Categories
प्रवास

उन्हाळ्यात घ्या गुलाबी थंडीचा अनुभव!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणलं की, धमाल, मस्ती, मजा आणि प्रवास. पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मामाच्या गावाला किंवा आजोळी जाण्याची प्रथा असायची. आपल्या चुलत, मावस भाऊ-
बहिणींबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा संपायचा हे कळायचंही नाही.

पण आता बदलती कुटुंब व्यवस्था, परदेशी स्थायिक असलेले भावंड किंवा विसंगत उन्हाळ्याच्या सुट्ट्या, अशा बर्‍याच कारणांमुळे सगळे एकाच वेळी आजोळी भेटतील किंवा सगळे दरवर्षी भेटतीलच ह्याचा नेम नाही.

अशावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी काय करावे हा एक मोठा प्रश्न असतो. आमच्या कुटुंबात सगळ्यांनाच प्रवासाची आवड आहे. प्रवास करण्यातून मुलं बरेच काही शिकतात असं माझं स्वतःचं मत आहे. ते स्वावलंबी होतात, त्यांना वेगवेगळ्या संस्कृतींची माहिती मिळते, बऱ्याच प्रसंगांना कसे सामोरे जावे हे कळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत लोकं किती आनंदी आणि किती स्वच्छंदी राहतात याची जाणीव होते.

आज मी तुमच्यासाठी भारतातील काही प्रमुख ठिकाणांची माहिती देत आहे. जिथे उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही आपल्या मुलांना घेऊन एक सुंदर सुट्टी आणि प्रवास अनुभवू शकता.

मी ह्या लेखासाठी दक्षिण भारतातील
५ ठिकाणांची निवड केली आहे.

ऊटी- कुन्नूर

वायनाड बाणासुर धारण च्या आजू बाजूचे ठिकाण

ऊटी तसे बरेच प्रसिद्ध ठिकाण आहे. तामिळनाडू मध्ये असलेले ऊटी हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून बरच नावाजलेला आहे पण त्याच्याच बाजूला असलेलं कुन्नूर हे इतकंस प्रसिद्ध नाही. हि दोन्ही ठिकाणं तशी बऱ्यापैकी एकमेकांच्या जवळ आणि अतिशय सुंदर अशी आहेत. ऊटी ते कुन्नूर अशी एक टॉय ट्रेन खूप प्रसिद्ध आहे. निलगिरी माऊंटन रेल्वे अस त्या  टॉय ट्रेनचे नाव. ऊटी हे अगदी निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे तेथील रोज गार्डन बॉटनिकल पार्क हे नक्की भेट देण्यासारखे आहेत. ऊटी लेक बोट हाऊस जवळ एक थ्रेड गार्डन म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे दोऱ्यांनी बनवलेली सुंदर फुले-पाने आणि झाडं प्रदर्शनात ठेवलेली आहेत. एप्रिल-मेच्या उन्हाच्या चटक्यांनपासून लांब अशा थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेन मधून सुंदर हिरव्या डोंगरांच्या मधून जाण्याचा प्रवास निराळाचं आहे. मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडणारे असे ऊटी आणि कुन्नूर, एका आठवड्यात पाहून होऊ शकते. काही अविस्मरणीय अनुभव म्हणजे ऊटी लेकमध्ये बोटिंग चॉकलेट्स जे होममेड चॉकलेट म्हणून फेमस आहेत आणि तिथले छोटे गाजर.

कूनुर आणि त्याच्या जवळपास असणारे म्हणजे दोड्डाबेट्टा, लॅम्बस रॉक, सीम्स पार्क , कॅथरीन फॉल्स. कुन्नूर आणि ऊटी मध्ये एकंदरीत ठिकाणांच्या नावांपासून ते तिथले बोर्डींग स्कूल्स वगैरेपर्यंत युरोपियन छाप बरीच दिसते. पुढचे ठिकाण हे तिथे जवळ असलेलं म्हणजे म्हैसूर बंगलोर.

