Categories
आरोग्य

परिक्षा आणि आहार

मार्च आणि एप्रिल महिना म्हटलं की आठवतात त्या येणाऱ्या परिक्षा. मुलांची होणारी धावपळ, धांदल, पालकांचे चिंताग्रस्त चेहरे आणि त्याच बरोबर येणाऱ्या ‘Food for thought’ च्या सल्ल्यांचा भडिमार. घाबरू नका मी काही सल्ले देणार नाही. उलट काही गंमतशीर ‘Thoughts for food’ सांगणार आहे.

दही साखर: एक प्राचीन प्रथा की Mood booster :-

मी शाळेत जात असताना माझी आई /आजी परिक्षेला जायच्या आधी हातावर दही साखर द्यायची. त्याचं कारण तेव्हा काही कळलं नाही बुवा. पण जेव्हा मी स्वतः आहार तज्ञ झाले तेव्हा त्याच्या मागचं कारण उमगलं. याबद्दल थोडंसं सांगते .

दही:- दह्यामध्ये जिवंत उपयुक्त असे जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असतात. हे जिवाणू आपले आंत्र (Gut / आतडी ) शक्तिशाली बनवण्यास मदत करतात. त्यामुळेच आपली प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय दह्यामध्ये Riboflavin म्हणजेच जीवनसत्व B2 असते. या जीवनसत्वाचे मुख्य काम ऊर्जा निर्माण किंवा ऊर्जा निर्मिती करणं हे असते. म्हणूनच त्याला Mood booster असेही म्हणतात.

साखर:- साखरेमुळे इन्स्टंट एनर्जी मिळण्यास मदत होते. दह्याचा गोडावाही वाढतो.

ह्या दही, साखरेच्या मिश्रणामुळे परिक्षेच्या काळात आपली प्रतिकार शक्ती वाढते आणि ती टिकून रहावी हा त्या पाठीमागचा उद्देश.

Exams and food during that time for healthy living
PC – Louise Bauer

गुढीपाडव्याचा प्रसाद हीच यशाची गुरुकिल्ली :-

आपल्या परिक्षा येतात त्या भर उन्हाळ्यातच. आपण गुढीपाडवाच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद खातो. गुढीपाडवा वसंत ऋतूमध्ये येतो . धुळमय वातावरण. ह्या सगळ्यामुळे त्वचारोग, कांजिण्या यासारखे रोग फोफावतात. त्यामुळे कडुनिंबाचा प्रसाद खातो आणि कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून त्वचारोग होण्यापासून संरक्षण मिळवतो.

हे सर्व आपल्या सुदृढ शरीरासाठी. पण त्याच बरोबर परिश्रम आणि मनाची एकाग्रता हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे.

आहार, परिश्रम व मनाची एकाग्रता :-

पूर्वीच्या काळातील गव्हाचे पीठ काढण्याची जाती तुम्ही बघितलीच असतील. त्या जात्याला दोन तळ्या असतात. एक खालची तळी त्याच्यावर ठेवलेलं वरची तळी . वरच्या तळीला खुंटी असायची ज्याच्यामुळे ती फिरवता यायची. जेव्हा हात धरून खुंटीच्या साह्याने, वरची तळी खालच्या तळीला घासली जायची. तेव्हा मऊसूत बारीक गव्हाचे पीठ मिळायचे. बस आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे. जर आपण असं मानलं की, मनाची एकाग्रता ही आपली खुंटी.वरची तळी हा आपला तीक्ष्ण मेंदू. शेवटचं म्हणजे खालची तळी हे आपलं सुदृढ शरीर. जेव्हा या तिघांची एकसूत्रता होते. तेव्हाच आपला परिश्रम फळाला येतो. म्हणजेच आपलं यश.

बहुतेक फारच झालं ज्ञानामृत, आता माझ्या नेहमीच्या Thought for food.

Thoughts for food :-

१- अभ्यास करताना मनाचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी काही सोप्या पाककृती. टवटवीत मसाला काकडी, चटकदार वाटली डाळ, रिफ्रेशिंग अननस-चिज- चेरी, चटपटीत राजा राणी( दाणा भजी) भजी म्हणजे तेलकट हो ना ! पण तसे नाही. हे जरा वेगळे आहे .कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊन दाणे आणि  फुटाण्याची डाळ घालून. त्यांना तिखट मीठ लावून केलेलं मिश्रण.

२-  पाण्याचा तांब्या आणि पेला अभ्यासाच्या टेबलापासून जरा लांबच ठेवा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा मुद्दामून उठून पाणी प्यायला जा म्हणजे तेवढेच पाय मोकळे होतील आणि पुन्हा नवीन तरतरी येईल.

