल्यामुळे आजी आजोबांच्या मायेच्या पंखाखाली आम्ही वाढलो.
आता मागे वळुन पाहताना ते बालपण पुन्हा जगावेसे वाटते. ते स्वच्छंदी दिवस पुन्हा अवतरावेसे वाटतात. ना तेव्हा  TV होता, ना AC, ना fridge होता, ना खूप सुविधा होत्या पण कशाची कमतरता वाटायची नाही खूप तृप्त आणि सुखी आयुष्य होत ते. तेव्हा शाळा, मग संध्याकाळी पाढे, परवचा, मग आईने नाहीतर आजोबांनी सांगितलेली गोष्ट. त्यात मन रंगून जायचे आणि मस्त झोप यायची. 

लहानपणी खेळलेले खेळ अजून आठवतात. दोरीच्या उड्या, फुगडी, लंगडी, लपाछपी ,गजगे, विष अमृताचा खेळ, झाडावर चढून गोळा केलेली कच्ची बोर, विलायती चिंचा ,गाभुळलेल्या चिंचा, जांभळं आणि उंबर. विटी दांडू, पळापळी, सायकल शिकणे ,झोका खेळणे आणि संध्याकाळी बुचाची फुलं वेचून घरी आणायची. आजी त्याची छान माळ करायची. 

आजी श्रीकृष्ण भक्त. ताक करताना ती कृष्णाची गाणी गायची. तिचा आवाज खूप गोड होता. खूप मायाळू, हसरी, आनंदी अशी होती ती. आजोबा फार शिस्तीचे. प्रत्येक कामात त्यांना नीट नेटकेपणा लागायचा. मामा मिश्किल. नेहमी विनोद करून सगळ्यांना हसवणारा. मामी कामसू , पण तब्येत कशी नाजूक.
आई नेहमी कामात व्यस्त असायची. ती शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे गृहपाठ, पेपर तपासणे ही कामं ती घरी फावल्या वेळात करायची.

Free spirited childhood is a thing of nostalgia today as children face tremendous pressure.

तेव्हा शाळेमध्ये एव्हढी जीवघेणी स्पर्धा नव्हती. सतत शिकवणी, जादाचे क्लास ह्यामध्ये आम्ही भरडले गेलो नाही. शाळेचा घरी दिलेला अभ्यास केला की आम्ही मोकळे खेळायला.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा पोरांची मोठी गँग असायची. आजीच्या घरातून काकांच्या घरी तिथून मावशीच्या घरी असे हिंडून संध्याकाळी घरी यायचे. लवकर झोपून लवकर उठायचे. दादा मामा मुलांना पोहायला शिकवायला महादेव विहिरीवर घेवून जायचा. उन्हाळ्यात आई वाळवण म्हणून बटाट्याचा, रताळ्याचा खीस, सांडगे, पापड करायची. तेव्हा आम्ही मुली मदतीला. 

अशा कितीतरी गोड आठवणींनी भरलेलं बालपण खूप आनंददायी होतं. परत मंगळवेढ्याला जातो तेव्हा त्या आठवणी ताज्या होतात. आता त्यावेळची बरीच जुनी माणसं नाहीत. जी आहेत त्यांना भेटून खूप बरे वाटते.
गावाची आठवण येते तेव्हा तेथील प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे गाणे गुणगुणते, मंगळवेढे भूमी संतांची.

Categories
काही आठवणीतले

पत्र ते ई-मेल पर्यंतचा प्रवास

परवा रस्त्यावरुन चालत येताना ती दिसली, एका कोपऱ्यावर उभी होती. कुणीतरी आपल्याकडे बघेल असे तिला वाटत असेल. तेवढ्यात माझ्या मुलीने विचारले, “आई, ते तिकडे तो लाल रंगाचा डब्बा उभा केलाय ना? ते काय आहे?” मी म्हणलं “तो डब्बा नाही, पोस्ट पेटी आहे ती!” तशी माझी मुलगी जरा गोंधळली…आई, मोबाईलवर जे येतात, ते पोस्ट ना? ते पेटीतून कसे येतील? ते तर मोबाईलवर येतात. पेटीतून तर सा रे ग म प असे सूर येतात, पण ती पेटी अशी नसते”. आता “पोस्ट आणि पेटी” या शब्दातून तिला दोन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतील हे मला तरी कुठे ठाऊक होते. म्हणलं थांब गोंधळ घालू नकोस. पेटी म्हणजे हार्मोनियम, मोबाईल वर येते ती पोस्ट, पण त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. ही आहे पत्र पेटी म्हणजे पोस्ट बॉक्स.