मैसूर बेंगलोर

कर्नाटकातले एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणजे मैसूर आणि बेंगलोर. बेंगलोर हे कर्नाटकची राजधानी आहे आणि मैसूर प्राचीन राजधानी आहे. वडियार हे कर्नाटकचे राजा होते. म्हैसूर ही त्यांची राजधानी आणि मैसूर पॅलेस जे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आता आहे तो त्यांचा बालेकिल्ला होता. मैसूर बेंगलोर हे चार ते पाच दिवसात सहज करण्यासारखे ठिकाण आहे. तिथे कनेक्टिव्हिटी चा प्रॉब्लेम नाहीये म्हणजेच तुम्ही विमान रेल्वे किंवा बस यापैकी कुठल्याही प्रकारे प्रवास करू शकता. तिथले हवामान, मोठ्या मोठ्या बागा, हिरवळ हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य.

मैसूर पॅलेस हे दसऱ्याच्या सुमारास अतिशय बघण्यासारखे असते. कारण तिथे दहा दिवसांचा मोठा दसरा उत्सव साजरा केला जातो. इतरवेळीही म्हैसूर पॅलेस मध्ये आत जाता येतं. त्यामुळे तो पॅलेस बघणं आणि त्याचबरोबर संध्याकाळी तिथे रोषणाई केली जाते, ते बघायला भरपूर लोकांची तिथे गर्दी असते. मैसूरमधले प्राणी संग्रहालय अतिशय प्रसिद्ध आहे. बंगलोरहुन ऊटीला जाणार असाल तर प्रवास दिवसा आणि स्वतःच्या गाडीने करा म्हणजे बंडीपूर अभयारण्यामधून जाताना काही प्राणी दिसू शकतील.

बेंगलोर मध्येही बेंगलोर पॅलेस, बन्नेरघट्टा नॅशनल पार्क, विश्वेश्वरय्या सायन्स म्युजिअम, म्युझिकल फाउंटन, कब्बन पार्क, लालबाग अशी प्रसिद्ध ठिकाण आहेत.

कोडाईकॅनाल

आता येणार आहे तामिळनाडूमधील अजून एक सुंदर आणि प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण, म्हणजेच कोडाईकॅनाल. कोडाई मध्ये कॉक्रस वॉक, पिल्लर रॉक, सिल्वर कॅस्कॅड वॉटर फॉल,डॉल्फिन नोज हे काही अगदी आठवणीत राहणारी ठिकाणे आहेत. आम्ही ऐन उन्हाळ्यात कोडाईकॅनलला गेले असताना सुद्धा तिथली गुलाबी थंडी अनुभवत तिथे काढलेले तीन दिवस आठवणीत अगदी स्पष्ट आहेत. कोडाईकॅनाल मध्ये एक मोठा एक्स आकाराचे तळे आहे. त्या तळ्यांमध्ये बोटिंग करावे, तेथील निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवावे म्हणजे जीवनातला सगळा क्षीण निघून जातो.

वायनाड

वायनाड हे केरळ मधील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. वायनाड इथले हिरवा गार डोंगर मनाला भुरळ पाडतात. इथे बऱ्याच ठिकाणी फार्म stay असते. नारळ आणि सुपारीच्या बागेच्या सानिध्यात एक टुमदार घर सहज मिळू शकते. आम्ही पण अश्याच एका ठिकाणी राहिलो होतो आणि आमची कौलारू घरात राहायची हौस भागवली होती. वायनाडमध्ये बनसुरा सागर बांध, पुकोट तलाव, सुचीपरा फॉल्स हे बघण्या सारखे आहेत.

मुन्नार

मुन्नार केरळ मधलं एक थंड हवेचा प्रदेश आहे. इथल्या चहाच्या मळ्यांनी भरलेले डोंगर हे बघण्यासारखे आहे. सुंदर हवा, सगळीकडे हिरवळ आणि बऱ्यापैकी शांतता आणि निसर्गरम्य प्रदेश असं मुन्नार.

मुन्नार येथे चहाचे मळे, चहाची फॅक्टरी ह्या बरोबरच मट्टूपेट्टीधरण, Eravikulam national park बघण्यासारखे आहे. मुन्नारमध्ये असताना केरळ आयुर्वेदिक मसाज ही नक्की अनुभवा.

ही आहेत माझ्या काही महितीतली उन्हाळ्यात जाण्यासारखी ठिकाणे. तुम्हाला आवडली असतील तर जरूर कळवा.