Categories
आरोग्य

नवे वर्ष नवी पालवी

नवीन वर्षाचा पहिला दिवस  गुढीपाडवा. नवीन वर्ष शालिवाहन शके  १९४१ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा हा सण निसर्ग आणि मानव सर्वांनाचं नवीन उत्साह देतो.  येणार नवीन वर्ष आपण सृष्टीच्या सानिध्यातच सुरू करतो.निसर्गच आपल्याला नवीन दिशा देतो .वसंत ऋतूच्या आगमना बरोबर वसुंधरा सुद्धा एक नवीन रूप घेण्यास सुरुवात करते. निसर्ग नियमाप्रमाणे तरु लता जुनी पिवळी पाने टाकून कोवळ्या हिरव्या नवीन पालवीची वस्त्र परिधान करतात.

आंब्याला मोहर याच महिन्यात येतो. तेव्हाच शेतकरी तयार पिकांची कापणी करून त्यातून नवीन धान्य काढीत असतो. हा सृष्टीने मानवाला दिलेला संकेतच आहे, की जसा वृक्ष नवीन पालवी धारण करतो तसेच आपण सुद्धा नवनवीन  संकल्प करायचे. त्याच बरोबर सरलेलं वर्ष मनात साठवून येणाऱ्या नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. हाच नवीन वर्षाचा उत्साह भारतातील प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तेही निसर्गातील बदलाव लक्षात घेऊनच. म्हणूनच प्रत्येक प्रांतातील गुढीपाडव्याचा प्रसाद हा निरनिराळ्या पद्धतीचा असतो. आपण सर्वजण येणाऱ्या प्रत्येक सणाची आणि त्याच्याबरोबर असलेल्या प्रसादाची आतुरतेने वाट बघत असतो.

गुढीपाडव्याची गुढी

सण आणि प्रसाद हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय हो ना! महाराष्ट्रातला प्रसाद हा तर मौल्यवान एकदम. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा  आपल्याला सभोवतालच्या वातावरणात होणाऱ्या बदलांची आठवण सुद्धा करून देतो. म्हणूनच होणाऱ्या बदलांसाठी, आपले शरीर सुदृढ बनवण्यासाठी  पौराणिक काळापासून घालून दिलेली प्रसादाची सांगड. हा गुढीपाडव्याचा प्रसाद तयार करण्यासाठी निसर्गापासून मिळालेल्या पदार्थांचे मिश्रण म्हणजे आपला कडू गोड प्रसाद. कडुलिंबाची फुले, गुळ ,चिंच ,मीठ, हिंग,जिरं  यांचे एकत्रित मिश्रण.

गुढीपाडव्याचा प्रसाद आणि त्याची उपयुक्तता:

कडुलिंब / निम (Azadirachta indica) : कडुलिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. शिवाय कडुलिंबामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. कृषी संशोधनानुसार १०० पेक्षा जास्त कीटक प्रजातींचे नियंत्रण निम अर्काने करता येते. शिवाय कडुलिंबाची साल मलेरिया प्रतिबंधक असते. म्हणूनच पूर्वी  गावाच्या वेशीवर कडुलिंब लावायची प्रथा होती. ( औषधी वनस्पती, सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर)

गुळ: गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

चिंच: चिंचेमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गुळा मधील लोह खेचून घेण्यास मदत होते.

मीठ:  मीठ इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण नीट ठेवण्यास मदत करते.

हिंग: हिंग पचण्यास सहाय्य करते.

जिरं: जिऱ्यामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते पचन संस्थेसाठी उत्तम असतं. शिवाय त्याच्यात विटामिन ई सुद्धा असतं.

असा आपला हा शक्तिवर्धक प्रसाद त्याच्याबरोबर उत्तम व्यायाम आणि सात्विक जेवण ह्या सगळ्याच समीकरण म्हणजे आपलं सुदृढ शरीर. म्हणुनच म्हणतात ना

परिश्रमो मिताहारो भूगतावश्विनीसुतौ ।

अश्विनी { दैवी जुळी मुले, Ashwins}कुमार हे जसे देवांचे दोन वैद्य आहेत, तसे पृथ्वीवरचे दोन वैद्य परिश्रम आणि आणि मित आहार (सात्त्विक जेवण). तर हाच संकल्प आपण ह्या नवीन वर्षी करूयात.

डायट टिप्स

    1. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साखरेचे हार (गाठी हार) वापरतो, त्याऐवजी आपण सुक्यामेव्याचे हार बनवू शकतो.
    2. प्रसादासाठी वापरले जाणारे कडुलिंब फक्त त्या दिवशी न वापरता ते वाळवून धान्याला लावल्यास किडे होत नाहीत.
    3. कडुलिंबाच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण किंवा ताजी पाने काही तास पाण्यात ठेवून. ते पाणी आपण पिण्यास वापरू शकतो.