पोस्ट पेटी.
ठिकाण-मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक.
फोटो क्रेडिट- अजय काणे,विरार.

आम्ही लहान असताना, या पोस्टपेटीचा खूप उपयोग असायचा, त्यावेळी घरोघरी फोन नसायचे, अगदीचं घाई गडबडीत काही निरोप द्यायचा असेल तरच फोन करायचा. जरा निवांत वेळ असेल आणि खूप काही सांगायचं असेल तर मग मात्र पत्रं लिहायचे. पोस्टमन काका त्या त्या घरी जाऊन पत्रं देऊन यायचे. कसे दिसतात पोस्टमनकाका? तिने मला विचारलं. मी म्हणलं त्यांनी खाकीड्रेस घातला असतो, सायकल आणि तिच्यावर मोट्ठीशी खाकी पिशवी आणि त्यात असंख्य पत्र, डोक्यावर टोपी असते. कानावर एक पेन लावलं असतं. बाहेरूनच ओरडतात, पत्रं घ्या! आता  सगळेजण ई-मेल  पाठवतात नाहीतर फोन, मेसेजेस करतात. विडिओ कॉल, ऑडिओ कॉल हे आलचं त्यात! खरंच आहे ना? आताच्या  पिढीमध्ये खूप कमी मुलांना पोस्टमन काका माहीत असतील. जग किती झपाट्याने बदलतयं.

आधी कसं, पोस्टमन काकांची वाट बघावी लागत असे. मग पत्र आलं रे आलं, ते कोणाचं? कोणासाठी? कश्यासाठी? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कोण वाचणार? ह्या साठी अगदी चढाओढ असे. त्यातसुद्धा कोणाबद्दल काय लिहिले आहे आणि काय विचारले आहे यासाठी उत्कंठा शिघेला पोहोचायची. मग सगळ्यांनी एकत्र बसून आलेल्या नातेवाईकांचे पत्र कान देऊन नीट ऐकायचे. मग त्याला उत्तर म्हणून परत पत्र लिहायचे. प्रत्येकाच्या हस्ताक्षरातील एक ओळ तरी नक्की असणार. एक ओळ लिहिली तरी आपण पत्र लिहिल्याचं सुख त्या एका ओळींमध्ये मिळायचे.

आज असं वाटत की, किती गुपितं त्या पोस्टाच्या पेटीला माहीत असतील नाही का? कुठल्या सासुरवाशीण मुलीचं क्षेमकुशल तिने वाचले असेल, तर कधी सासरी त्या मुलीला कसा त्रास होतोय? हे देखील तिला समजले असेल. आर्मी मध्ये भरती होणाऱ्या इच्छूक तरुणाची, ते भरती होण्यासाठी येणार पत्र, म्हणजे आनंदाची खबरच जणू. तर एकीकडे “मुलगी आम्हास पसंत आहे”! हे निरोप देखील या पोस्ट पेटीने इच्छित स्थळी पोहचवले असतील. गावातल्या गावात कितीतरी जणांचे प्रेमपत्र तिने हळूच वाचली असतील! त्यातल्या किती जणांचे प्रेम विवाह झाले, याचा खात्रीशीर ताळेबंद तोही या पोस्टपेटीलाच माहीत. लग्नाचे आमंत्रण किंवा अमुक अमुक स्वर्गवासी झाल्याचे निरोपही हिनेच आपल्याला कळवले एवढे वर्ष. नकळत का होईना माणसांच्या भाव-भावना त्या पत्रांशी, पोस्टपेटीशी आणि पोस्टमन काकांशी जोडलेल्या होत्या. पुढे काही वर्षांनी  संगणक आले आणि घराच्या पत्त्याची जागा email id ने घेतली.

आधी कसं असायचं, घराचा पत्ता हा पिनकोड सकट पाठ असायचा, अगदी छोट्या छोट्या खुणांसह, म्हणजे अमुक एक दुकान, तमुकं  एक सायकल मार्ट, पानवाल्याची टपरी असं काहीसं. आता फक्त ईमेल आयडी फीड असतो आणि मोबाईल नंबर. पत्राची सुरुवात करताना…

तीर्थरूप आजोबांना/आजीला, अथवा तीर्थरूप बाबांना/आईस,

शि.सा.न.वि.वि म्हणजेच शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष असे लिहायचे पद्धत असे.

आपल्या बरोबरीचे असल्यास स. न. वि. वि. अर्थात सप्रेम नमस्कार विनंती विशेष असे लिहायचे. पत्राच्या मध्येच आमची ठकी काय म्हणते? बंडू त्रास तर देत नाही ना? या अश्या आशयाचे प्रश्नही असतं.

मनुला माझा गोड-गोड पापा! हे सांगायला कुठलीच मावशी कधी विसरली नसेल. मो. न. ल. आ. म्हणजे (मोठ्यांना नमस्कार, लहानांस आशिर्वाद) यानेच पत्राचा शेवट होत असे. पण आता मात्र कसं असतं, सोशल मीडिया वर सगळेच ऍक्टिव्ह  असतात. कोण ऑनलाईन आहे हेही लगेच कळतं. काही काम असेल तर ती कामंही लवकर होतात. Hey! Hi! Hello! ने सुरुवात होते Good Night, Take Care ने शेवट होतो. सोबतीला OMG, Wow, Sad असे expression दाखवणारे Emoji सुद्धा असतात. आपला आज्ञाधारक आपला विश्वासू याची जागा Thanks & Regards यांनी घेतली.

मला बरेचदा असं वाटतं पत्र लेखन म्हणजे मनातल्या भाव भावनांना करून दिलेली एक वाट असते. आपलं प्रेम, राग, काळजी, कुणाशी केलेली सल्ला-मसलत, तर काही औपचारिक पत्रं. पत्रं लेखनामुळे भाषा शुद्ध होण्यास मदत होत असे. नकळत का होईना शुद्धलेखनाचा सराव होत असे. आता ई-मेलची सोय असल्यामुळे आपल्याला कुणाचा ई-मेल वाचायचा आहे अथवा नाही हे आपल्याला ठरवता येतं. कुणाशी chat करायचे नसेल तर सहज तिकडून गायब होण्याचीही सोय उपलब्ध आहे. Technically खूप  पुढे गेलो आहोत सगळे पण मनानी एकमेकांच्या किती जवळ आहोत ते कुणालाच माहीत नाही. वाचून झालेली पत्रं आणि पावत्या एका तारेला अडकवून ठेवायची पद्धत होती तेव्हा! ती तार वर्षातून एकदा काढून त्यातील नको असलेल्या पावत्या टाकून दिल्या जातं, पण त्यातून नातेवाईकांची आलेली पत्रं कधी टाकून दिलेली मला आठवत नाही. त्या एवढयाश्या तारेमध्ये कितीतरी जणांचे आशिर्वाद असायचे. कुणीतरी केलेल्या प्रेमळ तक्रारी, त्यांच्या मुलांनी केलेली शैक्षणिक प्रगती यांचा आढावाचं असायचा. आता काय सगळचं इन्स्टंट, खाण्यापासून ते प्रेमापर्यंत, सगळं एका click वर! नाविन्याचा स्वीकार करताना, जुनं आहे ते मागे टाका असं कुणीचं सांगितलं नव्हतं. आपण मात्र नेमकं तेच केलं.

बघा तुमच्याही घरात असतील अशी कुठलीतरी पत्रं,  ती पत्रं परत एकदा नव्याने वाचा, कदाचित काही वर्षांखाली त्यातल्या  ज्या गोष्टी तुमच्या मनाला पटल्या नसतील, त्या कदाचित आज पटतीलं! बरेच न उलगडलेले अर्थ आज कळतील.

खरंतर आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पत्रापासून  ते ई-मेल पर्यंतचा हा प्रवास केला. आधी कित्येक किलोमीटर दूर राहणारी आपली माणसं, पत्रं लिहिताना खूप जवळची वाटायची. आता मात्र सगळेच एका click वर available असून सुद्धा खूप दूरचे वाटतात, किती हा विरोधाभास! बघा आज प्रयत्न करून कदाचित पत्रं लिहून या प्रवासामध्ये खूप मागे राहिलेली, रस्ता विसरलेली, ओळख विसरलेली माणसं कदाचित पुन्हा भेटतील आणि काय सांगावे change म्हणून का होईना तुम्ही तुमच्या काका मामा भाचा भाच्चीला पत्र लिहून त्या पोस्टपेटीत टाकालही!